जबरदस्त सीन … हेच या लोकांना कोणीतरी तोंडावर सुनवायची गरज होती… संघर्ष समितीने करून दाखवले…
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रमुख राष्ट्रीय बँकेचे शाखाधिकारी हे अन्यभाषीक असून त्यांना स्थानिक मराठी भाषा कळतदेखील नाही. जिल्ह्यात महिला बचत गटाची खाती व व्यवहार या बँकेत असतात. अनेकदा या महिला फारशा शिक्षित नसल्याने त्यांना आपल्या अडचणी बँकेसमोर मांडता येत नाहीत. स्थानिकांना किंमत न देण्याची उद्दाम प्रवृत्ती या शाखाधिकाऱ्यांची असल्याच्या अनेक तक्रारी वेळोवेळी होत आल्या आहेत. पण राष्ट्रीय बँकानाच रिझर्व्ह बँकेचा मान देण्याची मानसिकता असलेल्या सिंधुदुर्गात यांची उद्दाम वर्तणूक जनता सहन करत आली आहे.
काल सावंतवाडीत जप्ती करायला गेलेल्या आणि उर्मट भाषेत खोटे बोलणाऱ्या बँक ऑफ इंडियासारख्या जिल्ह्याची लीड बँक असलेल्या शाखाधिकाऱ्याची संघर्ष समितीच्या कार्याध्यक्ष अविनाश पराडकर यांनी कडक शब्दात हजेरी घेतली. जास्त संयम बघू नका, त्याआधी या मराठी न समजणाऱ्या माणसाला इथून हाकलून काढा, असे त्यांनी त्याच बँकेच्या कर्मचाऱ्यांना बंदोबस्तातील पोलीस फोर्स आणि कॅमेऱ्याच्या समोर सुनावले. लॉकडाऊनमध्ये जगण्याचा प्रश्न असतानाही थकीत कर्जदार उधार उसनवारीने बँकेत चार लाख रुपये भरायला गेला होता, मात्र शाखाधिकाऱ्याने ते न स्वीकारता अकरा लाख रुपये एकरकमी घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर तातडीने जप्ती लावली असताना, त्या ठिकाणी कर्जदाराने आतापर्यंत एकही पैसा न भरल्याने हे करावे लागत असल्याचा कांगावा केला. वास्तविक घर जप्त करून ते बारा लाखाला अन्य व्यक्तीला लिलावात विक्री दाखवून वरची मलई खाण्याचा प्रकार उघड झाला होता. त्याठिकाणी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चार लाख रुपये कर्जदार देत असताना का घेतले नाहीत असे विचारले असतांना काही वेळापूर्वी कर्जदाराने एकही पैसा न भरल्याचे सांगणारा शाखाधिकारी “मेरे हात मे क्या था?” असे उद्दाम उत्तर दिले. यावर भडकलेल्या अविनाश पराडकर यांनी रुद्रावतार धारण करून शाखाधिकाऱ्याला चांगलेच फैलावर घेतले. मराठी समजत नसेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुला खुर्चीवर बसायला देणार नाही, वाटल्यास आणखी पन्नास पोलिसांचे संरक्षण घेऊन ये, असे सणसणीत शब्दात सुनावले. हे मी जाहीरपणे प्रेस आणि तुमच्या बँकेच्या कॅमेऱ्याच्या समोर सांगतोय म्हणत मराठी भाषा न समजणाऱ्या बँक अधिकाऱ्यांच्या मुजोरीला आव्हान दिले आहे. लवकरच संघर्ष समिती जिल्ह्यातील अशा बँक शाखाधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबतच्या जनतेच्या तक्रारींचा आढावा घेत आंदोलन पुकारणार असल्याचे संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष ऍड प्रसाद करंदीकर यांनी सांगितले. संघर्ष समितीच्या या पावित्र्याचे अनेकांनी स्वागत केले असून भूमिकेला समर्थन दिले आहे.