You are currently viewing महिलांच्या ‘फुगडी कलेला’ स्वतंत्र मानधन मिळावे

महिलांच्या ‘फुगडी कलेला’ स्वतंत्र मानधन मिळावे

फाग, घुमट वादन व राधाकृष्ण नृत्याचाही शासन निर्णयात समावेश करावा

लावण्यसिंधू लोककला संस्थेची शासनाकडे मागणी

कणकवली :

कोकणात, विशेषतः गणेशोत्सवामध्ये परंपरागत गौरी सणात महिलांच्या फुगडी कलेला आगळेवेगळे स्थान आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या कलाकार मानधन योजनेमध्ये ‘फुगडी गटांसाठी आणि व्यक्तिगत फुगडी कलाकारांसाठी स्वतंत्र मानधन योजना’ निर्माण करावी, तसेच फाग, घुमट वादन आणि राधाकृष्ण नृत्य या पारंपरिक लोककलांचाही शासनाच्या कलाकार मानधन योजनेत समावेश करावा, अशी मागणी लावण्यसिंधू लोककला व चित्रपट निर्मिती सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांच्यावतीने शासनाकडे तसेच राज्याचे सांस्कृतिक मंत्री मा. आशिष शेलार यांच्याकडे करण्यात आली आहे.

लावण्यसिंधू लोककला व चित्रपट निर्मिती सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कणकवली येथील श्री. भवानी सभागृहात संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर उपरकर, उपाध्यक्षा सौ. अक्षता कांबळी, सचिव श्री. नितीन तळेकर, कार्यकारी संचालक श्री. राजू तावडे, श्री. गिरीश उपरकर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कला संचालनालयामार्फत विविध लोककलांचे जतन करणाऱ्या लोककलावंतांना शासन निर्णयानुसार ०७/०२/२०१४ कलाकार मानधन योजना व राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन योजना याअंतर्गत दरमहा मानधन दिले जाते. तसेच त्यांच्या पथकांना अनुदानाचाही लाभ दिला जातो. मात्र शासनाच्या कलाकार मानधन योजनेमध्ये कोकणातील महिलांच्या ‘फुगडी’ या लोककलेसाठी मानधनाची स्वतंत्र योजना नाही.

विशेषतः पूर्वीपासून कोकणात गणपती सणात महिला पारंपरिक फुगडी घालून ही कला जोपासत आलेल्या आहेत. अशा वृद्ध महिला कलाकारांनी आजवर फुगडीचे अनेक प्रकार जनमानसात सादर करून ही पारंपरिक फुगडी कला जिवंत ठेवली आहे. त्यामुळे या कलावंतांना शासनाच्या कलाकार मानधन योजनेचा लाभ मिळणे आवश्यक असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

तसेच कोकणातील शिमगोत्सवाच्या सणात शिवरायांच्या काळापासून ‘फाग’ ही कला जोपासली जाते. त्याचप्रमाणे घुमट वादन आणि राधा-कृष्ण नृत्य या पारंपरिक कला वृद्ध कलावंतांनी आजपर्यंत जिवंत ठेवल्या आहेत. त्यामुळे फुगडी, फाग, घुमट वादन आणि राधा-कृष्ण नृत्य या लोककलावंतांना तसेच त्यांच्या पथकांना मानधन देण्याची तरतूद शासन निर्णयात करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अनेक महिलांची फुगडी पथके असून गावागावांतील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून त्यांचा सहभाग लक्षवेधी असतो. कोकणातील शिमगोत्सवात इतिहासकालीन कथेवर फाग सांगणे ही एक स्वतंत्र शैलीची कला आहे. तसेच शिमगोत्सवात प्रत्येक वाडीमध्ये होणारे राधा-नृत्य आणि घुमट वादन या पारंपरिक कला आहेत. या कलांचा समावेश शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडील कलाकारांच्या मानधन योजनेमध्ये करण्यात यावा, अशी मागणी संस्थेने केली आहे.

विशेषतः देवगड तालुक्यातील गाबीत समाजाची व मच्छीमारांची लोकवस्ती असलेल्या गावागावांतून फागनाट्य व फागगीते सादर करणे, घुमटवादन आणि राधा-कृष्ण नृत्याची परंपरा शिमगोत्सवात जपली जाते. त्यामुळे अशा पारंपरिक लोककलांचे जतन करणाऱ्या वृद्ध कलाकारांना शासनाच्या कलावंत मानधन योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे. गाबितांचा शिमगोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची पूर्वापार प्रथा असल्याचेही संस्थेने नमूद केले.

कोकणातील विविध गावांमधून गणपती सणापासून अनेक सणांमध्ये तसेच सांस्कृतिक लोककला महोत्सवांमध्ये महिलांनी फुगडी कला जोपासली आहे. शिवाय महिलांची फुगडी मंडळे स्थापन झालेली असून अशा फुगडी मंडळांना शासनाच्या सांस्कृतिक कला संचालनालयाकडून कोणतीही अनुदानाची योजना नाही. त्यामुळे फुगडी मंडळातील वृद्ध महिला कलाकारांना कलावंत मानधन मिळू शकत नाही.

त्यामुळे शासनाने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून फुगडी, घुमट वादन, फाग आणि राधाकृष्ण नृत्य या कलावंतांचा समावेश शासनाच्या कलाकार अनुदान योजनांमध्ये करावा, अशी मागणी लावण्यसिंधू संस्थेने केली आहे.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये १०० कलावंतांना अनुदान देण्याची तरतूद शासन निर्णयात असून ही मर्यादा वाढवून १५० ते २०० कलाकारांना अनुदान देण्यात यावे, अशीही विनंती करण्यात आली आहे.

सदरील मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी लवकरच जिल्ह्यातील फुगडी मंडळांच्या प्रमुखांची बैठक चतुर्थीनंतर घेण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी सभेत बोलताना दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा