मुख्य बाजारपेठ व कुडाळ-मालवण मार्गावर अवजड वाहतुकीस बंदी; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांचा निर्णय
कुडाळ :
कुडाळ शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्ष तृप्ती धोडमिसे यांनी मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५ अन्वये पुढील आदेश होईपर्यंत कुडाळ शहरात येणाऱ्या अवजड वाहतुकीस प्रतिबंध करण्याचे आदेश दिले आहेत.
कुडाळ हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असून येथील बाजारपेठ जिल्ह्यातील प्रमुख व जुनी बाजारपेठ आहे. शहरात मोठी रुग्णालये, उच्च शिक्षणाच्या संस्था तसेच कुडाळ रेल्वे स्थानक असल्याने नागरिक, रुग्ण, विद्यार्थी आणि पर्यटकांची मोठी वर्दळ असते. त्यातच कुडाळ तालुक्यातील एमआयडीसीमध्ये ३५० हून अधिक कंपन्या कार्यरत आहेत. तसेच मालवण तालुक्यातील खाणींमधून चिऱ्यांची वाहतूक कोल्हापूर, गोवा आणि कर्नाटकच्या दिशेने कुडाळमार्गे होत असल्याने अवजड वाहनांची संख्या मोठी आहे.
कुडाळ शहरातील मुख्य रस्ते अरुंद असून वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने अवजड वाहनांची वाहतूक बाजारपेठेतून होत असताना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते. बाजारपेठेतील रस्त्यांवर किरकोळ व्यापाऱ्यांची दुकाने असल्यानेही वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी नागरिक, रुग्ण आणि प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत कुडाळ शहरातील अवजड वाहतूक मुख्य बाजारपेठेतून न आणता पर्यायी मार्गाने वळविण्याचा निर्णय घेण्यात आला.
कुडाळ शहरातील सर्व प्रकारची अवजड वाहतूक बाजारपेठेतून न आणता एसआरएम कॉलेज येथून एमआयडीसीमार्गे मालवण व वेंगुर्ला या दिशेने वळविण्यात आली आहे.
तसेच मालवण-कुडाळ मार्गावरील अवजड वाहतूक नेरूर जकात नाका – छत्रपती शिवाजी महाराज चौक (एमआयडीसी) – हॉटेल अन्नपूर्णा – विनायक सुझुकी शोरूम – हॉटेल सदिच्छा – एस. एन. देसाई चौक – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ या मार्गाने वळविण्यात आली आहे.
दिशादर्शक फलक लावण्याचे आदेश
या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहेत. बंद करण्यात आलेले रस्ते तसेच पर्यायी मार्ग नागरिकांना स्पष्टपणे समजावेत यासाठी आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलक व वाहतूक संकेतचिन्हे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने पर्यायी मार्गावर वाहतूक कोंडी किंवा अपघात होणार नाही, याची दक्षता घेऊन वाहतुकीचे योग्य नियमन करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
