कणकवली येथे भगवान वराह जयंतीनिमित्त प्रतिमापूजन*
कणकवली
आज भाद्रपद शुद्ध तृतीया भगवान वराहांचा जन्मदिवस विविध हिंदुत्ववादी संघटनांनी साजरा करत भगवान वराहांच्या प्रतिमेचे पूजन केले. भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते नंदकुमार आरोलकर यांनी प्रतिमा पूजन केले. याप्रसंगी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना हिंदुत्ववादी कार्यकर्ते श्रीकृष्ण परब म्हणाले की “आपण सर्वजण येथे वराह जयंती साजरी करण्यासाठी एकत्रित आलो आहोत, या मंगल प्रसंगी सर्वांना वराह जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! हिंदू धर्मग्रंथानुसार, भाद्रपद शुक्ल तृतीयेला भगवान विष्णूंनी पृथ्वीच्या रक्षणासाठी आपला तिसरा अवतार घेतला, ज्याला आपण ‘वराह अवतार’ म्हणून ओळखतो. वराह जयंतीचा हा सण आपल्याला केवळ एका पौराणिक कथेची आठवण करून देत नाही, तर तो आपल्याला एक मोठा संदेश देतो. पृथ्वी ही आपली माता आहे आणि तिचे रक्षण करणे हे आपले परम कर्तव्य आहे. आजच्या आधुनिक काळात वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि निसर्गाचा ऱ्हास यामुळे आपली पृथ्वी पुन्हा एकदा संकटात सापडली आहे.
याप्रसंगी हिंदुत्ववादी कार्यकर्ते नंदकुमार आरोलकर म्हणाले की, भगवान वराह जयंतीच्या या पावन पर्वावर आपण सर्वांनी आपल्या पृथ्वीचे, पर्यावरणाचे आणि निसर्गाचे रक्षण करण्याचा संकल्प केला पाहिजे. आपण झाडे लावली पाहिजेत, पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे आणि अधर्माविरुद्ध नेहमी आवाज उठवला पाहिजे. भाजप युवा मोर्चाचे संदीप मेस्त्री यांनी सुद्धा निसर्गाचे रक्षण करण्याचा संकल्प केला. नगरसेविका मेघा गांगण, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, कळसुली सरपंच सचिन पारधिये, समीर प्रभुगावकर, विघ्नेश गोखले, दिनेश जगम आदी उपस्थित होते.
सनातन संस्थेचे श्री.जयवंत सामंत यांनी वराह अवताराविषयी माहिती दिली. विश्वाचे पालनहार भगवान विष्णूंनी सृष्टीचे रक्षण करण्यासाठी महाकाय वराह रूप धारण केले. त्यांनी समुद्राच्या तळाशी जाऊन हिरण्याक्षाशी घनघोर युद्ध केले, त्याचा वध केला आणि पृथ्वीला सुरक्षितपणे आपल्या दातांवर उचलून बाहेर आणले..
या कार्यक्रमात सनातन संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, यासोबतच भाजपा युवा मोर्चाचे युवक सहभागी झाले होते. याही सहभागी होत्या.
