You are currently viewing निवृत्त माहिती संचालक तथा न्यूज स्टोरी टुडेचे संपादक श्री देवेंद्र भुजबळ लिखित लेख

निवृत्त माहिती संचालक तथा न्यूज स्टोरी टुडेचे संपादक श्री देवेंद्र भुजबळ लिखित लेख

*प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे मिशन आयएएस*

 

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात मी, मंत्रालयात फेब्रुवारी 2015 ते जून 2017 या कालावधीत माहिती संचालक म्हणुन काम करीत होतो. तेव्हा

माझ्याकडे महाराष्ट्राच्या विविध भागातून विविध वृत्तपत्रे येत असत. मी स्वतः नगरच्या समाचार या जिल्हा दैनिकात आणि पुण्याच्या दैनिक केसरी, साप्ताहिक सह्याद्री ह्या वृत्तपत्रांमध्ये काम केलेले असल्यामुळे मला सर्वच वृत्तपत्रे वाचाविशी वाटत असत. पण तेव्हढा वेळ मिळत नसल्याने मी प्रत्येक महसूल विभागातील एक महत्वाचे वृत्तपत्र तरी अवश्य वाचायचो.

 

असेच एकदा नागपुर चे तरुण भारत वृत्तपत्र वाचत असताना,त्यात मिशन आयएएसची आणि या मिशनचे संचालक

प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे यांच्याविषयी आलेली माहिती वाचून मी खूपच प्रभावित झालो. “मुलांना शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षांची माहिती झाली पाहिजे आणि तेव्हापासूनच त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला पाहिजे” हा मिशनचा विचार मला पटला आणि मी लगेच

आमच्या

महासंचालनालयाच्या आकाशवाणी वरील “दिलखुलास “आणि दूरदर्शन वरील “जय महाराष्ट्र” या कार्यक्रमांमध्ये काठोळे सरांची

मुलाखत घेण्याचा निर्णय घेतला. त्यांचा संपर्क क्रमांक मिळविणासाठी लगेच मी नागपुर तरुण भारत ला फोन केला आणि त्यांच्या कडून मला सरांचा संपर्क क्रमांक

मिळाला.

सरांशी लगेच बोललो आणि त्यांच्या सोयीने

मुंबई ला येण्याची तारीख निश्चित केली. पुढे त्यांची मुलाखत

“दिलखुलास “आणि “जय महाराष्ट्र” या दोन्ही कार्यक्रमातून प्रसारीत झाली. मुलाखतींवर आधारित बातम्याही अनेक वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाल्या.

 

वंचित मुलामुलींविषयीची तळमळ, त्यांच्यासाठी मोफत व्याख्याने देणे, शिबिरे आयोजित करणे,सर्व काम

नि:स्वार्थ भावनेने करणे या

अशा अनेक गुणांपैकी सरांमधे एक दुर्मिळ होत चाललेला गुण आहे,तो म्हणजे

“कृतज्ञता”. म्हणुनच सर आजही जिथे कुठे संधी मिळेल, तिथे तिथे सांगत असतात की, ” दिलखुलास आणि जय महाराष्ट्र या दोन्ही कार्यक्रमांमुळेच मी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलो “. केवळ विविध प्रसार माध्यमांद्वारे , पुस्तकांद्वारेच नाही तर देशाच्या विविध भागात जाऊन तेथील शाळा महाविद्यालये, करिअर मार्गदर्शन करणार्‍या संस्था अशा माध्यमातून सर मुलांशी थेट संवाद साधत असतात. खरोखरच त्यांचे हे कार्य अजोड आहे.

 

तसे पाहिले तर केंद्र व राज्य सरकारच्या सेवेत स्पर्धा परीक्षांद्वारे महाराष्ट्रातून अधिकाधिक तरुण यावेत यासाठी महाराष्ट्र शासनाची राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्था कार्यरत आहे. याबरोबरच गेल्या काही वर्षात खाजगी संस्थांचीही लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच काही संस्था आणि व्यक्ती आपापल्या परीने तरुणांना मार्गदर्शन करण्याचे कार्य करीत आहे.पण या सर्व संस्थांचे कार्य हे पदवीधर झालेल्या, स्पर्धा परीक्षांसाठी

पात्र असलेल्या उमेदवारांसाठीच असते. आणि नेमके पदवी मिळाल्यानंतर स्पर्धा परीक्षांची

तयारी सुरू करायला सुरुवात करणे, म्हणजे त्याआधीची सर्व मौल्यवान वर्ष वाया घालविणे असाच होतो. हे ओळखूनच सरांनी अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख आय.ए.एस. अकादमी स्थापन केली आहे.या अकादमीचे वैशिष्ट्य म्हणजे ही अकादमी उमेदवारांसाठी विनामूल्य कार्य करीत असते.

 

या अकादमीची कल्पना कशी सुचली? असे विचारल्यावर सरांनी सांगितले, “ते अमरावती येथील भारतीय महाविद्यालयात मराठीचे अध्यापन करीत असताना काही कामानिमित्त २००० साली सांगली येथे गेले होते. तेथे त्यांची भेट भारतीय महसूल सेवेत निवड झालेले श्री. अभिनय कुंभार यांच्याशी झाली. श्री. कुंभार यांनी त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा मराठी भाषेतून देता येते असे सांगून या परीक्षेविषयीचे बारकावे सांगितले. त्यांच्याशी झालेल्या संवादातून प्रेरणा घेऊन मराठी तरुण अधिकाधिक संख्येने स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी व्हावा याचा ध्यास

घेऊन मी पहिली स्पर्धा परीक्षा कार्यशाळा दि.१२ मे २००० रोजी घेतली. या कार्यशाळेला तत्कालीन अमरावती महानगर पालिका आयुक्त श्री. धनराज खामतकर, भा. प्र.से. श्री. विकास खारगे, भा. प्र. से.

श्री. अमोल पाटील, संचालक युनिक अकादमी, श्री. अभिनय कुंभार, भारतीय महसूल सेवा हे उपस्थित होते.” अशा प्रकारे अकादमीचे

काम सुरू झाले.

 

 

सुरुवातीच्या दोन वर्षात अकादमीने स्पर्धा परीक्षांविषयक भरपूर कार्यशाळा घेतल्या. मात्र ग्रंथालय व अभ्यासिकेची उणीव भासत होती.या कार्यास निश्चित दिशा मिळावी म्हणून

सरांनी दि.१० ऑगस्ट २००२ रोजी डॉ पंजाबराव देशमुख आय.ए.एस. अकादमी स्थापन केली. तत्कालीन उपजिल्हाधिकारी तथा विद्यमान जिल्हाधिकारी

श्री. दिलीप स्वामी, साहित्य संगमचे अध्यक्ष डॉ. मोतीलाल राठी व विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे कोषाध्यक्ष प्राचार्य

अण्णासाहेब हिवसे यांच्या उपस्थितीत अकादमीच्या २४ तास चालणाऱ्या ग्रंथालयाचे व अभ्यासिकेचे रीतसर उद्घाटन झाले. यासाठी सरांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ रोडवरील जिजाऊ नगरीतील स्वतःचा बंगला दिला. त्याचे सुपरिणाम दिसू लागले. ज्या अमरावती शहरात एकही मुलगा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत नव्हता, त्या अमरावती शहरातून नऊ विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. अकादमीने या संदर्भात वेळोवेळी घेतलेल्या कार्यशाळा, विद्यार्थ्यांना २४ तास उपलब्ध करून दिलेली ग्रंथालय व अभ्यासिका ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या आहेत.

 

डॉ. पंजाबराव देशमुख आय.ए.एस. अकादमीच्या विविध उपक्रमामध्ये आतापर्यंत आय.ए.एस., आय.पी.एस., आय.एफ.एस. व राजपत्रित अधिकारी असे जवळपास साडेतीनशेहून अधिकारी मार्गदर्शनासाठी सहभागी झाले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने इतके अधिकारी मार्गदर्शनासाठी सहभागी होणारी भारतातील ही बहुधा एकमेव संस्था असावी.

 

या अकादमीने आतापर्यंत संपूर्ण भारतात 16 हजाराहून अधिक विनामूल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतलेल्या आहेत.शालेय विद्यार्थ्यांमध्ये आय.ए.एस. स्पर्धेचे ध्येय निर्माण व्हावे, हे उद्दिष्ट

डोळ्यांसमोर ठेवून अकादमी विविध कल्पना, उपक्रम राबवित असते.खेड्यापाड्यात विनामूल्य स्पर्धापरीक्षा, कार्यशाळा घेत असते. अकादमी तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षेचे स्वप्न दाखवित असते. त्यासाठी संस्कार प्रकाशनाने तयार केलेला ज्युनिअर आय.ए.एस. स्पर्धेचा उपक्रम राबवून केवळ विदर्भच नव्हे तर महाराष्ट्र भर स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिराचे यशस्वी नियोजन व आयोजन केले आहे.

