सामंजस्य कराराची प्रक्रिया पूर्ण; पुढील २४ महिन्यांत ५० खोल्यांचे पंचतारांकित हॉटेल पूर्ण करण्याचे नियोजन
देवगड : जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील प्रसिद्ध कुणकेश्वर येथे ‘ट्री ऑफ लाईफ’ या ताज हॉटेल्स ब्रँडच्या आलिशान हॉटेलची उभारणी केली जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबतचा करार मंत्रिमंडळातील दालनात पार पडल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. एकूण ५० खोल्यांचे हे पंचतारांकित हॉटेल पुढील अवघ्या २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यापूर्वी सिंधुदुर्गमधील शिरोडा-वेलागर येथे ताज ग्रुपचे हॉटेल साकारले असून, आता कुणकेश्वरमध्येही प्रकल्प सुरू होत असल्याने देवगडसह संपूर्ण सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला मोठी गती मिळणार आहे. यामुळे स्थानिक पातळीवर तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, नव्या व्यवसायांच्या संधी निर्माण होतील आणि जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नातही लक्षणीय भर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोकणातील निसर्गसौंदर्याला अशा जागतिक दर्जाच्या सुविधांची जोड मिळाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा देश-विदेशातील पर्यटकांसाठी एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येईल, असेही ते म्हणाले.
या करारप्रसंगी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह ताज ग्रुपचे प्रतिनिधी तन्वीर जाहीदी, दत्तात्रय हिरे आणि रोहन रानडे उपस्थित होते.
