‘Basics of GST’ अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण; पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि सॅनिटरी पॅड-डायपर विल्हेवाटीच्या सर्वेक्षणाचा संकल्प
मालवण :
कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे अकाउंटन्सी अँड कॉमर्स विभाग, कॉमर्स असोसिएशन आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच एशियन इन्फोटेक, मालवण यांच्या सहकार्याने ‘डिजिटल साक्षरता, पर्यावरण जनजागृती आणि Basics of GST’ या उपक्रमांतर्गत प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या डिजिटल क्लासरूममध्ये झालेल्या या कार्यक्रमास १०२ विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि NSS स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकाउंटन्सी अँड कॉमर्स विभागप्रमुख तसेच NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. सुमेधा नाईक यांनी केले. विद्यार्थ्यांना GST विषयाचे केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता त्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने ‘Basics of GST’ या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली. एशियन इन्फोटेकच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आला असून आतापर्यंत ९३ विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना GST विषयातील संकल्पना प्रत्यक्ष कामाच्या स्वरूपात समजून घेण्याची संधी मिळाली, असे डॉ. नाईक यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉ. नाईक यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. गणेशमूर्तीची सजावट करताना प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करावा, असे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवानंतर निर्माण होणाऱ्या निर्माल्याचा योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी निर्माल्यातील फुलांपासून रांगोळी तयार करण्याची अभिनव संकल्पनाही त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली. विद्यार्थ्यांनी निर्माल्यातील फुलांपासून रांगोळ्या तयार करून त्यांचे छायाचित्र शेअर करावे, असे आवाहन त्यांनी केले.
गणेश विसर्जनाच्या वेळी निर्माल्य नदी, ओढे किंवा अन्य जलस्रोतांमध्ये टाकण्याऐवजी गावागावांत निर्माल्य कलशाची व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. निर्माल्य जमा करताना त्यातील प्लास्टिक, अगरबत्तीची पाकिटे तसेच सजावटीचे प्लास्टिक साहित्य वेगळे करावे आणि त्याची योग्य विल्हेवाट लावावी, असे आवाहन त्यांनी केले. NSS स्वयंसेवक तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हा पर्यावरणपूरक उपक्रम आपल्या गावांमध्ये राबवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एशियन इन्फोटेक कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटरच्या सौ. वैशाली जुवेकर व श्री. राजाराम जुवेकर तसेच सामाजिक कार्यकर्त्या ॲड. रुपाली पाटील यांचे प्रभारी प्राचार्य कैलास राबाते यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
डिजिटल साक्षरतेवर मार्गदर्शन करताना सौ. वैशाली जुवेकर यांनी विद्यार्थ्यांनी केवळ स्मार्ट मोबाइलचा वापर करणारे न राहता स्वतःही ‘स्मार्ट’ आणि डिजिटलदृष्ट्या सजग होणे आवश्यक असल्याचे सांगितले. इंटरनेटचा वापर करताना विविध प्रकारच्या डिजिटल फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले. वैयक्तिक माहिती, पासवर्ड आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित माहिती अनोळखी व्यक्ती किंवा संशयास्पद संकेतस्थळांवर शेअर करू नये. इंटरनेटवर वावरताना आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाविद्यालय आणि अकाउंटन्सी अँड कॉमर्स विभागाने विद्यार्थ्यांना GSTचे व्यावहारिक प्रशिक्षण मिळावे यासाठी एशियन इन्फोटेकच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी महाविद्यालयाचे आभार मानले. केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून पदवीसोबत ज्ञान आणि कौशल्यांची जोड असणे आवश्यक आहे. ज्ञान, कौशल्य आणि तंत्रज्ञान यांचा योग्य समन्वय साधल्यास विद्यार्थ्यांना करिअरमध्ये निश्चितच यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांसाठी भविष्यातही विविध अभिनव अभ्यासक्रम सुरू करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
ॲड. रुपाली पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलतेचे महत्त्व अधोरेखित केले. वेंगुर्ले येथे दिव्यांग पालकांसाठी ‘साहस प्रतिष्ठान’ या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या ॲड. पाटील यांनी आपल्या कुटुंबात किंवा आजूबाजूच्या परिसरात दिव्यांग व्यक्ती असल्यास त्यांच्याप्रती संवेदनशील आणि सजग राहण्याचे आवाहन केले. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण, कायदेविषयक बाबी किंवा रोजगारासंदर्भात कोणतीही अडचण असल्यास त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
‘Basics of GST’ अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांपैकी वेदान्त कुपकर, सानिया चव्हाण आणि साक्षी भाऊ परब यांनी मनोगत व्यक्त केले. अभ्यासक्रमादरम्यान मिळालेल्या प्रत्यक्ष प्रशिक्षणामुळे GST विषय अधिक सहज आणि व्यावहारिक पद्धतीने समजून घेता आल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाबाबत दिलेल्या अभिप्रायाचे व्हिडिओही यावेळी डिजिटल क्लासरूममधील स्मार्ट बोर्डवर दाखविण्यात आले.
यावेळी विक्टर डांटस लॉ कॉलेजची विद्यार्थिनी आणि समंतक प्रतिष्ठान, धामापूर येथे इंटर्न म्हणून कार्यरत असलेल्या श्रुती पाटील हिने NSS स्वयंसेवकांना सॅनिटरी पॅड, लहान मुलांचे डायपर आणि ज्येष्ठ नागरिकांचे डायपर यांच्या विल्हेवाटीबाबत करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाची माहिती दिली. गावागावांत या कचऱ्याची विल्हेवाट कोणत्या पद्धतीने लावली जाते, यासंदर्भात माहिती संकलित करण्यासाठी सर्वेक्षण फॉर्म कसा भरून घ्यावा, याबाबत तिने विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. NSSच्या माध्यमातून पुढील पंधरा दिवसांत हा सर्वेक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहे.
यानंतर ‘Basics of GST’ अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य कैलास राबाते यांनी डिजिटल साक्षरता, पर्यावरण जनजागृती आणि GSTसारख्या कौशल्याधारित अभ्यासक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या ज्ञानासोबतच त्यांची कौशल्ये आणि सामाजिक जाणीव विकसित करणारे विविध अभिनव उपक्रम अकाउंटन्सी अँड कॉमर्स विभाग आणि NSSच्या माध्यमातून सातत्याने राबवावेत, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या सौ. वैशाली जुवेकर, श्री. राजाराम जुवेकर, ॲड. रुपाली पाटील, प्रभारी प्राचार्य कैलास राबाते, डॉ. मल्लेश खोत, डॉ. हंबीरराव चौगले, प्रा. रामचंद्र तावडे, प्रा. योगिता सावंत आणि दीक्षा मालवणकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. योगिता सावंत यांनी प्रभावीपणे केले, तर प्रा. रामचंद्र तावडे यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. सुमेधा नाईक, प्रा. रामचंद्र तावडे आणि प्रा. योगिता सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. अपूर्वा पालव, रिद्धी काजरेकर, हर्षद पाटकर आणि गौतम मानवर यांनी नियोजनात सहकार्य केले. हेमांगी चव्हाण, रिद्धी केळुसकर, सोहम भोगले, वेदान्त कुपकर, पप्पूकुमार यादव, पार्थ तावडे, प्राची गावडे, अथर्व कुपकर, जगदीश कीर, दुर्वा चव्हाण, राधाकृष्ण मालंडकर आदी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच सॅनिटरी पॅड आणि डायपरच्या विल्हेवाटीबाबतच्या सर्वेक्षणात सक्रिय सहभाग घेण्याची ग्वाही दिली. डिजिटल साक्षरता, कौशल्यविकास, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडविणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आणि दिशादर्शक ठरला.
