हॉस्पिटल परिसर स्वच्छ करून दिल्याबद्दल नगराध्यक्षा श्रद्धा भोसले, आरोग्य सभापती सुधीर आरीवडेकर यांचे आभार
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या मागणीची तत्काळ दखल; नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून हॉस्पिटल परिसराची स्वच्छता
सावंतवाडी:
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने हॉस्पिटल परिसरातील स्वच्छतेसंदर्भात करण्यात आलेल्या मागणीची नगरपरिषद प्रशासनाने तत्काळ दखल घेत परिसर स्वच्छ करून दिला. याबद्दल सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव, रूपा मुद्राळे व लक्ष्मण कदम यांनी नगराध्यक्षा श्रद्धा भोसले आणि आरोग्य सभापती सुधीर आरीवडेकर यांचे मनःपूर्वक आभार मानले.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते हॉस्पिटलमधील विविध समस्या आणि रुग्णांच्या गरजांकडे सातत्याने लक्ष देत असतात. हॉस्पिटलमधील पाणी, वीज तसेच परिसरातील स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत ते गांभीर्याने पाठपुरावा करीत आहेत.
दरम्यान, संस्थेचे सदस्य रवी जाधव यांनी काल नगराध्यक्षा श्रद्धा भोसले व आरोग्य सभापती सुधीर आरीवडेकर यांच्याशी संपर्क साधून हॉस्पिटल परिसरातील स्वच्छतेसाठी सहकार्य करण्याची विनंती केली होती. त्याची दखल घेत नगरपरिषदेने आज कर्मचारी हॉस्पिटलमध्ये पाठवून परिसराची स्वच्छता करून घेतली.
या तत्पर सहकार्याबद्दल रवी जाधव, रूपा मुद्राळे तसेच हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी यांनी नगराध्यक्षा श्रद्धा भोसले व आरोग्य सभापती सुधीर आरीवडेकर यांचे आभार व्यक्त केले.
