You are currently viewing दीवान – ए – उर्मिला

दीवान – ए – उर्मिला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा गझल प्राविण्य, गझल मंथन समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शोभा वागळे लिखित गझलसंग्रह रसग्रहण*

 

*दीवान – ए – उर्मिला* 

🖊️गझलकार: उर्मिला बांदिवडेकर

 

गझल सम्राट आदरणीय श्री सुरेश भट साहेबांनी गझल ह्या काव्य प्रकाराला नावलौकिक मिळवून दिला.

त्यांनी अनेक नवोदितांच्या रचनांना पत्रांद्वारे इस्लाह करून बरेच गझलकार /गझलकारा तयार केले. गझल एक काव्यप्रकार आहे. जो कोणी तिच्या प्रेमात पडून वेडा होतो त्यालाच ती वश होत असते. गझल ही सहजा सहजी कुणाला लिहिता येत नसते. गझलेत वेडा झालेलाच गझलेचा सतत प्रवास करत असतो आणि त्या प्रवासातूनच गझलेचा एक प्रकार ‘दीवान’ याची निर्मिती होत असते.

 

दीवान संग्रहात गझल ही रदीफसह, म्हणजे ‘मुरद्दफ’, गझल असते. मुरद्दफ गझलांच्या संग्रहात अंत्य यमक हे बाराखडीतले कोणतेही व्यंजन व दोन स्वर घेऊन रदीफचे शेवटचे अक्षर असलेली गझल असते. इथपर्यंत मजल मारून गझल दीवान संग्रह लिहिणे हा जीवनातला मैलाचा दगडच म्हणावा लागेल.

मुळात दीवान हा प्रकार उर्दू गझल विश्वातला असून उर्दूमध्ये जवळ जवळ ७६ दीवानकारांचे दीवान आहेत त्या मानाने मराठी साहित्यात कमी असले तरी सध्या दीवान साहित्य कृती झपाट्याने वाढत आहे. त्यामध्ये आपल्या सर्वांच्या गुरूवर्या आ. उर्मिला बांदिवडेकर म्हणजेच ‘माई’ ह्यांचा दीवान हा आठवा दीवान आहे.

 

मराठी भाषेत दीवानचा पहिला प्रयोग करणारे आ. जेष्ठ गझलकार ए.के. शेख सरांचा ‘अमृताची पालखी’ ११/११/२०१७

दुसरा, प्रशांत पोरे सरांचा, ‘दीवान-ए-प्रशांत’ १५/४/२०२१

तिसरा, सौ. मीना संजय शिंदे ह्यांचा ‘दीवान-ए-मीना’ १५ /४/ २०२२

चौथा दीवान, आ. ए.के.शेख सरांचा (दुसरा)-‘दीवान-ए-ए.के’ २५/२/२०२३

पाचवा दीवान, जगन अवजारांचा

‘दीवान- ए-जगन’ ६/११/ २०२३

सहावा दीवान, सिराज शिकलगार सरांचा

‘दीवान-ए-सिराज’ २४ /१२/ २०२३

सातवा दीवान, संगीता जोशी मॅडमचा ‘दीवान-ए-संगीता’ २३/११/ २०२४

आठवा आ. उर्मिला बांदिवडेकर माईचा आणि नववा डॉ. शरयू शहा ह्यांचा.

अजून बरेच दीवान निर्मितीसाठी तयार होत आहेत. ते लवकरच प्रकाशित होतील ह्यात शंका नाही.

 

दीवान म्हणजे या संग्रहात सगळ्या गझला केवळ मुरद्दफ गझला असतात. गैरमुरद्दफ गझल मुळीच नसते. अशा गजलात काफिया (उपांत्य यमक) आणि रदीफ (अंत्य यमक) अशा दोन्ही प्रकारची यमके असतात. रदीफ म्हणजे अंत्य यमकाचे शेवटचे अक्षर हे मराठी भाषेतील वर्ण मालेतल्या प्रत्येक अक्षरांचे असावे लागते. मराठी भाषेतील ३५ व्यंजने व ‘ऊ’ आणि ‘ई ‘ हे दोन स्वर मिळून ३७ वर्ण होतात. बाराखडीतले कोणतेही व्यंजन आणि ई, ऊ हे दोन स्वर घेऊन रदीफचे शेवटचे अक्षर असलेली गझल दीवानात असते. अशा ३७ रदीफ असलेला संग्रह म्हणजे दीवान म्हटला जातो. गझलकार आपल्या बुध्दीमत्तेचा उपयोग करून असा प्रकार असलेल्या एकाहून जास्त गझला करत असतात. माईंनी सुध्दा प्रत्येक वर्णाच्या प्रत्येकी सहा गझला दीवानमध्ये समाविष्ट केल्या आहेत.

 

दीवान संग्रहास गझलकाराचे नाव शीर्षकात लिहिण्याचा रिवाज आहे. म्हणजे “दीवान-ए- उर्मिला”, “दीवान -ए सिराज” अशा प्रकारे. माईच्या “दीवान-ए- उर्मिला” या संग्रहात मराठी वर्ण मालेतील ३७ मुळाक्षरांच्या प्रत्येकी ६ अशा एकूण २२२ गझला असून त्या मध्ये अक्षरगण वृत्तातील १५५ व मात्रा वृत्तातील ६७ गझला आहेत. त्यांनी गझलेत १०३ वृत्ते वापरली आहेत. त्यापैकी ८९ अक्षरगण वृत्ते आणि १४ मात्रा वृत्ते आहेत.

 

‘दीवान-ए-उर्मिला’ या संग्रहास आद्य गझल संशोधक आ. डॉ. अविनाश सांगोलेकर सरांनी प्रस्तावना लिहिली आहे.

विश्व गझल परिषदेचे अध्यक्ष आ. डॉ. शेख इक्बाल मिन्ने सरांनी विशेष अभिप्राय आणि दीवानची पाठराखण देऊन संग्रहाचे वैशिष्ट्य कथित केले आहे.

 

त्याच प्रमाणे गझलकार आ. प्रा. डॉ. रेणुका भ. भारस्वाडकर सर, आ. गझलकार व समीक्षक बदीउज्जमा बिराजदार (साबिर सोलापुरी) सर, गझलकार नि मार्गदर्शक आ. अरूण सावंत सर(अशंसा) आणि लेखक, गझलकार, मार्गदर्शक व प्रकाशक (बाजीगर प्रकाशन) आ. सिराज शिकलगार सर इत्यादींनी शुभेच्छा व अभिप्राय दिले आहेत.

 

माईंनी दीवान-ए- उर्मिला सोबत अजून अकरा गझल संग्रह प्रकाशित केले आहेत. सुरूवातीचा त्यांचा पहिला गझल संग्रह आणि आताचे अकरा गझल संग्रह जरी असले तरी ‘दीवान -ए-उर्मिला’ मध्ये त्यापैकी एकाही गझलेची पुनरावृत्ती झालेली नाही. मी माईंच्या पहिल्या ‘उर्मिला’ संग्रहाचे समीक्षण केले होते आणि आता माईंनी दीवान सोबत अकरा गझल संग्रह मला पाठवले, त्यामुळे सगळे संग्रह वाचता आले.

 

माईच्या दीवानच्या गझलांमध्ये विविध पैलू दिसून येतात. प्रेम, राग, रूसवा, वेदना, विरह, नात्यामधली माया, कधी वेदनेचा सौम्य उद्रेक, स्त्री मनाच्या भावना, आशा, कोमलता इत्यादी. त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी, समाजातले आजचे वास्तव अशा विविध आशयावरचे खयाल गझलेत घेतलेले आहेत. माईंनी ऐंशीव्या वर्षांत पदार्पण केल्याने त्यांच्या जीवन अनुभवातल्या असंख्य, न बोलता, न सांगता येणाऱ्या भावना, गझलेतल्या शेरांच्या टप्पातून वाचकांसमोर प्रकट केल्या आहेत.

 

माई सुरूवातीला वृत्तबद्ध कविता करत होत्या. मराठी विषयाच्या शिक्षिका, त्यात मराठी विषयात एम.ए. पदवी संपादन केलेल्या. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्याने त्यांची लेखन निपूणता, शब्दांचे सामर्थ्य, गझलांचे सौंदर्य, सुबकता, व प्रभूत्व पण दिसून येत आहे.

 

आता आपण माईंच्या दीवानमधल्या गझला पाहुया. दीवानातील प्रत्येक गझलेवर वृत्तनाम, मात्रांची संख्या व लगावली लिहिली आहे. अक्षरगण व मात्रावृत्त कोणती वापरली आहेत त्यांची यादी नमूद केली आहे. वृत्ते लहान मोठी दोन्ही प्रकारची हाताळलेली आहेत.

 

अनुक्रमामध्ये, रदीफ वर्ण, वृत्ताचे नाव, वृत्त प्रकार अन् पृष्ठ क्रमांकाचीही नोंद दिली आहे. दिवानमध्ये काही पाच तर काही नऊ शेरांच्याही गझला आहेत.

 

आजच्या वास्तवावर प्रकाश टाकणारा नि प्रेमी युगलांवर भाष्य करणारा माईंचा लवंगलता वृत्ततला शेर बघा :-

*प्रेमप्रकरणे गाजत जाती ब्रेकपही गाजतसे*

*फुलण्याआधी अशी कशी ही प्रेमाचीच इतिश्री*

 

वर्षा वृत्तातल्या ‘काय फायदा’ ह्यातला शेर एका स्त्रीच्या स्वभावाचे चित्रण करतो. स्त्रीमध्ये असलेली सहनशीलता तिला जुई प्रमाणेच गंधित नि घर प्रसन्न ठेवण्यास भाग पाडते. तो शेर पहा :-

*वरवर हसते अन् भासवते मी सुखी*

*दु:खामध्ये बुडून सुद्धा ही जुई*

 

आनंदकंद वृत्तातला ‘ऐकणारा भाऊ’ ह्या गझलेतला शेर बघा :-

*माया सरून गेली अन् स्नेह आटला का*

*घालून घाव मोठा गोंजारणारा भाऊ*

बहीण भावाचे प्रेमळ नाते. पण वर्षे सरू लागली की ती माया, ते नाते, कुठे तरी हरवत असते. का बरे असे होत असते? कसा नाहीसा होतो तो स्नेह?

 

माणसाने कठीण परिस्थितीतही निराश न होता झाडाप्रमाणेच, म्हणजे जसे पानगळ झाली तरी नवी पालवी येणारच हे झाडाला माहीत असते, त्यामुळे ते पानगळीचे दु:ख करत नाही. हे आपण लक्षात घेऊन जीवनात झाडाप्रमाणेच आनंदी रहावे असे सांगणारा ‘चंद्रकांत’ ह्या मात्रा वृत्तातला शेर पहा :-

*वय कुठलेही असो तरीही झाडासम जगुया* *पानगळीनंतर आनंदे सळसळून जाऊ*

 

स्त्री ही नेहमी पुरुषांच्याच तालावर वावरत असते. वडील, भाऊ, नंतर नवरा, सासरे इत्यादी. पण गझलकारा आपल्या शेरातून सांगू इच्छितात की बास झाले दुसऱ्याच्या तालावर वावरायचे आता. स्वत:च्या मनाला पटेल, आवडेल असेच मस्त कलंदराप्रमाणे जीवन जगायचे अस सांगणारा शेर :-

*तुझ्याच तालावरी कशाला नाचायाचे*

*कलंदरासम फिरेन आता माझी इच्छा*

 

तसेच बाईचे संस्कारांचे थोर गूण व तिचे वैशिष्ट्य सांगून कौतुक करणारा अनलज्वाला मात्रा वृत्ताला हा शेर पहा :-

*जपते साऱ्या घरदाराला लळा लावते*

*संस्कारांचे वैभव असते बाई म्हणजे*

 

“घेईन कष्ट सारे” ह्या शीर्षकाच्या आनंद + साला वृत्तातल्या गझलेचा शेर मनाला किती भिडतो बघा!

*जाऊ नकोस पुत्रा तोडून लळा माया*

*खाल्ल्यात फार खस्ता जागून तुझ्यासाठी*

 

आजच्या वास्तवावर प्रकाशझोत टाकणारा हा शेर. आई वडील मुलांचे मोठ्या कष्टांनी पालन पोषण करतात. मुलांना उच्च शिक्षित करतात. पण त्यांना पंख फुटले की ती मुले उडून जातात, तर काही आईवडिलांना वृद्धाश्रमात लोटतात. आईच्या मायेची, कष्टांची, त्यांच्या लेखी काही किंमत नसते. अतिशय हृदयस्पर्शी असा हा शेर.

 

शिक्षणात पहिला नंबर म्हणून हुरळून जाऊन काय फायदा शेवटी ‘शाळेमधला मुलगा ढ’ जीवनात बाजी मारून राजकीय व्यासपीठ गाजवणारा ठरतो. आजच्या आपल्या राजकीय वास्तवावर प्रकाशझोत टाकणारा शेर मला खूप आवडला तो बघा :-

*व्यासपीठ हे गाजवतो तो गर्दीमधले मी टिंब*

*पाहून मला उदास हसला शाळेमधला मुलगा ढ*

 

माईच्या बऱ्याच गझला लांब, मोठ्या रदीफाच्या वाचनात आल्या. त्यावरून गझल गुरूंनी व काही गझल पुस्तकातून वाचलेले आठवले ते स्पष्ट करू इच्छिते.

