*जागतिक साकव्य विकास मंच सदस्य तथा साहित्यरत्न लेखणीसम्राट विचारमंच महाराष्ट्रचे प्रशासक लेखक कवी प्रभाकर भामरे लिखित अप्रतिम लेख*
*”पोलीस हुतात्मा दिन”*
विजयादशमीचा उत्साह संपला, रावणाचे पुतळे जळाले. पण २१ ऑक्टोबर हा दिवस आपल्याला खऱ्या रावणाशी लढणाऱ्या खऱ्या रामाची आठवण करून देतो. कारण उद्या आहे – राष्ट्रीय पोलीस हुतात्मा दिन.
दि. २१ ऑक्टोबर १९५९. लडाखच्या बर्फाळ वाळवंटात, हॉट स्प्रिंग नावाच्या ठिकाणी आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी गेलेले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे १० जवान. समोरून चीनच्या सैन्याने अचानक हल्ला केला. त्या १० जवानांनी मायभूमीसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्याच बलिदानाची आठवण म्हणून दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.
आजपर्यंत स्वातंत्र्यापासून ३४ हजारांहून अधिक पोलीस बांधवांनी देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी, आपल्या शांततेसाठी बलिदान दिले आहे. आपण घरी सुखाने झोपतो, कारण कुणीतरी सीमेवर, रस्त्यावर, नक्षलग्रस्त भागात जागा आहे.
आजचा रावण म्हणजे दहशतवाद, नक्षलवाद, ड्रग्ज माफिया, गुन्हेगारी. आणि या आधुनिक रावणाशी रोज लढणारे खरे राम म्हणजे आपले पोलीस बांधव.
उद्या दिल्ली येथील राष्ट्रीय पोलीस स्मारक, चाणक्यपुरी येथे शहिदांना मानवंदना दिली जाणार आहे. या स्मारकावरील शौर्याच्या भिंतीवर त्या सर्व हुतात्म्यांची नावे कोरलेली आहेत.
चला, उद्याच्या दिवशी आपण एक पणती त्या सर्व हुतात्म्यांसाठी लावूया. त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करूया.
सर्व पोलीस हुतात्म्यांना विनम्र अभिवादन. जय हिंद!
श्री. प्रभाकर भामरे, धुळे.
(इंदुमाई)
