You are currently viewing प्रतीक बांदेकर यांचा सभापती पदाचा राजीनामा; आर्थिक गैरव्यवहारावर शिक्कामोर्तब..?
Oplus_16908288

प्रतीक बांदेकर यांचा सभापती पदाचा राजीनामा; आर्थिक गैरव्यवहारावर शिक्कामोर्तब..?

 

सावंतवाडी नगरपालिका अर्थात सुंदरवाडी, रामराजा म्हणून संबोधिलेले एक अत्यंत लोकप्रिय, प्रजाहितदक्ष आणि प्रगतशील राजे पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांनी राज्य केलेले आणि त्यांच्या लोककल्याणकारी निर्णयांनी वैशिष्ट्यपूर्ण बनलेले संस्थानकालीन शहर म्हणजे सुंदरवाडी. आज तेच सावंतवाडी शहर राजघराण्यातील व्यक्ती नगराध्यक्षपदी विराजमान असताना पाणीपुरवठा विभागातील आर्थिक गैरव्यवहारामुळे बदनाम होत आहे हे शहराच्या आजवरच्या लौकिकास नक्कीच साजेसे नाही. राजघराण्यातील व्यक्ती नगराध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान असताना हे खरेतर सावंतवाडीकरांना अपेक्षित नव्हते. शुक्रवारी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक होत पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत आक्रमक होत सभात्याग केला. त्यानंतर नगराध्यक्षांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेला सभापती पदाचा राजीनामा सभागृहात सादर केल्याने नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागात झालेल्या आर्थिक गैरव्यवहारावर एका अर्थाने शिक्कामोर्तब केले आहे.

आजपर्यंत सावंतवाडी शहर जिल्ह्यातील सुंदर शहर म्हणून नावाजले जात होते, तोच शहराचा गरिमा दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी तब्बल तेवीस वर्षे राखल्यानंतर नगरपालिकेवरील दीपक केसरकर यांच्या हातातील सत्ता जाऊन भाजपची सत्ता आल्यावर शहर अशाप्रकारे आर्थिक गैरव्यवहारांमुळे बदनाम होत असल्याने नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांच्या नेतृत्वावर आणि एकंदर कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रतीक बांदेकर यांनी राजीनामा दिल्याने पाणीपुरवठा विभागात झालेला आर्थिक गैरव्यवहार म्हणजे “दाल में कुछ तो काला हैं… की पुरी दाल ही काली हैं..?” असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे…आणि असा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे सर्वसाधारण सभेच्या पश्चात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्षांनी बांदेकर “इनोसंट” म्हणजे निष्पाप असल्याचे सांगून गैरव्यवहार प्रकरणात त्यांना पाठीशी घालण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न..! नगराध्यक्षांच्या या विधानानंतर आणखी काही प्रश्न उपस्थित होत आहेत यात महत्त्वाचा म्हणजे, जर बांदेकर निष्पाप आहेत तर गैरव्यवहाराचा कर्ताधर्ता कोण? या गैरव्यवहारातील पापी कोण आहे…?

पाणीपुरवठा समितीमध्ये कार्यरत असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी हा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास येताच सदर एजन्सीची बिले रोखण्यास भाग पाडले असे शिवसेना गटनेते संजू परब सांगतात आणि या प्रकरणातील खरा दोषी कोण आहे…? त्यावर कारवाईची मागणी करतात तेव्हा हे प्रकरण साधेसुधे नसून नगरपालिकेचा जोडारी म्हणून काम करणारा कर्मचारी भारत लाखे ज्याच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक झाली तो किती दोषी आहे…? एवढा मोठा आर्थिक गैरव्यवहार लाखे सारखा जोडारी म्हणून काम करणारा कर्मचारी करू शकतो का? नगरपालिकेची नळपाणी विभागातील साधनसामुग्री खरेदी करण्याची जबाबदारी लाखे या जोडारी कर्मचाऱ्यांकडे असेल का..? गहाळ झालेली रजिस्टर कशी गायब झाली..? लाखे या प्रकरणात बळीचा बकरा तर होत नाही ना..? लाखेला सदर प्रकरणात सरळ सरळ बांदेकर याचे नाव घेत आपल्यावर दबाव आणल्याचे, मानसिक त्रास दिल्याचे गंभीर आरोप का करावे लागले? लाखेने मुलाबाळांसहीत आत्महत्या करावी लागेल असे वक्तव्य का केले..? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि संशयाची सुई वेगवेगळ्या दिशेला सरकू लागते.

