You are currently viewing शिरोडा येथे ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहस्थळी सत्यनारायण पूजेचे आयोजन

शिरोडा येथे ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहस्थळी सत्यनारायण पूजेचे आयोजन

शिरोडा येथे ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहस्थळी सत्यनारायण पूजेचे आयोजन

सन २०३० मध्ये सत्याग्रहाला १०० वर्षे पूर्ण होणार; स्मारकाची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी सार्वजनिक प्रार्थना

शिरोडा :

स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शिरोडा येथील सत्याग्रहस्थळी शुक्रवार, २ ऑक्टोबर रोजी श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. मिठाच्या सत्याग्रहात योगदान देणारे कै. शिवराम गावडे यांचे वंशज श्री. शिवराम (गुंडू) गावडे यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सन २०३० मध्ये ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिरोडा येथील ऐतिहासिक सत्याग्रहस्थळी स्मारक उभारण्याची इतिहासप्रेमी व राष्ट्रभिमानी नागरिकांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी, यासाठी श्री सत्यनारायणाच्या चरणी सार्वजनिक प्रार्थना करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात मिठाच्या सत्याग्रहात योगदान देणाऱ्या ६५० हून अधिक स्थानिक सत्याग्रहींना विद्यार्थी वर्गाच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात येणार आहे. तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना ‘खाल्ल्या मिठाला जागूया!’ या आशयाचे विशेष निवेदन देण्यात येणार आहे.
श्री सत्यनारायण पूजा तसेच श्री ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त सुश्राव्य वारकरी व संगीत भजनांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात दुपारी ३ वाजता होणार असून रात्री १० वाजेपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी ४ वाजल्यापासून भाविकांसाठी तीर्थप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
कार्यक्रमाला मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, माजी आमदार शंकरभाई कांबळी, आमदार वैभव नाईक, जिल्हा नियोजन सदस्य सचिन वालावलकर, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, तसेच दीपक केसरकर, निलेश राणे, ओंकार ओतारी, प्रितेश राऊळ यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार आहेत.
ठिकाण : ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहाचे ठिकाण, शिरोडा, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग.
संपर्क : ७०३८३४३७९१

प्रतिक्रिया व्यक्त करा