You are currently viewing निर्जीव कशी ग.. म्हणू तुला मी..
Oplus_16908288

निर्जीव कशी ग.. म्हणू तुला मी..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*निर्जीव कशी ग.. म्हणू तुला मी..*

 

निर्जीव कशी मी म्हणू तुला ग तू तर माझी सखी

झरझर झरझर लिहित जाते मनातले मम, मुकी..

 

मुकी वाटते वरवर पण तू, तू तर वाचा माझी

अंतरंग ओतते तू माझे तू, गुरु तू सदैव राजी..

 

हाती धरता चालू लागते कुरकुर कधीही नाही

थकले बाई म्हणत नाही संपत नाही शाई..

 

महान आहे खरेच लेखणी रात्रंदिन राबते

अर्ध्यारात्री उठवा तरीही न थकता जागते..

 

क्रांतिकारक आहेस बाई राजसत्ता उलथवी

बीज पेरते विचारमंथन लेखक घडवी कवी..

 

उजेडात ग येती सारे तुझ्यामुळे गौरव

शाश्वत आहे चिरंजीव तू जगताचे वैभव..

 

तुझ्यावाचूनी उणेच सारे फिके बाई बेचव

रंगत येते तुझ्यामुळे ग जीवनास ती चव..

 

टॅालस्टॅाय अरिस्टॅाटल प्लेटो रविंद्रनाथ

विवेकानंद मॅक्सिमगॅार्की साऱ्यास दिली तू साथ..

 

तुला वगळता विझतील बाई सारीच तारांगणे

तुझ्याचवरती भिस्त जगाची असे तुझे वागणे..

 

निर्जीव नाही अगे लेखणी तुजवरी चालते जग

अवकाशाचा निळा डोह तू, रविराजाची धग..

 

गगनाचा ग फलक करावा पृथ्वीची लेखणी

व्यापून पुन्हा उरशील बाई अशी आहे तू गुणी…

 

प्रा. सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा