You are currently viewing आठ कोटी खर्चाचे शंभूसृष्टी स्मारक 

आठ कोटी खर्चाचे शंभूसृष्टी स्मारक 

मिरज (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार)

मिरज-बेडग रोडवरील महापालिकेच्या खुल्या जागेत सुमारे आठ कोटी रुपये खर्चून भव्य ‘शंभूसृष्टी’ स्मारक साकारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या उभारणीस जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळाली असून, प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती नगरसेवक करण जामदार यांनी दिली.

‘शंभूसृष्टी’मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पंचधातूचा १५ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा चबुतऱ्यावर उभारण्यात येणार आहे. तसेच संभाजी महाराजांची राजमुद्रा, डिजिटल ग्रंथालय आणि संग्रहालय उभारण्यात येणार असून, त्यामधून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याच्या इतिहासाची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. स्वराज्यातील सुमारे २५ किल्ल्यांच्या प्रतिकृतीही या परिसरात उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक किल्ल्याची ऐतिहासिक माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे स्वराज्याच्या इतिहासाची आणि गडकिल्ल्यांची माहिती एकाच ठिकाणी जाणून घेण्याची सुविधा पर्यटकांना मिळणार आहे. स्मारकाच्या परिसरातील शिवकालीन विहिरीचे नूतनीकरण करून तेथे कारंजे आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. परिसराच्या सुरक्षेसाठी संरक्षक भिंत, सुरक्षा रक्षक कक्ष आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था केली जाणार आहे. सुमारे तीन गुंठे जागेत वाहनतळाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या स्मारकासाठी नगरसेवक करण जामदार यांनी गेल्या चार ते पाच वर्षांपासून शासनस्तरावर पाठपुरावा केला. स्मारकाची वास्तुरचना आर्किटेक्ट प्रमोद चौगुले आणि मोहित चौगुले यांनी केली असून, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम शिल्पकार विजय गुजर करणार आहेत. महापालिका, जिल्हाधिकारी, पोलीस, तहसीलदार आणि प्रांत प्रशासनाने मंजुरी प्रक्रियेत सहकार्य केले.

शंभूसृष्टी तरुणा पिढीला प्रेरणादायी ठरणार ‘शंभूसृष्टी’ हे देशातील अशा प्रकारचे पहिले स्मारक ठरणार असल्याचा दावा करण जामदार यांनी केला. या स्मारकामुळे मिरजेला ऐतिहासिक आणि प्रेरणादायी पर्यटनस्थळ मिळेल. तसेच पुढील पिढ्यांना स्वराज्याचा इतिहास आणि छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य जवळून जाणून घेता येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी शिल्पकार विजय गुजर, दिगंबर जाधव, सचिन जाधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा