मुंबई / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :
मुंबई मराठी साहित्य संघाचा ९१ वा वर्धापन दिन आणि वाचक दिन, शनिवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत मुंबई मराठी साहित्य संघाच्या डॉ अ. ना. भालेराव सभागृहात संपन्न होणार आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नाट्यकर्मी मा. रोहिणी हट्टंगडी या भूषवणार असून कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त मा. अश्विनी भिडे या आहेत. श्रीमती मंगल विजय केंकरे याही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्यवाह प्रा. प्रतिभा सराफ यांनी दिली.
त्यांनी दिलेली माहिती अशी : यावेळी साहित्य संघाचे मुखपत्र असलेल्या साहित्य दिवाळी विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात येईल. तसेच साहित्य संघ प्रकाशित मराठी गजल : एक दृष्टीक्षेप’ या प्रा. प्रतिभा सराफ संपादित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
समारंभात साहित्य संघाच्या अध्यक्ष उषा तांबे, डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, डॉ. अश्विनी भालेराव-गांधी, आनंद बिर्जे, प्रतिभा सराफ यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून प्रमुख पाहुण्या बृहन्मुंबई महापालिका आयुक्त मा. अश्विनी भिडे, मा. रोहिणी हट्टंगडी आणि मान्यवरांच्या हस्ते अकरा साहित्य पुरस्कारांचे वितरण होणार आहे. महत्त्वाचे पुरस्कार असे – : १. मराठी यशवंत पुरस्कार : मा. रोहिणी हट्टंगडी (डॉ. भालेराव आणि कुटुंबीय पुरस्कृत), २. सहचारिणी पुरस्कार : मा. मंगल विजय केंकरे (डॉ. भालेराव आणि कुटुंबीय पुरस्कृत)
३. वैचारिक साहित्य पुरस्कार विभागून मा. सुनील तांबे (मान्सून जन-गण-मन या पुस्तकासाठी) आणि मा. सुनीला सोवनी (देवालय -एक शोध परिक्रमा या पुस्तकासाठी) ४. कै. लक्ष्मीकांत बाबुराव चंद्रगिरी पुरस्कार : डॉ. मांगीलाल राठोड ( कै. शरयू चंद्रगिरी पुरस्कृत – कोश वाड्मय साहित्य प्रकार- बणजारा वाणी), ५. बालसाहित्य पुरस्कार : मा. विलास सिंदगिकर (पुस्तक: सणोत्सव) (कै. मिलिंद गाडगीळ स्मरणार्थ, श्रीमती वासंती गंगाधर गाडगीळ न्यास पुरस्कृत) ६. कथाकार शांताराम पुरस्कार: मा. सचिन मणेरीकर (पुस्तक- फणस-कोकणातल्या माणसाच्या गोष्टी) (के. ज. पुरोहित पुरस्कृत कथा संग्रह पुरस्कार), ७. कै. वि. स.पागे स्मृती प्रीत्यर्थ (अध्यात्मिक वाड्मय पुरस्कार)-मा. देवदत्त परुळेकर (श्री. प्रकाश पागे पुरस्कृत), ८.कै. माधव पटवर्धन(जूलियन) स्मृती पुरस्कार : डॉ. वीणा सानेकर (मराठी भाषा विषयक कार्य करणाऱ्या व्यक्ती) ९. साहित्य गौरव पुरस्कार : मा. प्रदीप म्हापसेकर (ज्येष्ठ व्यंगचित्रकार), १०. मनुकाका पंडित संस्था कार्यकर्ता पुरस्कार : मा. राजीव करडे (संस्था कार्यकर्ता) ११. प्रकाशन पुरस्कार : अनघा प्रकाशन (प्रकाशन संस्थेला) रोख रक्कम, सन्मान पत्र, पुस्तक भेट असे या सर्व पुरस्कारांचे स्वरूप आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा विश्वास करणार आहेत
या कार्यक्रमाला सर्वांना निःशुल्क प्रवेश आहे.
या कार्यक्रमानंतर मुंबई मराठी साहित्य संघाच्या ९० वर्षाच्या काळातील आजी-माजी अध्यक्षांच्या म्हणजेच न. र. फाटक, गंगाधर गाडगीळ, दाजी भाटवडेकर, जयंत साळगांवकर, मधु मंगेश कर्णिक, अचला जोशी, उषा तांबे इत्यादींचे नाट्यप्रवेश, कवितागायन आणि साहित्यसंपदा साभिनय वाचन रूपात सादर होणार आहेत, ज्यात राजन ताम्हाणे, श्रीनिवास नार्वेकर, सुप्रिया विनोद, हेमंत साने आणि संजय मोने हे नाट्यकर्मी सहभागी होणार आहेत. यात ‘तुज आहे तुजपाशी’ नाटकातील काकाजींची महत्त्वाची छोटेखानी भूमिका उन्मेश गोळे आपल्या सहकारी म्हणजेच धनेश कानेटकर, स्वरूप काळे, पद्मजा बापये, लुब्धा भोपटकर, डॉ.मनोज वराडे, अजित भोपटकर यांच्याबरोबर साकारणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाचे संहिता लेखन शिल्पा सुर्वे यांनी केले आहे तर सूत्रसंचालन सुप्रसिद्ध सूत्रसंचालक अमेय रानडे करणार आहेत.
या कार्यक्रमाचे समन्वयक एकनाथ आव्हाड, प्रा. प्रतिभा विश्वास, चंद्रशेखर गोखले तसेच डॉ.मनोज वराडे आहेत.
