राज्यकर्त्यानो ऐका हो…विटे वार्तापत्र
विटे, (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार)
गेल्या कित्येक वर्षात दररोज न चुकता विटे शहराला पाणी पुरवठा झाला असे विटेकरांनी स्वप्नात देखील पाहिले नसेल. येथील अबालवृद्धाना स्वप्नात देखील पाण्याविना नळ दिसत असल्याने ते सतत पाण्याच्या विवंचनेत असतात. “पाण्यासाठी विटेकरांनी फोडला टाहो, राज्यकर्त्यानो ऐका हो” असे कितीही ओरडले तरी आमच्या राज्यकर्त्यांना ऐकू जाणार नाही. ऐकू गेलेच तर न ऐकल्याचे सोंग करण्यात ते पटाईत आहेत.
दादा, भाऊ, भैय्या, मेहेरबान कोणीही सत्तेत असू द्यात विटेकरांचे हाल वाढतच चालले आहेत. खर तर पाणी हा लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. आम्ही लहान असताना शहराला सायफन पद्धतीने पाणी पुरवले जात होते. पाईप फोडणे, वीज खंडित होणे असल्या प्रकारांना अजिबात थारा नव्हता. विट्याला पाणी टंचाईचा दीर्घ इतिहास आहे. अहो एवढेच काय विट्यात मुलगी द्यायला कोणत्याही मुलीचे आई वडील तयार नसत. आज तेवढी भीषणता राहिली नाही.
सध्या विट्याला खंडित विजपुरवठा व पाईप फोडण्याचे प्रकार यामुळे पाणी दररोज उपलब्ध होवू शकत नाही. प्रत्येक निवडणुकीत दररोज पाणी देणार अशी आश्वासने गेली कित्येक वर्षे येथील लोक ऐकत आले आहेत. पाणी प्रश्नावर निवडणुका जिंकल्या मात्र पाणी काही जनतेला मिळाले नाही. आमदार, नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, नगरसेवक यांना अखंडित वीज पुरवठ्यासाठी प्रयत्न करता येऊ नयेत याचे खरे तर आश्चर्य वाटते. पाईप फोडल्या प्रकरणी आजवर कितीजणावर कारवाई झाली. केवळ विजपुरवठा बंद असल्याने किंवा पाईप फोडल्याने पाणी येणार नाही असा मेसेज टाकला की कृतकृत्य झाल्याची यांची भावना असते. एक दोन दिवस पाणी आले नाही तर लोकांना 500 रुपये भरून टँकर घ्यावा लागतो. वर्षाची पाणीपट्टी भरायची आणि टँकरला पैसे मोजायचे हा कुठला न्याय. किती नगरसेवक आपल्या प्रभागात बैठका घेतात. एक दादा गेले दुसरे दादा आले. प्रश्न काही सुटले नाहीत.
एक गोष्ट चांगली मानावी लागेल. पाणी कधी येणार हे आता मोबाईलवर पाणी सोडणारी मंडळी सांगत आहेत. या सुविधेबाबत पालिकेला धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत. निदान पाणी येण्याची वेळ तरी कळते. नाहीतर घरातील भगिनींना पाण्याच्या प्रतीक्षेत थांबावे लागत होते. आता तेवढा तरी दिलासा.
काही मंडळींनी दोन दोन पाणी कनेक्शन घेतली आहेत. त्यांना मुबलक पाणी मिळते. ज्यांच्याकडे एकच पाणी कनेक्शन आहे त्यांना कमी दाबाने व केवळ पंचवीस मिनिटेच पाणी मिळते. पाणी पुरवठा करण्यात सुसूत्रता येण्याची गरज आहे. स्थानिक पत्रकार देखील पाण्याबाबत फारसा आवाज उठवत नाहीत. ते सावधगिरी बाळगून पाणी प्रश्नावर लिहीत आहेत. खर तर पाणी येणार नसेल तर पालिकेने पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. तशी पद्धत विटा पालिकेत बहुदा नाही. मला एक समजत नाही विट्याच्या राजकारणात असलेली मंडळी यशवंतनगर व गावभाग म्हणजेच विटा शहर समजतात की काय? त्यांना विस्तारित भागाचे काहीही देणंघेणं नाही. केवळ मतापुरते त्यांना जवळ केले जाते.
मध्यंतरी आळसंद हद्दीतील सुर्वे यांच्या शेताजवळ मुख्य पीएसी पाईपलाईनच्या जॉइंटला मोठ्या प्रमाणात लिकेज झाल्याचे निदर्शनास आले. या लिकेजची पाहणी व तपासणी सकाळपासून पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू होती.
या लिकेज तपासणी मोहिमेत विटा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. श्री. विक्रमसिंह पाटील यांनी स्वतः सहभागी होऊन परिस्थितीची पाहणी केली. अथक प्रयत्नांनंतर लिकेजचे नेमके ठिकाण शोधण्यात आले.
लिकेज दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यासाठी दुपारी ३.३० ते ५.३० या दोन तासांच्या कालावधीत पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. या कालावधीत संबंधित पाईपलाईनवरील लिकेज दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले असून, त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.
दुरुस्तीचे काम सुरू असताना पाणीपुरवठा विभागाचे सभापती मा. श्री. सुरेश पवार तसेच पाणीपुरवठा अभियंता श्री. नागेश पेठे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून अचानक उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली आणि संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या मौलिक सूचना दिल्या.
नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने केलेल्या कार्यवाहीमुळे मोठ्या प्रमाणातील पाणीगळती रोखण्यात यश आले असून, नागरिकांचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाकडून तत्परतेने कार्यवाही करण्यात आली.असे पालिका प्रशासनाने सूचित केले. विटेकरांना दररोज शुद्ध पाणी हवे आहे. पालिकेने त्यात टाळाटाळ करता कामा नये. पाणीपट्टी जशी सक्तीने वसूल करता तशी तत्परता पाणी पुरवठा करण्यात दाखवली पाहिजे. नगरसेवक हे पालिकेचे विश्वस्त असतात. काही काळ त्यांची सत्ता असते. सर्वच गोष्टी अर्थकारणावर करता येत नाहीत. सत्ता कधी बदलेल याचे गणित आजवर कोणाला सुटले नाही. त्यामुळे मिळालेल्या संधीचा शहर विकासासाठी शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी वापर करावा अशी चर्चा आहे.
