राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक वाढीवर चर्चा
जिल्हा निरीक्षक राज राजापूरकर यांचा सिंधुदुर्ग दौरा; कणकवली व देवगडमध्ये पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक तथा ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची भेट घेतल्यानंतर कणकवली आणि देवगड येथे भेटी देऊन पक्षाच्या संघटनात्मक वाढीसंदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
राज राजापूरकर यांनी कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी अनंत पिळणकर यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. या भेटीदरम्यान पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, पक्षवाढीसाठी आवश्यक उपाययोजना आणि आगामी काळातील पक्षाच्या कार्याची दिशा यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
त्यानंतर राजापूरकर यांनी देवगड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नंदूशेठ घाटे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी देवगड तालुक्यात पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासह पक्षवाढीच्या विविध विषयांवर चर्चा झाली.
या दौऱ्यावेळी कोकण विभागीय सोशल मीडिया फ्रंटचे अध्यक्ष प्रा. सचिन पाटकर, सिंधुदुर्ग जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, देवगड तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव, शरद शिंदे, युवक जिल्हा उपाध्यक्ष नवीन गावडे, कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, तालुका उपाध्यक्ष महेश चव्हाण, उत्तम तेली आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
