अमरावती येथील तपोवन ही संस्था सर्वांना माहीत आहे. रिलायन्स उद्योग समूहामध्ये काम करीत असताना श्री देवेंद्र खडसे यांना मी तपोवन येथे विद्यार्थ्यांसमोर मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केले होते. ते त्यांच्या गाडीने मुंबईवरून आले. आणि तपोवनच्या वाटेने त्यांना शाळेमधील मुले पायी जाताना दिसली. त्यांनी माझ्या सौभाग्यवती व मुख्याध्यापिका विद्या काठोळे यांना ही मुले पायी का येत आहेत असे विचारले. ती म्हणाली मुलांना जाण्यासाठी काही साधन नाही आहे. ते म्हणाले मी रिलायन्स उद्योग समूहातर्फे स्कूल बस तुम्हाला देतो. म्हणजे या विद्यार्थ्यांचे जाणे येणे सोयीचे होईल. नंतर त्यांच्या मुलाचे स्वप्निलचे लग्न झाले . त्यांनी मला फोन केला रिलायन्सची बस मिळेल तेव्हा मिळेल .माझ्या मुलाचे लग्न आहे. मी तपोवनच्या मुलांसाठी एक मारुती व्हॅन या लग्नानिमित्त सप्रेम भेट देत आहे . महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्य सचिव श्री जे पी डांगे सुप्रसिद्ध उद्योगपती सुरेश हावरे यांच्या उपस्थितीत त्यांनी ही स्कूल व्हॅन तपोवन च्या हवाली केली. आपल्या मुलाच्या लग्नामध्ये सामाजिक उपक्रम राबविणारे लोक खूप कमी आहेत. त्यामध्ये श्री देवेंद्र खडसे यांचा निश्चितच समावेश करावे लागेल.
2005 साली मुंबईला जो भयंकर जल प्रलय झाला तो सगळ्या देशाला माहीत आहे. या प्रलयामध्ये 27 लोकांचे प्राण वाचविणारा माणूस म्हणजे देवेंद्र खडसे. रिलायन्स उद्योग समूहामध्ये राज्य समन्वयक म्हणून काम करीत असताना आपले काम आटोपल्यानंतर ते आपल्या वाशीच्या घरी निघाले होते. पावसाचा प्रलय सुरूच होता. पुढे गाडी जाणे शक्यच नव्हते .ते खाली उतरले आणि वाट काढत निघाले. त्यांना दिसले की आता पुढे जाणे शक्य नाही. त्याच वेळेस त्यांच्या लक्षात आले की समोर काही मंडळी जलप्रलया मध्ये अडकून पडलेली आहेत. त्यांना वेळीच बाहेर काढले नाही आणि पाण्याची पातळी वाढली तर ते वाहून जातील. ते थोडे मागे आले. दोन-चार घरांची दारे ठोठावली. त्या घरातील लोकांना विनंती केली. त्यांच्याकडून साड्या घेतल्या. त्या एकमेकाला बांधल्या. चार लोकांना मदतीला घेतले आणि त्या बांधलेल्या साड्यांच्या मदतीने त्यांनी जवळपास 27 लोकांना त्या पुरातून बाहेर काढले. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या या कार्याची दखल घेतली व राष्ट्रपती पुरस्कारासाठी त्यांची शिफारस केली. स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांना वाचविणारा हा माणूस खऱ्या अर्थाने देवेंद्र आहे.
रविवार दि.20 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता वाशिम शहरातील नागरिकांनी व परिवाराने श्री देवेंद्र खडसे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासल्याबद्दल पुढाकार घेऊन त्यांच्या सत्काराचे व जीवनगौरव पुरस्कार वितरणाचे नियोजन केले आहे. त्याच कार्यक्रमात महाराष्ट्राची लोककला या कार्यक्रमाचेही नियोजन करण्यात आलेले आहे.
आजकाल मी माझी पत्नी आणि माझी मुलं ही चौकट लोकांनी आखलेली आहे. पण देवेंद्र खडसे याला अपवाद आहेत. ते मूळचे वाशिमचे. पण नोकरी साठी ते डायरेक्ट मुंबईला गेले .धीरूभाई अंबानींना भेटले. धीरूभाईंनी त्यांची चपळता पाहिली आणि त्यांना रिलायन्स उद्योग समूहात सामावून घेतले. रिलायन्स मध्ये काम करता करता त्यांनी एवढी भरारी घेतली की राज्य समन्वयक म्हणून त्यात भर पडली.
रिलायन्स उद्योग समूहातून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते खरं म्हणजे मुंबईला राहू शकले असते. वाशी सारख्या भागात त्यांचे स्वतःचे दोन फ्लॅट आहेत .पण घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिलापाशी या नात्याने ते वाशिमला परत आले आणि वाशीमला शेतीमध्ये आणि उद्योगांमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले. माझ्या वाशिमच्या लोकांना काम मिळाले पाहिजे .त्यांचा माझ्यासारखा विकास झाला पाहिजे .या भावनेने ते कामाला लागले. दानिश उद्योग समूहाची निर्मिती केली. अनेकांना काम मिळाले. स्वतः शेतीमध्ये राबले आणि अनेक हातांना त्यांनी कामाला लावले.
मुंबईला असताना श्री संजू आधारवाडे यांच्या सहकार्याने त्यांनी मुंबई परिसरात व इतरत्र 121 स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेऊन त्या भागातील लोकांची स्पर्धा परीक्षा विषयाची गोडी वृद्धिंगत केली. त्याचप्रमाणे वाशिम जिल्ह्यातील वाशिम व इतर तालुक्यातील गावांमध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी श्री रामचंद्र कुलकर्णी व निवासी उपजिल्हाधिकारी श्री राजेश खवले यांच्या सहकार्याने ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घडवून आणल्या. त्याचा परिणाम असा झाला की या भागातून दोन विद्यार्थी आयएएस झाले आणि इतर परीक्षांमध्ये यशस्वी झाले .या कामी त्यांना राजूभाऊ चौधरी संतोष शिंदे व मिशन आय ए एस चे विभागीय संचालक डॉ. राजीव अग्रवाल त्यांचे सहकार्य लाभले.
वाशिमला सामूहिक विवाह घडवून आणण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला. भय्यूजी महाराज जिवंत असताना त्यांच्या उपस्थितीत वाशिम च्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भव्य सामूहिक विवाह संपन्न झाला. त्यावेळेस त्यांनी श्री राजूभाऊ चौधरी यांच्या खांद्याला खांदा लावून हा सामूहिक विवाह सोहळा अतिशय मोठ्या प्रमाणात घडवून आणला. त्यासाठी तन-मन-धनाने ते झिजले.
रामदेव बाबांचे नाव सर्व जग भर आहे. पण या रामदेव बाबाला वाशीमला आणणे त्यांचा भव्य कार्यक्रम आयोजित करणे यामध्ये देखील त्यांनी तत्कालीन आमदार श्री राजेंद्र पाटणी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. कार्यक्रमासाठी भरीव अशी देणगी देऊन या सत्कार्याची सुरुवात केली. आज आयडीयुपी कॉलनीमध्ये रामदेवबाबांचा कार्यक्रम आजही लोकांच्या लक्षात आहे आणि त्यावेळेस देवेंद्र खडसे व त्यांच्या मित्रांनी घेतलेला पुढाकार
आजही वाशिमकरांच्या लक्षात आहे
अतिशय गरिबीतून हाल अपेष्टातून त्यांनी आपल्या जीवनाला आकार दिलेला आहे. त्यांच्यामध्ये भाषणाची व लिखाणाची गोडी आहे. त्यामुळे आतापर्यंत त्यांनी जवळपास 500 च्या जवळपास भाषणे वेगवेगळ्या ठिकाणी दिलेली आहेत. कोणत्याही प्रकारची मानधनाची अपेक्षा नाही. प्रवास खर्चाची अपेक्षा नाही. या भावनेने ते संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना जागे करीत असतात. ते स्वतः लेखक असून त्यांनी एकंदर तेरा पुस्तके लिहिलेली आहेत. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन ते राष्ट्रसंत साहित्य संमेलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित राहतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले आर्थिक योगदानही देतात.
आमच्या मिशन आयएएस या चळवळीचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मिशन आयएएस या चळवळीला खतपाणी घालण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केलेले आहे. त्याचा उल्लेख वर आलेलाच आहे. खरं म्हणजे चळवळी चालवायला जसे माणसे लागतात तसे पैसेही लागतात. या माणसाने मिशन आयएएससाठी आपला मदतीचा हात सदैव पुढे केलेला आहे. याशिवाय संपूर्ण भारतात मिशन आयएएस ही जी चळवळ आज रुजलेली आहे त्या चळवळीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन या चळवळीला मोठे करण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे व आजही करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्राचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे यांच्या हस्ते त्यांचा 22 मे रोजी अमरावतीच्या भव्य अशा सिकची रिसॉर्टमध्ये सत्कारही करण्यात आला आहे
हा सामाजिक बांधिलकी जोपासणारा माणूस. मुंबईच्या सुरेश हावरे परिवाराशी अतिशय निकटचा संबंध असलेल्या माणूस. पण या माणसाचे मन मुंबईत रमले नाही .रमले ते वाशिममध्ये. या त्यांच्या वाटचालीत त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती प्रमिला तसेच चिरंजीव श्री स्वप्निल व श्री विनय यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मुंबईचे वैभव सोडून वाशिमला आपल्या घरट्यात परत येणारा हा माणूस म्हणून अनन्यसाधारण आहे. अशा या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या श्री देवेंद्र खडसे यांना यानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
