You are currently viewing डॉल्बी, डीजे, अतिउच्च ध्वनीक्षेपक वापरावर 21 ऑक्टोबरपर्यंत निर्बंध

डॉल्बी, डीजे, अतिउच्च ध्वनीक्षेपक वापरावर 21 ऑक्टोबरपर्यंत निर्बंध

सांगली / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :  जिल्ह्यात दि.११ ते २० ऑक्टोबर दरम्यान नवरात्र उत्सव सण उत्साहात व मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार असून, नवरात्र उत्सव मंडळाकडून आगमन मिरवणुका दसऱ्या दिवशी दुर्गा विसर्जन मिरवणुकांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. या अनुषंगाने नवरात्र उत्सव २०२६ हा शांतता व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा, याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून संपूर्ण जिल्ह्यात डॉल्बी, डॉल्बी सदृष्य वाद्ये, डीजे व अतिउच्च ध्वनीक्षेपक यांच्या वापरास निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १६३ प्रमाणे याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.

याबाबतच्या आदेशानुसार संपूर्ण सांगली जिल्ह्यात दिनांक ०९.१०.२०२६ रोजी ००.०१ वा. पासून ते दिनांक २१.१०.२०२६ रोजीचे २३.५९ या वेळेत नवरात्र उत्सव व इतर सण उत्सवाचे अनुषंगाने मिरवणुकीत/रास दांडिया/गरबा कार्यक्रमात, सार्वजनिक ठिकाणी, मार्गावर, रस्त्यावर, कोणत्याही व्यक्ती, संस्था, कंपनी, सार्वजनिक मंडळे किंवा नवरात्र मंडळे यांना तसेच इतर सणांच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमाचे आयोजक / संयोजक, सदस्य तसेच वाद्य मालक, चालक, व्यवस्थापक अथवा ताबाधारक यांनी डॉल्बी, डॉल्बी सदृष्य वाद्ये, डीजे व अतिउच्च ध्वनिक्षेपक यांचा वापर करणार नाही अथवा उपयोगात आणू नये म्हणून निर्बंध घालण्यात आले आहेत.

प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईट, शार्पी, प्रेशरमिडच्या वापरावर निर्बंध

संपूर्ण सांगली जिल्ह्यात नवरात्र उत्सव दुर्गा आगमन व विसर्जन मिरवणुकांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. अशा मिरवणूक प्रसंगी विविध नवरात्र उत्सव मंडळे प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईट, शार्थी व प्रेशरमिडचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यांचे दुष्परिणाम व त्यातून होणारे अनुचित परिणाम लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून संपूर्ण जिल्ह्यात प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईट, शार्पी व प्रेशरमिड यांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १६३ प्रमाणे याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.

याबाबतच्या आदेशानुसार संपूर्ण सांगली जिल्ह्यात दिनांक ०९.१०.२०२६ रोजी ००.०१ वा. पासून ते दिनांक २१.१०.२०२६ रोजीचे २३.५९ या वेळेत नवरात्र उत्सव व इतर सण उत्सवाचे अनुषंगाने मिरवणुकीत / रास दांडिया/ गरबा कार्यक्रमात, सार्वजनिक ठिकाणी, मार्गावर, रस्त्यावर, कोणत्याही व्यक्ती, संस्था, कंपनी, सार्वजनिक मंडळे किंवा नवरात्र उत्सव मंडळे यांना तसेच इतर आयोजित कार्यक्रमाचे आयोजक/संयोजक, सदस्य तसेच वाद्य व लेझर मालक, चालक, व्यवस्थापक अथवा ताबाधारक यांनी प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईट, शार्पी व प्रेशरमिड यांचा वापर करणार नाही अथवा उपयोगात आणू नये नये म्हणून निर्बंध घालण्यात आले आहेत.

मोर्चे, मिरवणुका, निदर्शने, सभा आदिंसाठी परवानगी बंधनकारक

संपूर्ण सांगली जिल्ह्यात नवरात्रोत्सव, दुर्गामाता दौड आदि सणवार यासह शक्तीपीठ महामार्ग, एस.आय. आर. पेपरफुटी, ऊसदर, स्मार्ट मीटर आणि घरपट्टीवाढ विरोधी व अन्य अनुषंगिक आंदोलने आदिंच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता दिनांक ०९.१०.२०२६ रोजीचे ००.०१ वाजले पासून ते दिनांक २१.१०.२०२६ रोजीचे २३.५९ वाजेपर्यंत उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस ठाणे स्थलसीमा हद्दीत कोणालाही मोर्चे, मिरवणुका, निदर्शने, सभा इत्यादि आयोजित करावयाचे असल्यांस त्यांनी संबंधित पोलीस ठाणे अधिकारी किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांचेकडुन वेळ, मार्ग, घोषणा, सभेचे ठिकाण, जनसमुदाय इत्यादी बाबी ठरवून घेवून परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३६ प्रमाणे प्रदान केलेल्या अधिकारान्वये जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना अधिकार प्रदान केले आहेत.या आदेशाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम १३४ प्रमाणे संबंधित व्यक्ती कारवाईस पात्र राहील.

पोलीस अधीक्षक यांनी प्रदान केलेल्या अधिकारानुसार रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे व त्यांची वर्तणूक कशी असावी या विषयी निर्देश देणे, अशा मिरवणुका कोणत्या मार्गाने व कोणत्या वेळात काढू नयेत असे मार्ग, अशा वेळा विहित करणे, सर्व मिरवणुकींच्या व जमावाच्या प्रसंगी उपासनेच्या सर्व जागेच्या आसपास, उपासनेच्यावेळी कोणत्याही रस्त्यावरुन किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होवू न देणे, सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यांमध्ये, घाटात, किंवा घाटावर किंवा सर्व धक्क्यांवर व धक्क्यांमध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये जत्रा, देवळे, आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणे, कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ किंवा सार्वजनिक जागेत, किंवा सार्वजनिक जागेजवळ वाद्ये वाजविण्याचे किंवा गाणी गाण्याचे किंवा ढोल, ताशे व इतर वाद्य वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, कोणत्याही सार्वजनिक जागी किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक उपहाराच्या जागेत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याचे विनियमन करणे व त्यांवर नियंत्रण ठेवणे, सक्षम प्राधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३३, ३५, ३७ ते ४०, ४२, ४३ व ४५ अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाचे अधीन असलेल्या व त्यांस पुष्ठी देणारे योग्य ते आदेश काढणे याबाबतचे अधिकार जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. हा आदेश दिनांक ०९.१०.२०२६ रोजीचे ००.०१ वाजले पासून ते दिनांक २१.१०.२०२६ रोजीचे २३.५९ वाजेपर्यत अंमलात राहील.

प्रतिक्रिया व्यक्त करा