३० लाख घेऊन लोक उभे आहेत ऍडमिशन साठी…
संपादकीय….
आपल्या मुलामुलींच्या भवितव्यासाठी प्रत्येक पालक झटत असतो, त्या पाल्याला चांगल्या शाळा, कॉलेजात ऍडमिशन मिळावं आणि पुढे जाऊन त्याचं भलं व्हावं असं प्रत्येकांचच मत असतं. परिस्थिती ने गरीब असणारे आपल्या कुवतीनुसार प्रयत्न करतात, परंतु हातात चार पैसे असणारे पालक मात्र आपली राजकीय ओळख वापरून आपल्या पाल्याला मुंबई पुण्यात चांगलं कॉलेज मिळावं यासाठी प्रयत्नशील असतात. अलीकडे शिक्षणाची गंगोत्री म्हणून पुण्याकडे पाहिलं जातं, त्यामुळे अनेकांनी पुण्यात फ्लॅट वगैरे विकत घेऊन अथवा भाड्याने घेऊन मुलांना शिक्षणाकरिता ठेवले आहे, खरंतर पुण्यात शिक्षण हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेला ट्रेंडच म्हणायला हरकत नाही.
अशीच एक गोष्ट घडली ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका नावाजलेल्या व्यक्तीच्या मुलीच्या शिक्षणाची. या व्यक्तीने देखील आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी पुण्यात घर घेतले असून तिथेच कुटुंबासही ठेवले आहे. काही काळ एका पक्षाच्या राजकीय पदावर देखील ती व्यक्ती होती. त्यामुळे राजकीय ओळखी वगैरे बऱ्यापैकी आहेत. आपल्या याच राजकीय ओळखीचा फायदा घेऊन आपल्या मुलीस पुण्यातील कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी ती व्यक्ती सत्ताधारी पक्षाच्या एका दबंग मंत्र्यांकडे गेला. त्या मंत्र्यांचा शब्द शिक्षण खात्यात खाली पडूच शकत नाही ही खात्री आणि मंत्र्याची काम करण्याची दबंग पद्धत पाहता आपलं काम सहज होणार याची देखील खात्री. ती व्यक्ती मंत्र्यांच्या भेटण्यासाठी गेली असता शंकराच्या देवळात शिवाच्या दर्शना अगोदर नंदीचे दर्शन घेतात तसेच मंत्र्यांच्या अगोदर त्याच्या पीए चे दर्शन घ्यावे लागते. तसे दबंग मंत्र्याची पीएची भेट त्या व्यक्तीने घेतली. आपल्या जिल्ह्यातील जनतेबद्दल नक्कीच त्या मंत्र्याला आपुलकी असणार ही भावना मनात होतीच.
परंतु….झालं भलतंच.
मंत्र्यांच्या पीए ने सर्व विषय ऐकून घेतल्यावर…..
त्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी लोक ३० लाख घेऊन उभे आहेत, तुम्ही काय करता ते लवकर सांगा….
अशी सरळ सरळ पैशांची अवाजवी मागणीच केली. त्यामुळे मोठी आस घेऊन गेलेली ती अतुलनीय व्यक्ती मात्र गोंधळली….आणि मुलीच्या त्या कॉलेजमधील प्रवेशाचा उदय न होताच सूर्य मावळतीला जाताजाता परत आली.
शिक्षणाचा चाललेला बाजार आणि त्यातील जनतेनेच निवडून आपला प्रतिनिधी म्हणून पाठवलेले आमदार मंत्र्यांसारखे खरेदीदार आणि विक्री होणारे पालक वर्ग पाहता, लूटमार करण्यासाठीच लोक राजकारणात येतात का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. राजकारणात सध्याच्या घडीला लूटमार करून आपली आणि आपल्या पक्षाची तुंबडी भरली तरच मोठमोठी मंत्रीपदे मिळतात आणि मंत्रीपदे मिळाली पाहिजेत तर लूटमार करावीच लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अन्यथा लूटमार न करणाऱ्यांचा राजकारणात कधी दीपक होईल हे सांगता येणार नाही.