You are currently viewing शिवसेना साळगाव शाखाप्रमुख सचिन धुरी यांच्यावर गुन्ह्याची आणि अटकेची निव्वळ अफवा

शिवसेना साळगाव शाखाप्रमुख सचिन धुरी यांच्यावर गुन्ह्याची आणि अटकेची निव्वळ अफवा

*शिवसेना साळगाव शाखाप्रमुख सचिन धुरी यांच्यावर गुन्ह्याची आणि अटकेची निव्वळ अफवा*

*खोटी बातमी देऊन शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न- बाळा पावसकर*

कुडाळ

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे साळगाव शाखाप्रमुख सचिन धुरी यांची अटक आणि गुन्हा दाखल अशी खोटी बातमी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी काही बिकाऊ पत्रकारांना हाताशी धरून केली आहे. ती बातमी ते सोशल मिडीयावर पसरवित आहेत. परंतु, कुडाळ पोलीस स्टेशन मधून वस्तुस्थितीची माहिती घेतली असता सचिन धुरी यांना अटक किंवा त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही असे सांगण्यात आले.त्यामुळे खोटी बातमी देऊन शिंदे गटाच्या नेत्यांप्रमाणेच कार्यकर्त्यांकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेनेचे साळगाव शाखाप्रमुख सचिन धुरी हे चांगल्या पद्धतीने शिवसेना पक्षाचे काम करीत आहेत.त्यांच्या रूपाने साळगाव मधून उमदे नेतृत्व पुढे येत आहे. मात्र शिंदे गटाला याची धास्ती असल्यानेच त्यांना कुठेतरी त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष धुरी यांच्या पाठीशी आहे. शिंदे गटाचे कार्यकर्ते सोशल मिडीयाच्या माध्यामातून आमच्या नेत्यांवर देखील खालच्या पातळीची टीका करतात,आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र शिंदे गटाच्या नेत्यांवर कोणी टीका केली तर त्यांना ती सहन करता येत नाही. मग ते रडीचा डाव करून पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी करत आहेत. मग आमच्या नेत्यांवर खालच्या पातळीची टीका होते तेव्हा आम्हीही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रारी करायच्या का? शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा अशा तक्रारी केल्या तर आम्ही देखील त्यांच्या कार्यकर्त्यांवर केसेस दाखल करू. शिंदे गट सत्तेत आहे त्यामुळे जनतेच्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत. परंतु वारंवार अपेक्षा भंग होत असल्याने विरोधी पक्ष तुमच्यावर टीका करणारच आहे.त्या टीका सहन करण्याची ताकद शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे. उठ सुठ पोलीस स्टेशन मध्ये जाऊन विरोधी कार्यकर्त्यांच्या तक्रारी करणे, शासकीय अधिकाऱ्यांकडे ठेकेदारांच्या तक्रारी करणे हे धंदे आता शिंदे गटाने थांबवून जनतेचे खरे प्रश्न सोडवावेत. अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ उपतालुकाप्रमुख, प्रवक्ते बाळा पावसकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा