You are currently viewing पारंपरिक पदार्थांची दरवळ

पारंपरिक पदार्थांची दरवळ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री सौ. अवनी आदित्य जोशी (दारशेतकर) लिखित अप्रतिम लेख*

 

*”पारंपरिक पदार्थांची दरवळ”*

 

 

गणपती, दसरा, दिवाळीचे दिवस सुरु झाले की, मनात आईने आजीने केलेल्या पारंपरिक पदार्थांची आठवण रुंजी घालू लागते. आणि त्यांच्या हातच्या मायेची चव मनात दाटते. मायेची चव या शब्दातच खूप माया दाटलेली आहे. माझ्या लहानपणी म्हणजे साधारण ९५, ९६ साली आत्ता प्रमाणे फास्ट फूड च प्रस्थ नव्हतंच. सर्व पदार्थ आई आजी घरीच बनवायच्या आणि मायेने सर्व सात्विक जेवण जेवू घालायच्या. त्यांच्या हातचा साधा वरण भात वरून घातलेल तूप मेतकुट आणि घरच लिंबाच लोणचं हे देखील खूप अप्रतिम लागायचं.

 

माझी आजी परसात लावलेल्या अळूच फदफद, खमंग काकडी, वरणफळ हे पदार्थ अप्रतिम बनवायची. घडीघडीच्या पूरण पोळ्या इतक्या अप्रतिम मऊसूत बनवायची की पोळी चा घास जिभेवर ठेवला की लगेचच विरघळायचा. माझी मैत्रीण अनामिका ची आई अप्पे, वाफाळलेली इडली, डाळ तांदुळाचे डोसे असे सगळे उडपी पदार्थ इतके झक्कास बनवायची की दर रविवारी खास हे खाण्यासाठी आम्ही तिच्या घरी हमखास जात असू.

 

माझी आई देखील पारंपरिक सर्व पदार्थ अप्रतिम बनवायची. काजू घातलेला पुलाव, चैत्रातील आंबे डाळ, सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा, उकडीचे मोदक, खमंग थालीपीठ, असे सर्वच पदार्थ तिच्या हातचे अप्रतिम असायचे. दिवाळीतील फराळाची चकली तर खूपच खुसखुशीत असायची. आवळ्याच, ओल्या हळदीच, कैरीचं, लिंबाचं अशी ना ना तऱ्हेची तिने घरी बनवलेली लोणची, मुरांबे तर खास रुचकर असायचे. साबुदाण्याच्या चिकोड्या, बटाट्याचे पापड, गव्हाच्या कुरडया असे वाळवणाचे सर्व पदार्थ आम्ही घरी बनवायचो. उन्हाळ्याच्या सुट्टीतील हा एक आवडता उपक्रम असे.

 

सणासुदीला केला जाणारा नैवेद्यासाठीचा स्वयंपाक तर आमच्यासाठी एक सोहळाच असे. मसाले भात, पुऱ्या, घरी बनवलेल्या चक्क्याचे श्रीखंड, पिवळी धम्मक वरून ओल खोबरे घातलेली बटाट्याची भाजी, आमटी, कोशिंबीर, तळण असे नाना पदार्थ असलेले नैवेद्याचे सजलेले ताट पाहून आनंद होत असे. सर्व पदार्थ आम्ही आवडीने खात असू.

 

मी असे अनेक पारंपरिक आणि नवनवीन पदार्थ माझ्या आई, आजी यांच्याकडून शिकले. त्यांच्या हातची पदार्थांची गोडी चव माझ्या हाती यायला अजून नक्कीच वेळ लागेल. पण स्वयंपाक मनापासून आवडीने बनवायची गोडी मला त्यांच्याकडूनच लागली. खमंग थालीपीठ, चकलीची भाजणी घरी कशी बनवायची हे मी आई कडून शिकले त्याची कृती खाली पाठवत आहे. आजही माझी आई हे सर्व पदार्थ अगदी त्याच आवडीने तसेच रुचकर बनवते.

 

आज जेव्हा मोठेपणी वाढदिवस, कार्यक्रम साजरे करतो तेव्हा खाल्ली जाणारी पावभाजी, पिझ्झा, बर्गर, चायनीज पदार्थ या सर्वांना त्या पारंपारिक चविष्ट पदार्थांची चव नाहीच. म्हणूनच या पारंपरिक पदार्थांची चव मनातील आठवणीत साठून राहिली आहे. मायेची चव या विषयावरून या मनातील सुखद आठवणी आज परत ताज्या झाल्या. आणि पारंपरिक पदार्थांचा दरवळ आज शब्द रुपाने सजला. अश्याच एका पारंपरिक पदार्थाची कृती पुढीलप्रमाणे…

 

खमंग चकली भाजणी ची कृती

 

साहित्य: १ किलो तांदूळ, अर्धा किलो चणाडाळ, पाव किलो उडीद डाळ, १०० ग्रॅम धने, १०० ग्रॅम जिरे, ५० ग्रॅम पोहे

 

कृती: तांदूळ, दोन्ही डाळी धुवून भाजून द्याव्या, धने जिरे पोहे भाजून सर्व थंड करून एकत्रित करावे आणि आणि दळावे. भाजणी तयार. या भाजणीची चकली तसेच थालिपीठ ही उत्तम होते.

 

सौ. अवनी आदित्य जोशी.( दारशेतकर).

पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा