स्नेह नागरी पतसंस्थेचा २६ वा वर्धापन दिन उत्साहात
सत्यनारायण पूजेसह ‘स्वर भक्तीरंग’ आणि सावंत ग्रुपच्या भजनाने रंगला वर्धापन दिन सोहळा
सावंतवाडी
स्नेह नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सावंतवाडी या संस्थेचा २६ वा वर्धापन दिन ७ सप्टेंबर रोजी वसंत प्लाझा, गांधी चौक, सावंतवाडी येथील मुख्य कार्यालयात आनंददायी व भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या वतीने श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अनेक ग्राहक व हितचिंतक उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.
श्री सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने सौ. स्मिता केंकरे यांच्या ग्रुपतर्फे ‘स्वर भक्तीरंग’ हा सुश्राव्य भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात सौ. नेहा भंगले, श्री. दिपू खानोलकर, श्री. रवींद्र प्रभू आणि कु. स्वरांगी खानोलकर यांनी सहभाग घेत आपल्या सुरेल गायनाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
यानंतर सावंत ग्रुप, निगुडे यांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. श्री सत्यनारायण आरती, विविध भक्तिगीते, भजन तसेच गौळण अशा भक्तिमय सादरीकरणाने कार्यक्रमाला रंगत आली. उपस्थितांनी या भक्तिमय कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमामुळे स्नेह नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात दिवसभर उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते.
