पं. स.ची मासिक सभा संपन्न
वैभववाडी
कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य यंत्रणेने अधिक सतर्क राहावे. कोरोना रोखण्यासाठी यंत्रणेने अधिक मेहनत घ्यावी. तालुका पुन्हा एकदा करोना मुक्त करूया. असे आवाहन सभापती अक्षता डाफळे यांनी केले.
वैभववाडी पंचायत समितीची मासिक सभा सौ. डाफळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती अरविंद रावराणे, सदस्य मंगेश लोके, हर्षदा हरयाण, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहाय्यक गटविकास अधिकारी शुभदा पाटील व खात्याचे खातेप्रमुख उपस्थित होते. वीज वितरणच्या सुरु असलेल्या कार्यपद्धतीबाबत गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी नाराजी व्यक्त केली. या विभागाने कामकाजात सुधारणा करावी, कंपनीची सुरू असलेली बदनामी थांबवावी. जर वारंवार त्यांच्याकडून कामात हलगर्जीपणा होत असेल तर मग वीज वितरण कार्यालयासमोर झालेले आंदोलन योग्यच. असे म्हणावे लागेल. तालुक्यात कोरोना लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे प्रभारी आरोग्य अधिकारी श्री. पवार यांनी सांगितले. शिमगोत्सव यावर्षी साधेपणाने साजरा करण्यात यावा. शासनाच्या नियमावली चे ग्रामस्थांनी पालन करावे. या काळात गावात कोरोना रुग्ण वाढणार नाही याची खबरदारी गावातील दक्षता ग्राम समितीने घेणे आवश्यक असल्याचे यावेळी श्री परब यांनी सांगितले.
शाळाबाह्य मुले सर्वेक्षणात 573 कुटुंबाचा सर्वे करण्यात आला असून केवळ एक विद्यार्थी शाळाबाह्य आढळून आला. त्याला नजीकच्या शाळेत दाखल करण्यात आले आहे. लोरे हेळेवाडी या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाला असल्याचे गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे यांनी सांगितले. सर्व सदस्यांनी या शाळेचा अभिनंदन ठराव घेतला. आखवणे गुरुववाडीतील मुलांना अर्ध्यावर सोडून चालकाने एसटी मागे का फिरवली. असे प्रकार सहन करणार नाही असे सभापती सौ. डाफळे यांनी ठणकावून सांगितले. यावरती वाहतूक नियंत्रक श्री भोवड यांनी गाडीमध्ये बिघाड झाल्याने गाडी माघारी फिरवण्यात आल्याचे सांगितले. या उत्तरावर सदस्यांचे समाधान झाले नाही. बिघाड झालेली गाडी परत 30 कि.मी. मागे वैभववाडीत कशी आली असा प्रतिप्रश्न हर्षदा हरयाण यांनी उपस्थित केला. वैभववाडी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी श्रीधर साळुंखे, सचिवपदी मोहन पडवळ, उपाध्यक्ष स्वप्नील कदम, खजिनदार प्रा. एस. एन. पाटील यांची निवड झाल्याबद्दल अरविंद रावराणे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. नूतन उपसभापती अरविंद रावराणे यांचे मासिक सभेत अभिनंदन करण्यात आले.