सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील शवगृह कोल्ड स्टोरेज बंद; दुरुस्तीचे काम सुरू
सावंतवाडी –
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथील डेड बॉडी कोल्ड स्टोरेज (शवगृह शीतपेटी) बंद पडल्यामुळे निधन झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याबाबत जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजू मसुरकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी यांना माहिती दिली होती. डॉ. रेड्डी यांनी तात्काळ पुणे येथील मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टर कंपनीला कळवले असून कंपनीचे टेक्निशियन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत.
टेक्निशियनने तपासणी केली असता कोल्ड स्टोरेज मशिनरीचा एक स्पेअर पार्ट – सेन्सर खराब झाल्याचे निदर्शनास आले आहे. हा सेन्सर पुणे येथून दोन दिवसात येणार असून त्यानंतर शवगृह कोल्ड स्टोरेज पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती श्री. राजू मसुरकर यांनी दिली.
तोपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून –
1. विद्यमान आमदार दीपकभाई केसरकर यांनी आमदार निधीतून उपजिल्हा रुग्णालयाला दिलेली अतिरिक्त शव शीतपेटी उपलब्ध आहे.
2. सावंतवाडी भटवाडी, निरुखे येथील कॅन्सर हॉस्पिटल येथे निधन झालेल्या व्यक्तींसाठी सहा शवगृह कोल्ड स्टोरेजची सुविधा उपलब्ध असून लाईट गेल्यानंतर जनरेटरची सोय देखील आहे. यासाठी कॅन्सर हॉस्पिटलकडून 3500 रुपये आकारले जातात, अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजू मसुरकर यांनी दिली आहे.
