You are currently viewing चराठा-वझरवाडी रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र

चराठा-वझरवाडी रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र

चराठा-वझरवाडी रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र

आठ दिवसांत खड्डे न बुजवल्यास सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून सिमेंट काँक्रेटने बुजविण्याचा इशारा

सावंतवाडी । प्रतिनिधी :
चराठा-वझरवाडी येथून भोसले नॉलेज सिटीकडे जाणारा रस्ता खड्ड्यांमुळे रहदारीसाठी धोकादायक बनला आहे. या मार्गावरून दररोज नागरिकांसह हजारो विद्यार्थी ये-जा करतात. मात्र, रस्त्याची दुरवस्था झाल्याने या मार्गावर वारंवार अपघात होत असून, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने केला आहे.

आज सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास माजगाव येथील २६ वर्षीय युवक खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या कारला धडकून अपघातग्रस्त झाला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व रूपा मुद्राळे यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्ताला मदत केली.

या रस्त्यावरून दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवास करतात. यापूर्वीही या मार्गावर अनेक अपघात झाले असून, त्यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी अपघातग्रस्तांना मदत केली आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांची माहिती संबंधितांकडे देऊनही रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी ठोस कार्यवाही होत नसल्याची खंत रवी जाधव यांनी व्यक्त केली.

रस्त्यावरील धोकादायक खड्डे तातडीने बुजविण्यासाठी संबंधित सरपंच व ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत खड्डे बुजविण्यात आले नाहीत, तर विद्यार्थी व नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे खड्डे सिमेंट-काँक्रेटने बुजविण्यात येतील, असा इशारा रवी जाधव व रूपा मुद्राळे यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा