You are currently viewing अजिंक्यतारा कारखान्याला स्वाभिमानीचा दणका

अजिंक्यतारा कारखान्याला स्वाभिमानीचा दणका

निर्णय होईपर्यंत गळीत हंगाम बंद ठेवण्याचा निर्णय

सातारा / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :

केंद्र सरकारने साखरेला प्रतिकिलो ५० रुपये हमीभाव आणि सी-हेव्ही इथेनॉलला प्रतिलिटर ७० रुपये दर देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यावर आज धडक देत तीव्र आंदोलन केले. कारखाना सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या व्यवस्थापनाला शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेचा सामना करावा लागला. अखेर व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद देत केंद्र सरकारकडून मागण्यांबाबत निर्णय होईपर्यंत कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील साखर कारखाने सुरू करण्यापूर्वी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे. मात्र, राज्यातील काही कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू करण्याची तयारी केल्याने संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोबत घेत अजिंक्यतारा कारखाना कार्यस्थळावर धडक देण्यात आली.

‘शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही’, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. साखरेला योग्य दर मिळत नसताना उत्पादन खर्च वाढत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी केंद्राने साखरेच्या दराबाबत तसेच इथेनॉलच्या दराबाबत तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

 

आंदोलनाची दखल घेत कारखाना व्यवस्थापनाने मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली. केंद्र सरकारकडून निर्णय होईपर्यंत गळीत हंगाम बंद ठेवण्याचे मान्य करण्यात आले.

केंद्र सरकारला साखर कारखाने लवकर सुरू करायचे असतील तर साखरेला ५० रुपये किलो हमीभाव आणि सी-हेव्ही इथेनॉलला ७० रुपये प्रतिलिटर दर या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा महाराष्ट्र आणि कर्नाटकातील साखर उद्योगात संघर्ष अधिक तीव्र होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा