You are currently viewing डॉक्टर संजय ओक यांचा सत्कार..

डॉक्टर संजय ओक यांचा सत्कार..

कुडाळ :

दुसऱ्याच्या जीवनातील आनंदाचा एक घटक होता येणे यासारखे सुख नाही. डॉक्टरी पेशा हा मानवी सेवेचा मुक्त परवाना होय. त्या संधीचे प्रत्येक डॉक्टरनी सोने करावे. दुसऱ्याच्या जीवनातील दुःख दूर करण्यासारखा आनंद नाही.” असे उदगार महाराष्ट्र राज्य कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी काढले. ते रोटरी क्लब कुडाळ, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था, डॉक्टर निगुडकर यांचे श्री गणेश हॉस्पिटल व सुशीला ग. निगुडकर ट्रस्ट तर्फे आयोजित लहान मुलांवरील मोफत शस्त्रक्रिया शिबिराच्या  सांगता समारंभामध्ये बोलत होते. त्यानी आपल्या पुढील मनोगतामध्ये “आपल्यासमोर आलेला पेशंट हा माणूस आहे याचे भान ठेवून त्यांच्याशी आपले वर्तन सौहार्दापूर्ण असावे. आपल्या कृतीने कोणाच्यातरी घरातील चिरकाळ टिकणारा आनंद आपण देणार आहोत, याचे भान असावे. लहान मुलांना आपण नवजीवन देतो, धीर देतो ही आठवण आपल्यापेक्षा त्या कुटुंबातील व्यक्तींना जास्त संस्मरणीय ठरणार आहे.” असे सांगत श्री गणेश हॉस्पिटल, बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन सारख्या अवलिया यांच्या मानवतावादी आग्रहामुळे हे शिबिर होऊ शकले याचा आवर्जून उल्लेख केला. ईथल्या हॉस्पिटलचा स्टाफ, संयोजक संस्थांचे कार्यकर्ते यांच्या प्रामाणिक धडपडीमुळे यामुळे हे शिबिर यशस्वी होऊ शकले. त्यांच्या कुटुंबात आनंद देण्याची, सेवा देण्याची संधी पालकांनी उपलब्ध करून दिली. त्यांच्या या सागरासारख्या आनंदातील आपण एक जलबिंदू असल्याचे त्यानी नम्रपणे नमूद केले व चिपी विमानतळ होताच आपण दर तीन महिन्यांनी अशा प्रकारचे कॅम्प सिंधुदुर्गमध्ये आयोजित करू, असे सांगत तरुणांनी यासाठी पुढे येण्याच्या गरजेचे त्यांनी प्रतिपादन केले.

यावेळी त्यांच्यासोबत उमेश गाळवणकर, डॉक्टर संजय निगुडकर, सचिन मदने, डॉ. महेश कोठवानी, डॉ. पारस कोठारी, डॉ. अभय गुप्ता, डॉ. अमेय देसाई, डॉ. उमा कानिटकर इत्यादी उपस्थित होते. शिबिराच्या आयोजनाबाबत डॉ. महेश कोठवानी, डॉ. पारस कोठारी, डॉ. अभय गुप्ता यांनी समाधान व्यक्त करत पालकांनी टाकलेला आपल्यावरचा विश्वास व स्वातंत्र्य याबद्दल धन्यवाद व्यक्त करत इथली ऑपरेशनची व्यवस्था, कार्यकर्त्यांचा उत्साह, यामुळे आपण भारावून गेल्याचे सांगताना संयोजकांनी व पालकांनी आपल्याला बालकांच्या सेवेची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यानी समाधान व्यक्त केले.

या शिबिराचे समन्वयक डॉ. अमेय देसाई यांनी “डॉक्टर संजय ओक यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ देऊन हा कॅम्प यशस्वी करण्याकरिता हातभार लावला, आमच्यावर विश्वास दाखवला याबद्दल आनंद व्यक्त करीत ज्यांच्या विश्वासावर हा कॅम्प कुडाळ येथे आयोजित केला ते डॉक्टर निगुडकर, उमेश गाळवणकर यांचे विशेष आभार व कौतुक केले.

उमेश गाळवणकर यांनी आपल्या मनोगतामध्ये “डॉक्टर संजय ओक यांच्यासारखी माणसं आमच्या विनंतीला मान देऊन येथे येतात. हेच आमच्यासाठी फार मोठे आहे. देव तर येथेच आहे. हे सांगताना ते भारावून गेले व ज्यांच्या सक्रिय सहभागामुळे आपण कॅम्प आयोजित केला ते डॉक्टर संजय निगुडकर यांचे व त्यांच्या सर्व स्टाफचे, आभार मानून कौतुक केले. डॉक्टर संजय निगुडकर यांनी सुद्धा “सामाजिक भान ठेवून काम करण्याची संधी या शिबिराच्या निमित्ताने आपल्याला मिळाल्याचे कबूल करताना महाराष्ट्र राज्य कोविड टास्क फोर्स चे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी इथे येऊन या २२ शस्त्रक्रिया केल्या त्यांचे, त्यांच्यासह इतर सर्व टीमचे त्यांनी कौतुक केले.

यावेळीं बालकाच्या पालकांच्या वतीने राजन नाईक, सादिक डोंगरकर यांनी मनोगत व्यक्त करीत रंजल्या गांजलेल्या पालकांचे कैवारी, देवदूत अशा शब्दात या सर्वांचा गौरव करत ऋण व्यक्त केले. तसेच डॉक्टर संजय ओक व त्यांच्या सर्व टीमचे बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था, श्री गणेश हॉस्पिटल, श्री सुशीला निगुडकर ट्रस्ट, रोटरी क्लब कुडाळ यांच्यावतीने शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी खालील दिलेल्या मुलांची आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मदने यांनी तर उपस्थितांचे आभार डॉक्टर संजय निगुडकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 2 =