ऑगस्ट 2027 पर्यंत सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी नियोजन; दर 15 दिवसांनी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल
सिंधुदुर्ग : सन 2026-27 मध्ये सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमान अत्यंत कमी झाल्यामुळे अणाव-दाभाचीवाडी धरणातील पाणीसाठ्यात घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रात ऑगस्ट 2027 पर्यंत नियमित व सुरळीत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सिंधुदुर्गनगरी पाणीटंचाई निवारण व उपाययोजना समिती गठीत करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये ट्रिगर-1 व ट्रिगर-2 लागू करण्यात आले आहेत. सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण कुडाळ तालुक्याच्या हद्दीत असून, या क्षेत्रासाठी स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सिंधुदुर्ग विभागामार्फत या योजनेचे संचालन केले जाते. अणाव-दाभाचीवाडी धरणातून सिंधुदुर्गनगरीला पाणीपुरवठा करण्यात येतो.
सिंधुदुर्गनगरी येथे मुख्य प्रशासकीय कार्यालये, शासकीय रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पोलीस मुख्यालय, अन्य शासकीय व निमशासकीय कार्यालये, शासकीय वसाहती तसेच खासगी वसाहतींना या योजनेअंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. या महत्त्वाच्या प्रशासकीय क्षेत्रातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन आणि आवश्यक उपाययोजना करण्यावर समिती भर देणार आहे.
कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, सिंधुदुर्ग हे समितीचे अध्यक्ष, तर जिल्हा सह आयुक्त, नगर विकास शाखा, सिंधुदुर्ग हे सदस्य सचिव असतील. कार्यकारी अभियंता, सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग, आंबडपाल, ता. कुडाळ; वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सिंधुदुर्ग; कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग; कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग आणि पाणीपुरवठा अभियंता, कुडाळ नगरपंचायत हे समितीचे सदस्य असतील.
सिंधुदुर्गनगरी क्षेत्रातील पाणीटंचाईग्रस्त भागांची पाहणी करून टंचाईची कारणे शोधणे, पाणीगळती शोधून तातडीने दुरुस्ती करणे आणि दाभाचीवाडी धरणाव्यतिरिक्त अन्य उपलब्ध जलस्रोतांची पाहणी करून त्यांचा वापर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करणे, ही समितीची प्रमुख जबाबदारी असेल. आवश्यकतेनुसार टँकरद्वारे किंवा अन्य पर्यायी मार्गांनी पाणीपुरवठ्याचे नियोजनही करण्यात येणार आहे.
पाण्याचा काटकसरीने वापर, पाणीगळती रोखणे आणि पाणी बचतीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासोबतच संबंधित विभाग व यंत्रणांमध्ये समन्वय साधून पाणीटंचाईच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. नागरिकांच्या पाणीपुरवठ्याशी संबंधित तक्रारींची दखल घेऊन त्यावर त्वरित कार्यवाही करण्याची जबाबदारीही समिती पार पाडणार आहे.
पाणीपुरवठ्याच्या स्थितीचा नियमित आढावा घेऊन आवश्यक उपाययोजनांचा अहवाल दर 15 दिवसांनी सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. या नियोजनामुळे सिंधुदुर्गनगरी क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित व सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास मदत होणार आहे.
