*जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील अनुदान वितरण*
वेंगुर्ला :
वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर येथील ताज प्रकल्पासाठी १९९४ मध्ये संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यासंदर्भात जमीनधारकांना वाढीव सानुग्रह अनुदान देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यातील अनुदानाचे वितरण जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. गेल्या ३२ वर्षांपासून या क्षणाची प्रतीक्षा करणाऱ्या जमीनधारकांसाठी हा महत्त्वाचा दिलासा ठरला आहे.
शिरोडा वेळागर येथील ताज प्रकल्पासाठी १९९४ मध्ये जमिनीचे भूसंपादन करण्यात आले होते. या प्रकल्पाच्या अनुषंगाने ताज (IHCL), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) आणि शिरोडा वेळागर जमीन मालक सहकारी संस्था यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे. या करारानुसार जमीनधारकांना वाढीव सानुग्रह अनुदान देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात १९९४ मध्ये जमिनीचा मोबदला स्वीकारलेले आणि सध्या हयात असलेले जमीनधारक यांना अनुदान वितरित करण्यात आले.
उर्वरित जमीनधारकांच्या कागदपत्रांची पूर्ण पडताळणी करून त्यांनाही नियमानुसार वाढीव सानुग्रह अनुदान वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व संबंधित जमीनधारकांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत सहकार्य केल्याबद्दल शिरोडा वेळागर जमीन मालक सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकरी बांधवांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले. गेल्या ३२ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला हा प्रश्न मार्गी लावण्याच्या दिशेने झालेली कार्यवाही जमीनधारकांसाठी समाधानकारक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी दिलीप माने, वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतरी, शरद कांबळी, मंगेश डोंगरे, संबंधित जमीन मालक उपस्थित होते.
