You are currently viewing काव्यसंग्रह: भोवताल
Oplus_16908288

काव्यसंग्रह: भोवताल

*साहित्य प्रेरणा कट्टा आजगाव तथा जागतिक साकव्य विकास मंचच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री सौ स्नेहा नारिंगणेकर लिखित पुस्तक परीक्षण*

 

*काव्यसंग्रह: भोवताल*

✒️कवी: विनय सौदागर, आजगाव

🖊️परीक्षण: सौ.स्नेहा नारिंगणेकर, शिरोडा

प्रकाशक: विघ्नेश पुस्तक भांडार कणकवली

 

साहित्य प्रेरणाकट्टा आजगाव या संस्थेचे संस्थापक… मालवणी कवी विनय सौदागर यांचा “भोवताल “हा, मालवणी कविता संग्रह नसून तो आपल्या कोकणी संस्कृतीचा जणू एक अनमोल असा ठेवा आहे. मालवणी साहित्यातले एक अनमोल रत्नच… या कवितासंग्रहातल्या कविता म्हणजे केवळ शब्दांची जुळवा जुळवा नसून मालवणी लाल मातीशी, तिथल्या संस्कृतीशी,निसर्ग आणि साध्या भोळ्या माणसांशी जोडलेलं घट्ट नातं आहे. कवी विनय सौदागर यांनी आपल्या आजूबाजूला जे जे बघितले अनुभवले ते अत्यंत प्रांजळपणे या कवितासंग्रहात मांडले आहे आपल्या भोवतालच्या गोष्टींचे बारीक नजरेने निरीक्षण करून त्यातली सुंदरता आणि त्याबरोबर त्यातली वेदना आणि चटके देणारे वास्तव खूपच सहजपणे मांडले आहे.

या कवितासंग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे अस्सल मालवणी भाषेचा वापर…. आणि कदाचित त्यामुळेच त्यातले खरे भाव थेट काळजाला भिडतात… मालवणी भाषा ही फक्त संवादाची बोलण्याची भाषा नसून, ती उच्च दर्जाचे साहित्य निर्माण करू शकते उच्च दर्जाच्या काव्याची भाषा होऊ शकते याचे आदर्श उदाहरण म्हणजे “भोवताल” होय… या कवितासंग्रहात कोकणचा निसर्ग एक पार्श्वभूमी म्हणून येत नाही तर एखाद्या पात्रासारखा वावरतो… इथली लाल माती,इथला पाऊस, निसर्गाच्या कुशीत जगणारा सामान्य माणूस, त्याच्या जगण्यातला संघर्ष, त्याची ग्रामीण संस्कृती, सणवार, देव, रूढी परंपरा, गावकी, छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद, त्याचबरोबर गरीबी, दारिद्र्य, दुःख, वेदना, हे सर्व या संग्रहात प्रभावीपणे मांडलेले दिसते.

कवीने आपल्या या कवितांमधून सभोवतालच्या बदलत्या परिस्थितीवर भाष्य केले आहे… जुन्या परंपरा, बदलणारी गाव, आणि माणसाच्या मनातले हळवे कोपरे यांचे दर्शन यात घडते.

विनय सौदागर यांच्या कवितांमधून निसर्ग फक्त वाचायला मिळत नाही तर तो आपल्याशी बोलतो, गप्पा मारतो… पावसात भिजलेली गाव.. उधाणलेला समुद्र.. खळखळणारे ओहोळ.. आणि या सगळ्यांच्या सोबतीने जगणारा सामान्य माणूस… त्याच्या जगण्यातला संघर्ष आणि त्याची सुखदुःख कवीने आपल्या कवितांमधून मांडली आहेत…

अस्सल मालवणी भाषेमुळे या कविता जिवंत तर वाटतातच पण आपल्या आजूबाजूचा सभोवतालचा परिसर आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो… भोवताल मधली माणसे, त्यांचा एकटेपणा, नात्यातली उब, समाजातले बदल आणि निसर्गाशी असलेले त्यांचे संबंध सगळ्यांचा सुंदर संगम कवीने मोठमोठ्या शब्दांत न मांडता अगदी मुक्तछंदात सोप्या साध्या शब्दात खोल अर्थ मांडले आहेत….

आता थोडं एका कवितेच रसग्रहण करू

घराक लागली घर घर..

उतार होतो छपराक तरी..

मोठ्या पावसात गळा..

गीमात होतो माठव आणि

सारयलेला खळा..

या कवितेत कवीने पूर्ण बदलत्या काळाचे वर्णन केले आहे

घर म्हणजे पहिली खोप.. चुडताचा छप्पर.. नंतर मातीची भिंत.. वर कौला.. उन्हाळ्यात परतुची लागत.. नंतर दगडी भिंतीवर मंगलोरी कौल.. वळय,लोटो, रांचीकुडी, बाळंतिणीची खोली,असं सगळं वर्णन… या चार कडव्यांच्या कवितेत बघायला मिळतो. नंतर बदलत्या काळानुसार सुख सोयी.. उत्क्रांतीचे टप्पे अत्यंत प्रभावीपणे मांडले आहेत. हा प्रवास गरीबी कडून श्रीमंतीकडे झालेला बदल नसून, निसर्गाच्या सानिध्याकडून सिमेंटच्या जंगलाकडे झालेला प्रवास आहे. या कवितेत काळजाला भिडणारा भाग म्हणजे पूर्वी घराची छप्पर कच्ची होती पण त्या घरात राहणारी माणसं व त्यांच्यातील प्रेम मात्र पक्क होत. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घरातला कोपऱ्यान कोपरा माणसाच्या आवाजाने घुमत होता… आता मात्र आत राहायला माणसं उरली नाहीत.. सुसज्ज घरांना कुलूप दिसतात… समृद्धी असूनही दिसणाऱ्या या दारिद्र्यामुळे घराचे जिवंतपणा हरवलेल आहे.

थोडक्यात कवींना काय सांगायचे आहे तर प्रगती अनिवार्य आहे पण.. आपल्या गावाचा आणि नात्यांचा विसर पडू नये..

आसरो म्हणून बांधला घर..

तिचं झाली मठी

उमेद सोपान थरथरताहा

म्हाताऱ्याची काठी

थोडक्यात काय तर घरात लागली घर घर… म्हणजे घराची दुरवस्था नाही तर माणसांशिवाय वास्तूचे घरपण हरवणं…

तसेच गावातले देव देवस्की कुळाचार यांचे वर्णन “अवसार पण कडकलो” या कवितेतून खूपच छान केले आहे.

“चाकरमानी इलो”.. पावस यत्ताहा… पाऊस इलो…होऊर.. गटारी अमावास्या… वडाची पुनाव… भजनाचे मेळ…गावचोसप्ता…दशावतार…जत्रा.. सिगमो.. गावातली निवडणूक… पदाधिकारी..स्वच्छता.. या सगळ्याच वर्णन तुम्हाला या कवितासंग्रहात वाचायला मिळेल.

शेवटी..थकलेला मालवणी जीव

माझा मालवणी मुलुख

तेव्हा आणि आता

अशा या 42 मालवणी कविता वाचताना आपण आपल्याच वाडीत बाहेर ओसरीवर बसून गजाली मारतो असं नक्कीच वाटतं….

अशा हा लाल मातीच्या मालवणी माणसाच्या वास्तवाचे चित्र अनुभवताना कवितासंग्रहत मालवणी भाषेचे अमृत चाखायला मिळते… या पूर्ण काव्यसंग्रहात मला जाणवलेले खास वैशिष्ट्य म्हणजे….. मालवणी कविवर्य विनय सौदागर यांनी….गावातल्या कष्टकरी हातांना आणि निसर्गाशी असलेल्या नात्याला दिलेली ही एक सुंदर भावपूर्ण मानवंदना आहे….

 

सौ.स्नेहा धोंडू नारिंगणेकर

शिरोडा सिंधुदुर्ग

7066998796

प्रतिक्रिया व्यक्त करा