सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ख्रिस्तवासी पी. एफ. डॉन्टस यांना तृतीय स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
आंबोली :
सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, आंबोलीचे संस्थापक अध्यक्ष तसेच सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिसमेन असोसिएशनचे अध्यक्ष ख्रिस्तवासी पी. एफ. डॉन्टस यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त प्रशालेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रशालेतील विद्यार्थी, शिक्षक, प्रशिक्षण निदेशक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक ऋषिकेश गावडे यांनी पी. एफ. डॉन्टस यांच्या जीवनप्रवासाचा आणि कार्याचा आढावा घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या स्थापनेपासून सुरू झालेल्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत त्यांनी विविध संस्थांमध्ये बजावलेल्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्यांची माहिती दिली. शिक्षण, समाजसेवा आणि माजी सैनिकांच्या संघटनात्मक कार्यातील त्यांचे योगदान अधोरेखित केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांनी सैनिक स्कूलच्या माध्यमातून घडून सैन्यदलात तसेच भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून दाखल व्हावे, हे पी. एफ. डॉन्टस यांचे स्वप्न होते. हे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन ऋषिकेश गावडे यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त, नेतृत्वगुण आणि देशसेवेची भावना रुजवून सक्षम व कर्तृत्ववान पिढी घडविणे, हीच डॉन्टस साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी पी. एफ. डॉन्टस यांच्याविषयीच्या आपल्या आठवणी सांगून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील प्रेरणादायी पैलू उलगडले. त्यांच्या कार्याचा आणि मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर झालेला प्रभाव यावेळी व्यक्त करण्यात आला.
प्राचार्य नितीन गावडे यांनी आपल्या भावपूर्ण भाषणातून पी. एफ. डॉन्टस यांच्या आठवणींना उजाळा दिला. सैनिक स्कूलच्या स्थापनेमागील त्यांची दूरदृष्टी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम आणि संस्थेच्या प्रगतीसाठी दिलेले योगदान यांचे स्मरण करून त्यांनी आदरांजली अर्पण केली. त्यांच्या विचारांचा वारसा जपत प्रशालेने शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त आणि देशसेवेचे संस्कार यांमध्ये सातत्याने प्रगती साधावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
पी. एफ. डॉन्टस यांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या माध्यमातून अधिकाधिक गुणवंत विद्यार्थी सैन्यदलात आणि भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून घडावेत, हा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
संस्थापक अध्यक्ष पी. एफ. डॉन्टस यांच्या कार्याचे स्मरण, त्यांच्या विचारांचा जागर आणि त्यांनी पाहिलेल्या स्वप्नपूर्तीसाठीचा संकल्प अशा भावपूर्ण वातावरणात हा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
