*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. अवनी आदित्य जोशी (दारशेतकर) लिखित अप्रतिम लेख*
*”सर्वस्व आई”*
(ऋण व्यक्त करु मातेचे)
“माझी माय माऊली
उन्हात देत असे सावली
करुणा माया ममता
तुझ्या हृदयातून पाझरली”
“आई” या दोन अक्षरांतच सारे विश्व सामावलेले आहे. जन्माला तीच घालते, पालन पोषण करुन बाळास मोठे करते. आणि बाळ, कितीही मोठे झाले तरी तिच्यासाठी, ते कायम बाळ च असते. म्हणून ती त्यावर अपार माया करते.
बाळ कितीही चुकले तरी त्याचे अपराध पोटात घालून त्यास समजून घेणारी आणि तितकेच प्रेम कायम करणारी, केवळ आईच असते. तिची जागा, इतर कोणत्याही नात्यातून भरुन येत नाही.
“स्वामी तिन्ही जगाचा
आईविना भिकारी”
म्हणूनच तर आपल्याकडे काहीही नसले तरी, “आई” आहे ना, म्हणजे सर्व आहे. अन्यथा सर्व असूनही माणूस भिकारी राहतो.
आई संस्कार देते. ती मातीच्या गोळ्यास आकार देते. तिच्या संस्कार शिदोरीवर मनुष्याचे जीवन घडते. दया, क्षमा, करुणा यांचे जिवंत मूर्तीरुप आईच असते. तिच्या “आई” या नावात सारे काही सामावले जाते.
“दया, क्षमा, शांती
तुझ्या रुपात प्रकटली
“आई” नाव घेता
धरणीही सुखावली”
आई कधीही आपल्यास सोडून जाऊच नये. असे सर्व प्राणीमात्रांना वाटते. ते या साठीच तिची माया, प्रेम कोणत्याही संपत्तीने किंवा, कोणत्या दुसऱ्या रुपातून देखील प्राप्त होत नाही. त्यासाठी “आई” ही हवीच, तिची माया कायम पाझरत रहावी. याविना दुसरे सुख ते काय हो.
या “आई” मध्येच भगवंत रुप देखील आहे. प्रत्यक्ष भगवंत प्राप्ती ही चंद्र, सूर्य, निसर्ग यांच्या रुपातून प्रत्यक्ष नित्य घडते. तशीच ती मातेच्या रुपातून, तिच्या वात्सल्यरुपी करुणेतून घडते. या माऊलीस प्रेम, माया आणि सदा सन्मान मिळवून देणे म्हणजेच तिच्या हृदयास सुख देणे होय.
“आई” च्या प्रेमाची उतराई कधीच होऊ शकत नाही. तिच्या ऋणातून आपण कोणीही, कधीही मुक्त होऊ शकत नाही. म्हणूनच आपल्या प्रेम स्वरूप आईस, कायम वेळ द्या, तिच्या इच्छा, आकांक्षा आपापल्या परीने पूर्ण करा. सदा तिच्या ऋणात राहून, तिची सेवा करा. म्हणजेच ईश्वर प्राप्ती आणि स्वर्गसुख, सर्व येथेची प्राप्त होईल. आणि जीवन संपन्न होईल.
“तूच माझी माऊली
तूच आहेस वाली
तुझ्याच कवेत मजला
विश्वाची प्रचिती आली”
सौ. अवनी आदित्य जोशी.(दारशेतकर)
तळेगांव दाभाडे.
जि. पुणे.
