You are currently viewing बोर्डवे येथे दहीहंडी उत्सवाचा जल्लोष; बच्चे कंपनीसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

बोर्डवे येथे दहीहंडी उत्सवाचा जल्लोष; बच्चे कंपनीसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

बोर्डवे येथे दहीहंडी उत्सवाचा जल्लोष; बच्चे कंपनीसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

मुला-मुलींनी एकत्र येत जपली गावातील दहीहंडीची अनोखी परंपरा

बोर्डवे – कणकवली

बोर्डवे येथील वाणीवाडी, पेंढरीवाडी आणि मोडकवाडी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. बच्चे कंपनीसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

शहरी भागात मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सवांचे आयोजन केले जाते. मात्र, ग्रामीण भागातील दहीहंडी उत्सवाची रंगत आणि त्यातील आपलेपणा काही वेगळाच अनुभव देणारा ठरतो. बोर्डवे गावात आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी कार्यक्रमात याचीच प्रचिती आली. ग्रामस्थ, महिला, युवक तसेच बच्चे कंपनीने मोठ्या उत्साहाने सहभाग घेत उत्सवाचा आनंद लुटला.

या दहीहंडी उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे मुले आणि मुली एकत्र येऊन दहीहंडी फोडण्याच्या उपक्रमात सहभागी होतात. कोणताही भेद न ठेवता सर्वांनी एकत्रितपणे उत्सव साजरा केल्याने कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली. पारंपरिक उत्साह, आनंद आणि एकोप्याचे दर्शन घडविणारा हा सोहळा ग्रामस्थांच्या साक्षीने उत्साहात पार पडला.

ग्रामीण भागातील संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोपा जपणाऱ्या अशा उपक्रमांमुळे गावातील नवीन पिढीलाही सण-उत्सवांचे महत्त्व अनुभवता येते. बोर्डवे येथील दहीहंडी उत्सवातून एकत्र येण्याचा आनंद आणि गावच्या परंपरेची जपणूक यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा