तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीचे घवघवीत यश!
१४, १७ आणि १९ वर्षांखालील गटांत विद्यार्थ्यांची पदकांची लयलूट
आंबोली
तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आंबोलीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध मैदानी क्रीडा प्रकारांत यश संपादन केले. धावणे, लांब उडी, तिहेरी उडी, गोळाफेक, थाळीफेक आणि रिले अशा विविध क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून शाळेच्या क्रीडा परंपरेत मानाचा तुरा रोवला.
१४ वर्षांखालील गटाचे यश
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत दत्ताराम गवस याने प्रथम, तर सत्यजीत हांडये याने द्वितीय क्रमांक मिळविला. ४०० मीटर धावण्यात वर्धन मलिक, तर ६०० मीटर धावण्यात देवांश मुद्रस याने प्रथम क्रमांक पटकावला. लांब उडीमध्ये शेवन परेरा आणि गोळाफेकमध्ये विग्नेश आपके यांनी प्रथम क्रमांक मिळवून आपले कौशल्य सिद्ध केले.
४ × १०० मीटर रिले स्पर्धेत दत्ताराम गवस, देवांश मुद्रस, सत्यजीत हांडये, वर्धन मलिक आणि आयुष रावत यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
१७ वर्षांखालील गटाचे यश
१७ वर्षांखालील मुलांच्या गटात लांब पल्ल्याच्या धावण्याच्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी विशेष चमक दाखवली. ३००० मीटर धावण्यात ध्रुव संदीप नाईक (इयत्ता ११ वी) याने प्रथम, तर आयुष प्रशांत चिरमुरे (इयत्ता ९ वी) याने द्वितीय क्रमांक मिळविला. १५०० मीटर धावण्यात रुद्र परेश सावंत (इयत्ता ११ वी) याने प्रथम क्रमांक पटकावला.
८०० मीटर धावण्यात ध्रुव संदीप नाईक याने प्रथम, तर अर्जुन सचिन कामती (इयत्ता १० वी) याने द्वितीय क्रमांक मिळविला. ४०० मीटर धावण्यात तनिष्क महेश मुळीक (इयत्ता ११ वी) याने प्रथम, तर पार्थ दीपक नाईक (इयत्ता ११ वी) याने द्वितीय क्रमांक पटकावला.
२०० मीटर धावण्यात विनीत विनायक गवस (इयत्ता १० वी) याने प्रथम, तर ओम राजेंद्र गोसावी (इयत्ता ११ वी) याने द्वितीय क्रमांक मिळविला. १०० मीटर धावण्यात आर्यन गणेश वारेकर (इयत्ता १० वी) याने प्रथम क्रमांक मिळविला. तिहेरी उडीमध्येही आर्यन वारेकर याने प्रथम क्रमांक पटकावून आपले अष्टपैलू क्रीडाकौशल्य दाखवून दिले. ४ × १०० मीटर रिले स्पर्धेतही शाळेच्या संघाने सहभाग नोंदविला.
१९ वर्षांखालील गटाचे यश
१९ वर्षांखालील मुलांच्या गटात १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत जय गावडे याने प्रथम, तर महादेव देवूलकर याने द्वितीय क्रमांक मिळविला. २०० मीटर धावण्यात अशोक घोडके, ४०० मीटर धावण्यात वेदांत वातकर आणि १५०० मीटर धावण्यात रोहित कानसे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
३००० मीटर धावण्यात नील हेगिष्टे याने तृतीय क्रमांक मिळविला. लांब उडी आणि तिहेरी उडी या दोन्ही प्रकारांत प्रज्वल यादव याने प्रथम क्रमांक मिळवून विशेष यश संपादन केले. गोळाफेकमध्ये ओंकार जाधव याने तृतीय, तर थाळीफेकमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला.
४ × १०० मीटर रिले स्पर्धेत महादेव देवूलकर, प्रज्वल यादव, युवराज सावंत, जय गावडे आणि एकलव्य खुर्देकर यांनी संघभावना व उत्कृष्ट समन्वयाचे प्रदर्शन केले.
यशाबद्दल अभिनंदन
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीला नवी दिशा मिळाली आहे. शिस्त, सातत्यपूर्ण सराव, जिद्द, संघभावना आणि मेहनतीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ, सचिव श्री. जॉय डांटस, प्राचार्य श्री. नितीन गावडे, कार्यालयीन सचिव श्री. दीपक राऊळ.समस्त पालक तसेच शिक्षकवृंद व क्रीडा प्रशिक्षकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
