फोंडाघाटमध्ये महिला शेतकरी प्रमाणपत्र मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
जि. प. सदस्य राजन चिके यांच्या पुढाकारातून ४७८ महिलांची नोंदणी; कृषी विभाग व उमेदतर्फे मार्गदर्शन
फोंडाघाट (प्रतिनिधी) :
शासनाच्या विविध योजनांचा लाभ महिलांना मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेल्या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी फोंडाघाट येथील पूर्णानंद हॉलमध्ये जि. प. सदस्य राजन चिके यांच्या पुढाकारातून विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात सुमारे ४७८ महिलांनी शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणी केली. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जि. प. सदस्य राजन चिके, अध्यक्ष सुरेश सामंत, मंडळ कृषी अधिकारी दुर्वा झुलपे, उपकृषी अधिकारी मानसी वेर्लेकर, सहाय्यक कृषी अधिकारी अक्षया परब, उमेदच्या तालुका व्यवस्थापक दक्षता पांजरी, प्रभाग समन्वयक विठ्ठल परब, उपसरपंच तन्वी मोदी, सायली तेली, मिलिंद लाड, अमित चव्हाण आणि अरुण सामंत उपस्थित होते.
कृषी विभागाच्या अधिकारी दुर्वा झुलपे, मानसी वेर्लेकर आणि उमेदच्या दक्षता पांजरी यांनी महिला शेतकरी प्रमाणपत्राचे महत्त्व, त्याचे फायदे तसेच महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळण्याबाबत मार्गदर्शन केले. शेती, फळबाग, फुलशेती आणि शेतीपूरक व्यवसायांसाठी प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य मिळवताना हे प्रमाणपत्र उपयुक्त ठरणार आहे. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रत्येक महिला बचत गटापर्यंत ही माहिती पोहोचवून कोणतीही महिला प्रमाणपत्रापासून वंचित राहणार नाही, यासाठी कृषी विभाग व उमेदतर्फे सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
उपसरपंच तन्वी मोदी यांनी ग्रामीण भागातील महिलांसाठी हा मेळावा उपयुक्त ठरल्याचे सांगत राजन चिके व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. राजन चिके म्हणाले की, महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महिलांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यांचा त्रास कमी करून एकाच ठिकाणी नोंदणीची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन केले. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी महिलांचे आभार मानले.
अध्यक्ष सुरेश सामंत यांनी या प्रमाणपत्रामुळे महिला शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत पात्रतेनुसार अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये, तर अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांपर्यंत मदत मिळू शकते. त्यामुळे महिला शेतकऱ्यांसाठी हे प्रमाणपत्र महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या मेळाव्याला दर्शना पेडणेकर, भरत मोरे, सी.आर.पी., आनंद चिके, आत्माराम नांचे, नंदन कदम, भाई तेली, आशा सेविका, आरोग्यसेविका तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
