You are currently viewing हळदीचे नेरूर नं. १ शाळेचा अनोखा उपक्रम!

हळदीचे नेरूर नं. १ शाळेचा अनोखा उपक्रम!

*वन्यजीव, पशुपक्ष्यांच्या पाण्यासाठी बोडण येथे बंधारा पूर्ण; ग्रामस्थांच्या श्रमदानातून जलसंवर्धनाला बळ*

 

कुडाळ / हळदीचे नेरूर :

माणसांच्या पाण्याची व्यवस्था करताना निसर्गातील मुके जीवही जगले पाहिजेत, या संवेदनशील विचारातून हळदीचे नेरूर नं. १ शाळेने अनोखा बोडण येथील जंगल परिसरात श्रमदानातून बंधारा बांधून पूर्ण केला. वन्यप्राणी, पशुपक्षी, गुरेढोरे यांना उन्हाळ्यात पाण्याचा आधार मिळावा, तसेच परिसरातील जलसाठा वाढून जलसंवर्धनाला चालना मिळावी, या उद्देशाने राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थी, पालक, शिक्षक व अधिकारी वर्ग एकजुटीचे आणि पर्यावरणाप्रती असलेल्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला आहे. या उपक्रमादरम्यान वाडोस प्रभाग विस्तार अधिकारी मा.श्रीम. स्वप्नाली वारंग मॅडम व हळदीचे नेरूर केंद्राचे प्रमुख मा. श्री.चंद्रकांत धुरी सर तसेच शिक्षक, पालक व नेरूर हायस्कुल परिचर श्री. इब्राहमपूर उपस्थित होते. यासाठी माजी विद्यार्थी संघ हळदीचे नेरूर ने भरीव सहकार्य केले. शाळेने मुलांना खाऊची, पाणी आणि जेवण व्यवस्था केली, यासाठी पालक श्री गोट्या कोदे यांनीही साहाय्य केले.

सध्या अनेक भागांत पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीची चिंता व्यक्त होत असताना पावसाचे पाणी अडवून त्याची साठवण करणे ही काळाची गरज बनली आहे. अनेक ठिकाणी मानवी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला प्राधान्य दिले जाते; मात्र जंगलातील वन्यजीव, पक्षी आणि इतर मुक्या जीवांच्या पाण्याचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. याच जाणीवेतून शाळा हळदीचे नेरूर नं. १ ने जंगल परिसरातील बोडण -भटगावसाळ वाडी येथे बंधारा उभारण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरवला.

*माणसांसोबत मुक्या जीवांचाही विचार!*

उन्हाळ्यात जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटल्यामुळे वन्यप्राणी आणि पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ही परिस्थिती लक्षात घेऊन बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्यामुळे परिसरात पाणी साठण्यास मदत होणार असून, वन्यजीव, पशुपक्षी आणि गुरेढोरांना पाण्याचा आधार उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर जमिनीत पाणी मुरण्यास मदत होऊन भूजलपातळी वाढण्यास आणि आसपासच्या जलस्रोतांना फायदा होण्याची शक्यता आहे.

*गावाच्या विकासासोबत निसर्ग संवर्धनाचाही ध्यास!*

गावाचा विकास म्हणजे केवळ रस्ते, इमारती आणि मानवी सुविधांची निर्मिती नव्हे, तर परिसरातील निसर्ग, वन्यजीव आणि पशुपक्ष्यांचे जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करणेही होय, हे भाटगवसाळवाडीतील ग्रामस्थांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. कोणत्याही वैयक्तिक अपेक्षेशिवाय एकत्र येऊन श्रमदानातून बंधारा पूर्ण करणाऱ्या ग्रामस्थांनी जलसंवर्धनाचा एक सकारात्मक आदर्श निर्माण केला आहे.

पावसाचे पाणी अडवणे, त्याचा योग्य विनियोग करणे आणि उन्हाळ्यात जीवमात्रांना पाण्याचा आधार मिळवून देणे, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. बंधाऱ्यात मे महिन्यापर्यंत पाणी टिकून राहावे, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

“पाणी केवळ माणसांसाठी नाही, तर निसर्गातील प्रत्येक जीवासाठी आहे,” हा संदेश देत हळदीचे नेरूर येथील भाटगवसाळवाडीतील ग्रामस्थांनी श्रमदानातून पूर्ण केलेला हा बंधारा जलसंवर्धन, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक एकतेचे प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा