You are currently viewing मिशन आयएएस विद्यार्थ्यांना जागे करण्याचे काम करीत आहे 

मिशन आयएएस विद्यार्थ्यांना जागे करण्याचे काम करीत आहे 

मा. मुख्य सचिव श्री विश्वनाथ शेगावकर यांचे प्रतिपादन

अमरावती :

अमरावतीची डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी मिशन आयएएस या उपक्रमाच्या अंतर्गत स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून जागृत करण्याचे महत्त्वाचे काम करीत आहे. गेल्या 26 वर्षांत या संस्थेने केलेले कार्य निश्चितच गौरव आस्पद आहे. या संस्थेने सर्वच बाबतीत उच्चांक गाठलेला आहे. या संस्थेच्या पाठीशी मी होतो आहे आणि राहणारही आहे असे गौरव उद्गार तामिळनाडूचे मा. मुख्य सचिव श्री विश्वनाथ शेगावकर यांनी आज अमरावती येथे काढले. अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीने मिशन आयएएस अंतर्गत जिजाऊ नगर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून सहसचिव म्हणून सेवानिवृत्त झालेले सुप्रसिद्ध सनदी अधिकारी व लेखक श्री राजाराम जाधव हे होते तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनंदन बँकेचे श्री सुदर्शन जैन आकाशवाणीचे कार्यक्रमाधिकारी एड.आशिष गावंडे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख पं. भोजराज चौधरी व व मिशन आयएएसचे संस्थापक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे हे उपस्थित होते.

 

याप्रसंगी सर्वश्री रमेश गोटखडे सौ.प्रभाताई आवारे सुधीर चक्रे व चिंतामण खोब्रागडे यांनी पाहुण्यांचे पुस्तक देऊन स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात सहसंयोजक श्री चिंतामण खोब्रागडे यांच्या प्रस्ताविकाने झाली. श्रीमती प्रभाताई आवारे यांनी पाहुण्यांचा परिचय उपस्थित यांना करून दिला. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र बँकेचे राज्य पुरस्कार प्राप्त श्री हर्षल बनसोड श्री शिवाजी शिक्षण संस्थेमधील आदर्श प्राध्यापक श्री गजानन भारसाकळे तसेचपं. प्रा. डॉ. भोजराज चौधरी यांचा मा. मुख्य सचिव श्री विश्वनाथ शेगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

याप्रसंगी अभिनंदन बँकेतर्फे श्री सुदर्शन जैन सावित्रीबाई फुले स्मारक समितीतर्फे श्री प्रवीण वासनिक ग्राहक मंचातर्फे श्री अशोक हांडे महिला व बालकल्याण समितीतर्फे श्रीमती प्रभाताई आवारे महाराष्ट्र बँक माजी अधिकारी संघटनेतर्फे श्री हर्षल बनसोड व श्री बी डी मनोरे यांनी देखील श्री विश्वनाथ शेगावकर यांचा सत्कार केला.

 

सुमारे दोन तास चाललेल्या या कार्यक्रमाला श्री विश्वनाथ शेगावकर यांनी आपला जीवन प्रवास उलगडून दाखविला .आपण प्रशासनात असताना घेतलेल्या विविध निर्णयांचे त्यांनी यावेळी श्रोत्यांना अवलोकन करून दिले. भारताचे माजी निवडणूक आयुक्त श्री टी.एन.शेषन व आयएएस अधिकारी श्री अरुण भाटिया यांच्या संदर्भातील काही प्रसंगाचे त्यांनी याप्रसंगी निवेदन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री राजाराम राठोड यांनीपुसद ते मुंबई या आपल्या सहसचिव पदापर्यंतच्या प्रवासाची माहिती प्रभावीपणे सादर केली. कार्यक्रमाचा समारोप श्री सुधीर चक्रे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व रसिकांना डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीतर्फे प्रकाशित पुस्तकांचा एक एक संच भेट देण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा