सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी इको मशीन मंजूर करा!
राजू मसुरकर यांची रविंद्र चव्हाण यांच्याकडे मागणी; २० लाखांचा आमदार निधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन
सावंतवाडी | प्रतिनिधी :
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हृदयविकाराच्या रुग्णांना अचूक निदानासाठी आवश्यक असलेली इको सोनोग्राफी (2D Echo) मशीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मशीनसाठी २० लाख रुपयांचा आमदार निधी मंजूर करून द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तीन तालुक्यांतील दररोज सुमारे ४०० ते ४५० रुग्ण उपचारासाठी येतात. त्यापैकी १७५ हून अधिक रुग्ण हे हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब, दमा तसेच इतर आजारांवरील उपचारांसाठी वैद्यकीय विभागात येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. रुग्णालयाचे अधीक्षक व हृदयविकारतज्ज्ञ डॉ. विशाल रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांवर उपचार केले जातात.
खासगी तपासणीसाठी रुग्णांना आर्थिक भुर्दंड
हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या लक्षात घेता, अचूक निदानासाठी इको सोनोग्राफी मशीन असणे आवश्यक आहे. मात्र, रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना खासगी ठिकाणी तपासणी करावी लागते. यासाठी सुमारे २,५०० रुपये खर्च येत असल्याने गरीब आणि गरजू रुग्णांवर आर्थिक भार पडतो. त्यामुळे रुग्णालयातच ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मसुरकर यांनी केली आहे.
सीटी स्कॅन मशीन मंजुरीच्या धर्तीवर मदतीची अपेक्षा
तीन वर्षांपूर्वी रविंद्र चव्हाण पालकमंत्री असताना जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानच्या निवेदनाची दखल घेऊन सावंतवाडी आणि कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयांसाठी सीटी स्कॅन मशीन मंजूर करण्यात आली होती. या सुविधेचा गेल्या दोन वर्षांत २५ हजारांहून अधिक गरीब रुग्णांना मोफत लाभ मिळाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
त्याच धर्तीवर आमदार निधीतून २० लाख रुपये मंजूर करून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात इको सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून द्यावी. यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांना वेळेत निदान आणि उपचार मिळण्यास मदत होईल, असा विश्वास राजू मसुरकर यांनी व्यक्त केला आहे.