विधानसभेच्या सभागृहात सत्तेत असूनही सरकारवर आसूड ओढत आमदार निलेश राणे प्रश्नांना वाचा फोडत असतात. आपल्या गुरुच्या पावलांवर पाऊल ठेवत सावंतवाडी नगरपालिकेतील शिवसेना गटनेते संजू परब यांनी देखील पाणीपुरवठा विभागातील आर्थिक गैरव्यवहारावर उघड करून सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग केल्यावर भाजपाच्या नगरसेवकांनी व्यापारी संकुलातील गाळ्यांचा विषय पुढे उपस्थित होईल म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग केल्याचा आरोप केला. परंतु मूळ मुद्दा हा पाणीपुरवठा विभागातील आर्थिक गैरव्यवहार असल्याने सावंतवाडीकर जनता भरकटलेल्या विषयाकडे लक्ष देत नसून आर्थिक गैरव्यवहार याच विषयावर चर्चा करत असल्याचे सुजाण नागरिकांशी बोलल्यानंतर दिसून आले. यावर्षी अत्यंत कमी पाऊस पडल्याने भविष्यात सावंतवाडी शहरातही पाणी टंचाई जाणवेल या विषयावर सावंतवाडीतील काही सुजाण नागरिकांशी संवाद मीडियाच्या प्रतिनिधीने प्रश्नोत्तरे केली तेव्हा हाच धागा पकडत सावंतवाडी नळपाणी विभागातील गैरव्यवहारावर नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा काहीजणांनी मतांसाठी लोकांनी १००००/१५००० रुपये घेतले आहेत त्यामुळे कोण कोणाला आणि काय बोलणार? पैसे घेऊन मते विकल्याने बोलण्याची तोंडे बंद झाली आहेत. अशी उत्तरे देत मतांसाठी वाटलेले पैसे अशाप्रकारे वसूल करण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे की काय? अशा शंका देखील व्यक्त केल्या. त्यामुळे नागरिकांच्या मनात देखील गोंधळाचे वातावरण असून नागरिकांचा निवडून दिलेल्या आपल्याच लोकप्रतिनिधींवरून विश्वास उडत चालला असल्याचे दिसून येत आहे.

सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सदर प्रकरण शहराची आणि नगरपालिकेची बदनामी होऊ नये म्हणून मिडियामध्ये देऊ नका असे म्हणतात, सदर गैरव्यवहार प्रकरणाची बिले अदा केली नाहीत असेही म्हणतात तर मग बांदेकर यांचा राजीनामा का घेतला? हे मात्र स्पष्ट करत नाहीत. त्यांचा राजीनामा पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून तात्पुरता घेतला असेही त्यांचे म्हणणे आहे. जर गैरव्यवहार झालाच नाही तर लाखे हा कर्मचारी अटक कसा झाला? या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी कोण करणार? असा प्रश्न उपस्थित केल्यावर, ती चौकशी पोलिस करणार असे सांगून आपल्यालाच सदर प्रकरणात काहीच समजत नाही असे दाखवतात की प्रकरणाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात येत नाही..? हेच ज्ञात होत नाही. हे प्रकरण दिसते तेवढे साधे नसून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून निःपक्षपाती चौकशी होणे आवश्यक असताना नगराध्यक्षांची वक्तव्य म्हणजे काहीच झालेले नाही अशाप्रकारचीच वाटत आहेत. प्रतीक बांदेकर यांनी देखील आपण आपली आणि पक्षाची प्रतिमा खराब होऊ नये यासाठीच राजीनामा दिला असे सांगितले आहे. तसेच विरोधक आपल्या बदनाम करण्याची खेळी खेळत असल्याचाही आरोप केला आहे. हे सर्व आरोप प्रत्यारोप होत असले तरी राजकारणात आपण खरे असतो तेव्हा आपल्या मतांवर आणि निर्णयांवर ठाम रहावे लागते. जेव्हा एखाद्या प्रकरणात आरोप होतात म्हणून आपण माघार घेतो किंवा राजीनाम देतो तेव्हा कुठेतरी पाणी मुरतंय असा संशय येण्यास वाव निर्माण होतो.

विरोधक आहेत ते आरोप करणारच, प्रत्येक आरोप खरा असेलच असेही नाही परंतु, एकंदर सर्व परिस्थिती पाहिली असता एवढं मोठं प्रकरण घडत असताना नगरपालिकेत सत्तेत असणारे सत्ताधारी प्रशासनावर अंकुश ठेवण्यात आणि आपल्यासह आपल्या पक्षाची इज्जत राखण्यास कुठेतरी कमी पडले की काय? की, सर्वच तरुण आणि नवोदित असल्याने त्यांचा राजकीय अनुभवच तोकडा पडला? असे प्रश्न सातत्याने पुढे येत आहेत. याच सर्व प्रश्नांमधून काय सत्य पुढे येते हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरेल कारण, त्यातूनच सत्ताधाऱ्यांना सावंतवाडीला लौकिक पुन्हा मिळवता येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा