सांगली /(प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) : अल निनोमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाबरू नये. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा याबाबत राज्य शासन अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळे प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनीही जिल्ह्यातील टंचाई स्थितीवर मात करण्यासाठी दक्ष राहून संवेदनशीलतेने व तत्परतेने उपाययोजना कराव्यात. संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा. नागरिक, जनावरे यांना पिण्याचे पाणी तसेच जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिल्या.
जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा व त्यावर मात करण्यासाठी पूर्वनियोजनाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, महानगरपालिका आयुक्त संजीता महापात्र, सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महादेव कदम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, मिरज उपविभागीय अधिकारी विशाल यादव यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी प्रत्यक्ष तर सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी दूरदृष्यप्रणालीव्दारे उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सर्वाधिक टँकर्स मागणी असलेल्या जत तालुक्यात टँकर्स भरण्यासाठी पाण्याच्या स्त्रोतामध्ये पाणी उपलब्ध करण्यासाठी वारणा धरणातून 900 क्युसेकने विसर्ग सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे. ते पाणी लवकरच जतपर्यंत पोहोचेल. जत तालुक्यातील टँकर्सची मागणी पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करावी. टँकरची मागणी झाल्यानंतर विलंब न करता पाणीपुरवठा सुरू करावा. आवश्यक असल्यास नियमांमध्ये बसत नसलेल्या अंतरावरील जलस्रोतांमधूनही पाणी आणावे आणि त्यातील अतिरिक्त खर्चाची लोकसहभागातून तरतूद करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोयना धरणातून सध्या 1000 क्युसेक जलविसर्ग सुरू आहे. तो 2500 क्युसेक करण्याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनुमती दर्शवली असून, आगामी 15 दिवस कोयना धरणातून 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येईल. या पाण्यातून जिल्ह्यातील तलाव व जलस्रोत भरून घेण्यास मदत होईल आणि पुढील काळातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. ”
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, नागरिकांना व जनावरांना पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल याची दक्षता सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी घ्यावी. मागेल त्याला टँकर मिळेल, यासाठी सर्व अधिकार प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. टंचाई स्थिती लक्षात घेऊन टँकरसाठी जलस्रोत निश्चित करताना केवळ शासकीय दर व अंतराच्या मर्यादेत अडकून न राहता नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे. पाणीटंचाई अनुषंगाने सातत्याने आढावा घेऊन आवश्यकतेप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. पाणीटंचाईच्या काळात उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करण्याबरोबरच पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण करण्याचे निर्देशही देण्यात आले. नागरिकांना पाणी उपलब्ध करून देतानाच त्याची गुणवत्ता सुरक्षित राहील, याची काळजी घेणे आवश्यक आहे. पाण्याचे स्रोत शोधण्याबरोबरच पाणी शुद्धीकरणाच्या उपाययोजनांकडेही सर्व प्रांताधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी उपलब्ध तंत्रज्ञान व नवीन उपाययोजनांचा अभ्यास करावा, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुचित केले.
दुष्काळी परिस्थिती घोषित करण्याच्या प्रक्रियेतील पहिल्या ट्रिगरमधील तीनपैकी एक निर्देशांक जिल्ह्याला लागू होत असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या अनुषंगाने जिल्ह्यात पावसाचा खंड व कमी पर्जन्यमान याबाबतच्या निर्देशांकाच्या निकषानुसार कार्यवाही करून शासनाला अहवाल सादर करण्याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुचित केले.
चारा उपलब्धतेसाठी आतापासून नियोजन
जत, कवठेमहांकाळ आणि आटपाडी भागात चाऱ्याची काही प्रमाणात टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून इतर भागात सध्या चारा उपलब्ध असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. मात्र भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन चाऱ्याचे स्रोत आतापासून निश्चित करावेत. आवश्यक असल्यास जिल्ह्याबाहेरून चारा आणण्याचे नियोजन करावे. नियमांमुळे अतिरिक्त दराचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यावर पर्याय शोधून जनावरांना चारा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी जलस्रोतांमधून होणाऱ्या उपशाचे योग्य नियोजन करावे. शेती व पिण्याच्या पाण्याची गरज यामध्ये संतुलन राखताना पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश देण्यात आले. काही भागात आठवड्यातील काही दिवस उपसाबंदी लागू करून उर्वरित दिवस शिथिल करण्याबाबतच्या पर्यायावरही बैठकीत चर्चा झाली.
यावेळी पाटबंधारे, कृषि, पशुसंवर्धन, नळ पाणीपुरवठा, रोजगार हमी योजना आदिंबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीची माहिती सादर केली.
