राधाकृष्ण गणपतीच्या जयघोषाने भक्तिमय वातावरण; अखंड हरिनाम सप्ताहाला उत्साहात प्रारंभ
घटस्थापना व पोथीपूजनानंतर हरिनामाचा गजर; आकर्षक विद्युत रोषणाई, दिंडी व डबलबारीसह विविध कार्यक्रमांची रेलचेल
सावंतवाडी :
अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने सकाळी श्री राधाकृष्ण गणपतीची पूजाअर्चा भक्तिमय वातावरणात पार पडली. घटस्थापना तसेच पोथीची यथासांग पूजा करण्यात आली. गावच्या मानकऱ्यांनी हा धार्मिक महोत्सव उत्साहात आणि निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी देवतांना साकडे घातले.
यावेळी वीणाधारकांनी वीणेवर हरिनामाचा झंकार केला. फटाक्यांच्या आतषबाजीत “राधाकृष्ण माता आमची उभी देवळात!” असा जयघोष आप्पा पारकर यांच्या सुरात सूर मिसळत उपस्थित भाविकांनी केला. मारुती मेस्त्री यांच्या हरिनामाच्या अभंगांनी आणि खड्या आवाजातील गजराने वातावरण भक्तिमय झाले. युवाईनेही या गजरावर उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
गेल्या दोन दिवसांपासून बालगोपाळ मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते एकदिलाने महोत्सवाच्या तयारीत सहभागी झाले आहेत. प्रत्येक नियोजन आणि कामाची जबाबदारी घेत मंडळाने महोत्सवासाठी जय्यत तयारी केली आहे. नंदू उचले आणि वीरेश रेवडेकर यांनी मंदिरासह संपूर्ण बाजारपेठेत केलेली आकर्षक विद्युत रोषणाई लक्षवेधी ठरली आहे.
दरम्यान, भाजीपाला मित्रमंडळाने सुमारे वीस वर्षांनंतर पुन्हा त्याच उत्साहात एसटी स्टँडसमोर स्वागत कमान उभारली असून, त्यावरील विद्युत रोषणाईही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. महोत्सवाच्या चौथ्या दिवशी अघोरी नृत्य, ढोल-ताशांच्या गजरात विविध देखावे सादर करण्यात येणार आहेत. तसेच रात्री बुवा श्रीकांत शिरसाट आणि बुवा संदीप पुजारे यांच्यात पारंपरिक डबलबारीचा जंगी सामना रंगणार आहे.
याशिवाय भाजीपाला मित्रमंडळाची दिंडी, बालगोपाळ मंडळाची दिंडी तसेच हायस्कूलची दिंडी असे विविध कार्यक्रम होणार आहेत. रात्री उशिरापर्यंत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून, विविध मान्यवर व नेतेमंडळीही या महोत्सवाला भेट देणार आहेत.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी, “आपण बाहेर असलो तरी हे आपले श्रद्धास्थान आहे. हा कार्यक्रम निश्चितच छान होईल. बालगोपाळ मंडळाला आपले कायम सहकार्य राहील,” असे सांगितले.