 

अकादमीचे कार्य पुढे नेण्यास आजपर्यंत अनेकांचा हातभार लागला आहे. प्राचार्य अण्णासाहेब हिवसे यांनी अकादमीच्या सुरुवातीच्या काळात त्यांची दंत महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, महिला महाविद्यालयातील जागा स्पर्धापरीक्षा कार्यशाळेसाठी उपलब्ध करून दिली. अलीकडच्या काळात मोर्शी, वरुड मतदार संघाचे तडफदार खासदार डॉ. अनिल बोंडे हे अकादमीच्या उपक्रमात खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळे अकादमीच्या कामाने चांगलाच जोर पकडला आहे.

 

 

अकादमीने आतापर्यंत

मी आयएएस अधिकारी होणारच,शेतकऱ्यांची मुले झालीत कलेक्टर ,

स्पर्धा परीक्षेची एबीसीडी,

प्रेरणा स्पर्धा परीक्षेची,

आनंदी राहा – यशस्वी व्हा ,

सक्सेस स्टोरीज ऑफ आयएस ऑफिसर्स ,

सक्सेस स्टोरीज ऑफ आयपीएस ऑफिसर्स ,

मराठवाड्यातील मुले झालीत कलेक्टर ,विद्यार्थ्यांनो अधिकारी व्हा,

विद्यार्थिनींनो अधिकारी व्हा,

एबीसीडी ऑफ आयएएस ,

स्पर्धा परीक्षेची गुरुकिल्ली ,

दीपस्तंभ,झेप,जीवन ज्योती ,

शरदाचं चांदणं,

अशी एकूण 73 पुस्तके प्रकाशित करून ती माफक

किंमतीमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहेत.

 

अकादमीने काही वर्षापासून विदर्भ स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन आयोजित करण्यास प्रारंभ केला आहे. पहिले संमेलन अमरावतीला, दुसरे संमेलन गुरुकुंज मोझरीला तर तिसरे बुलढाणा जिल्ह्यातील खामगावला संपन्न झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्य सचिव श्री.जे.पी.डांगे, मा.राष्ट्रपतींचे तत्कालीन खाजगी सचिव श्री. रवींद्र जाधव व सनदी अधिकारी

श्री. रंगनाथ नाईकडे या मान्यवरांनी पदे भूषविली आहेत. या संमेलनामुळे स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत जागृती होण्यास चांगली मदत झाली आहे.

 

विशेष म्हणजे ,कोरोना भयंकर

काळात सर्व जनजीवन ठप्प पडले असताना, सरांनी अकादमीचे काम बंद न ठेवता,

काळाची पावले ओळखून ऑनलाइन व्याख्याने आयोजित केली होती. या व्याख्यानमालेत एक व्याख्यान देण्याची संधी मला देखील मिळाली होती.

 

सरांच्या कार्यामुळे आज पर्यंत त्यांना अनेक पुरस्कार, मान सन्मान प्राप्त झाले आहेत. नुकताच त्यांचा सन्मान

अमरावती येथील

श्री गणेशदास राठी छात्रालयाच्या तीन दिवस चाललेल्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात करण्यात आला.

सर या संस्थेच्या

श्री गणेशदास राठी विद्यालय व श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात १९६६ ते १९८५ या काळात

विद्यार्थी होते, कर्मचारी होते

आणि पुढे प्राध्यापक ही होते.

 

सरांच्या या सर्व कार्यात त्यांच्या पत्नी सौ विद्या काठोळे मोठ्या आनंदाने

सहभागी होत असतात. जिथे

शक्य असेल तिथे त्या सरांसोबत असतात.

 

स्पर्धा परीक्षांविषयी, मुलामुलींना संदेश देतांना सर म्हणतात, ” स्पर्धा परीक्षांची

तयारी जितकी लवकर सुरू कराल, तितकी यशाची हमी अधिक ! ”

 

विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी, शिक्षकांनी सरांनी

सांगितलेला यशाचा मूलमंत्र लक्षात घ्यावा, असाच आहे.

 

लेखन

: देवेंद्र भुजबळ

निवृत्त माहिती संचालक

मंत्रालय. मुंबई.

+91 9869484800

प्रतिक्रिया व्यक्त करा