 

असे सांगण्यात आणि वाचण्यात आले की गझलेमध्ये रदीफ मोठा घेतल्यास बऱ्याच अडचणी येऊ शकतात. प्रत्येक ओळीची लांबी आधीच ठरून गेल्याने रदीफच्या मागे चपखल बसेल आणि रचनेचा अर्थ पूर्ण करेल असा योग्य काफिया शोधणे गझलकाराला कठीण होऊ शकते आणि त्या कारणाने गझलेस मोजकेच शेर घ्यावे लागतात. तसेच गझलेचे वृत्त सांभाळून गझलकार /गझलकारास स्वतःचे मुख्य विचार मांडण्याचा प्रश्न उद्भवू शकतो. गझलेत कृत्रिमता आणि पुनरावृत्ती जाणवू शकते.

 

गझल सादरीकरणात श्रोत्याचे लक्ष उला ओळीपेक्षा सानीवरच जास्त आकर्षित होऊ शकते व गझल कृत्रिम वाटू शकते. जेवढा रदीफ लहान तेवढे गझलकार/गझलकारास स्वतःचे विचार मांडायला जास्त मुभा मिळू शकते. मोठा रदीफ बरोबर हाताळण्यासाठी गझलकाराचे भाषेचे उत्कृष्ट कौशल्य आणि शब्दांवर मजबूत पकड असावी लागते.

 

माईच्या “दीवान_ ए_ उर्मिला” ह्या संग्रहात माईनी बरेच मोठे रदीफ घेऊन गझला लिहिल्या आहेत. त्या गझला वाचल्यावर वाचकांना आ. माईंचे मराठी भाषेवरचे प्रभुत्व आणि त्यांच्या गझलेतले श्रेष्ठत्व नक्कीच अनुभवता येईल ह्यात शंकाच नाही.

 

माईच्या दीवान मधल्या मोठा रदीफ घेतलेल्या गझलांचे काही शेर बघुया :-

*’बाई’ म्हणुनी सोसत जाते गिळून घेते आवंढा*

*’आई’ म्हणुनी सोसत जाते गिळून घेते आवंढा*

 

*आईसम ती माया करते ठरते आहे पण परकी*

*’माई’ म्हणुनी सोसत जाते गिळून घेते आवंढा’*

 

*जीवनाला शांतचित्ते पाहतो आहे तटस्थ*

*मी जगाला शांतचित्ते पाहतो आहे तटस्थ*

 

*जादू झाली अशी कशी ही भान जगाचे मुळी न उरले*

*लाजत होते धुंद चांदणे तू आल्यावर सखये येथे*

 

*दागदागिने कितीही तिला मी दिले तरी*

*सजून म्हणते सखी साजरी मज आणा नथ*

 

अशा मोठा रदीफ घेतलेल्या गझला आपणास दीवानमध्ये खूपच वाचायला मिळतील. अवश्य वाचाव्या.

 

माईच्या दीवानातील भावविश्व अतिशय विस्तृत आहे. त्यांच्या गझला विविध खयालांच्या आहेत. तसेच माईच्या ऐंशी वर्षांच्या जीवन प्रवासातले विविध पैलू, वेगवेगळ्या आठवणी, अनुभव, जीवनात बदलणाऱ्या टप्प्याचे निरीक्षण, शांती, प्रेम, राग, लोभ, स्त्रिच्या अंतरमनाच्या गाथा अशा खयालांनी सजलेल्या गझला दीवानात समाविष्ट आहेत.

 

*दीवान -ए-उर्मिला* हा गझल संग्रह सर्वांनी वाचावा आणि नवोदितांनी तर स्वत:च्या गझल अभ्यासासाठी जरूर बाळगावा.

 

*दीवान_ए_उर्मिला…उर्मिला बांदिवडेकर*

 

*प्रकाशन… बाजीगर प्रकाशन*

*प्रकाशक…सिराज शिकलगार*

(लेखक, प्रकाशक, श्रेष्ठ गझलकार)

*प्रस्तावना… डॉ.अविनाश सांगोलेकर*

(आद्य मराठी गझलसंशोधक)

*पाठराखण… डॉ.शेख इक्बाल मिन्ने*

(विश्व गझल परिषद अध्यक्ष)

*समीक्षण …शोभा वागळे*

पुणे.

‌‌ 8850466717

प्रतिक्रिया व्यक्त करा