विटेकरांना दिवाळी खरेदीची पर्वणी; विटा लेडीज बिझनेस असोसिएशन आणि चैत्रांगण इव्हेंट्सचा संयुक्त उपक्रम
विटे / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विटेकरांना खरेदीचा आनंद एकाच छताखाली अनुभवता यावा, तसेच स्थानिक महिला उद्योजिकांना आणि व्यावसायिकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने विटा लेडीज बिझनेस असोसिएशन आणि चैत्रांगण इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिवाळी स्पेशल एक्झिबिशन २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर ते सोमवार, दि. २ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मायणी रोडवरील जय मल्टिपर्पज हॉल येथे भरविण्यात येणार आहे.
शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांना दूरवर जाण्याची गरज भासू नये आणि एकाच ठिकाणी विविध वस्तूंची खरेदी करता यावी, या दृष्टीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात आकर्षक फॅशन व कपडे, सुंदर ज्वेलरी, होम डेकोर, हटके गिफ्ट्स, कॉस्मेटिक्स, हस्तकला वस्तू, दिवाळीचा फराळ तसेच विविध चविष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असणार आहेत. त्यामुळे महिला, युवक-युवती आणि संपूर्ण कुटुंबासाठी हे प्रदर्शन खरेदीसोबतच मनोरंजनाचीही पर्वणी ठरणार आहे.
सणासुदीच्या काळात ग्राहकांना विविध वस्तूंचे पर्याय उपलब्ध करून देण्याबरोबरच स्थानिक व्यावसायिक, महिला उद्योजिका आणि लघुउद्योजकांना आपल्या उत्पादनांचे सादरीकरण करण्याची संधी या प्रदर्शनातून मिळणार आहे. खरेदी, खाद्यसंस्कृती आणि दिवाळीचा उत्साह यांचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळणार आहे.
३१ ऑक्टोबर, १ नोव्हेंबर आणि २ नोव्हेंबर असे सलग तीन दिवस सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे. तरी विटा शहरासह परिसरातील नागरिकांनी, महिला भगिनींनी, व्यापारी बांधवांनी तसेच कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह या प्रदर्शनाला भेट देऊन खरेदीचा आनंद लुटावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ : जय मल्टिपर्पज हॉल, मायणी रोड, विटा.
दिनांक : ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२६.
वेळ : सकाळी ११ ते रात्री ९.
