You are currently viewing सावंतवाडीच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी उपायासाठी चराठा-कारिवडे धरण तातडीने पूर्ण करा

सावंतवाडीच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी उपायासाठी चराठा-कारिवडे धरण तातडीने पूर्ण करा

सावंतवाडीच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी उपायासाठी चराठा-कारिवडे धरण तातडीने पूर्ण करा

जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी

चराठा-कारिवडे धरण तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी

सावंतवाडी :

यावर्षी पाऊस कमी झाल्याने सावंतवाडी शहरासह माजगाव, मळगाव, चराठे, कोलगाव, केसरी आदी ग्रामीण भागात आगामी जानेवारीपासून पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. ही भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी चराठा-कारिवडे सीमेवर शासनाने मंजूर केलेले धरण तातडीने कार्यान्वित करावे, अशी मागणी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र प्रभाकर मसुरकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.
सध्या सावंतवाडी शहर तसेच ग्रामीण भागाला कुणकेरी आणि केसरी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यावर्षी पाऊस कमी झाल्याने दोन्ही धरणांमध्ये पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे भविष्यात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते.
सावंतवाडी शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर चराठा-कारिवडे सीमेवर नवीन धरण उभारण्यास शासनाने काही वर्षांपूर्वी मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी जमीनमालकांना शासनाकडून मोबदला देऊन धरणाचे काम तातडीने सुरू करावे. पुढील तीन ते चार वर्षांत हे धरण पूर्ण झाल्यास सावंतवाडी शहरासह लगतच्या ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मोठी मदत होईल, असे मसुरकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
या धरणामुळे भविष्यात सावंतवाडी शहर व ग्रामीण भागाला २४ तास पाणीपुरवठा करण्याची सुविधाही निर्माण होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व अर्थ विभागाकडून या प्रकल्पासाठी विशेष निधीची तरतूद करून धरणाचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी विनंती राजेंद्र मसुरकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा