You are currently viewing खिडकी

खिडकी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*खिडकी*

 

घरातल्या प्रत्येक वस्तूला आपली एक जागा असते. खुर्चीला, टेबलाला, कपाटाला तशीच खिडकीलाही. खिडकीला जागा असतेच पण तरीही ती स्वतःच एक जागा असते. घराच्या आतली आणि बाहेरचीही!

 

आज इतकी वर्षं उलटून गेली, घर बदललं, माणसं बदलली, परिसर बदलला पण मनाच्या एका कोपऱ्यात ती खिडकी अजूनही तशीच आहे. तिच्या लाकडी चौकटीवर सकाळच्या उन्हाची सोनेरी किनार, बाहेर सोनचाफ्याचं झाड आणि खिडकीच्या शेजारच्या भिंतीवरचा महादेवाचा मोठा फोटो.

 

सोनचाफ्याचं ते झाड जणू आमच्या घराचंच एक सदस्य होतं. पहाटे खिडकी उघडली की त्याचा मंद, गोड सुगंध घरभर पसरायचा. वाऱ्याची एखादी हलकी झुळूक आली की झाडाची पानं सळसळायची आणि एखादं सोनचाफ्याचं फूल अलगद खिडकीच्या कठड्यावर येऊन पडायचं.

त्या फुलांना उचलताना मला एक विलक्षण आनंद व्हायचा.

पिवळसर, नाजूक पाकळ्यांचं ते फूल हातात घेतलं की वाटायचं, निसर्गानेच आपल्यासाठी काहीतरी सुंदर पाठवलं आहे.

आणि त्या खिडकीच्या शेजारच्या भिंतीवरचा महादेवाचा मोठा फोटो;आजीची महादेवावर अपार श्रद्धा होती.ती महादेवापुढे बसायची तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसायचं.

मी तिच्या जवळ बसून तिचं सगळं पाहत राहायचे. त्या वेळी देव, श्रद्धा, अध्यात्म यांचा अर्थ मला कुठे कळत होता?

पण एक मात्र मनात घट्ट बसलं होतं, खिडकीतला हा नीळकंठ आपलं रक्षण करतो.

खिडकीतला सोनचाफा आणि भिंतीवरचा महादेव!

मला वाटायचं, आमच्या घराला यापेक्षा सुंदर रखवालदार असूच शकत नव्हता. निसर्ग आणि श्रद्धा जणू एका चौकटीत येऊन बसले होते.

कदाचित म्हणूनच ती खिडकी माझ्यासाठी केवळ खिडकी नव्हती.

ती आमच्या घराच्या आत्म्याची चौकट होती.

 

आमच्या जुन्या घराची ही खिडकी मोठी होती. लाकडी चौकट आणि त्याला दोन पाट्या. सकाळी आई त्या उघडायची आणि घरात सूर्यप्रकाशाचा एक सोनेरी तुकडा अलगद शिरायचा. त्या प्रकाशात हवेत तरंगणारी धुळीची कणंही मला तेव्हा चमचमणाऱ्या ताऱ्यांसारखी वाटायची.

 

लहानपणी मला हीच खिडकी म्हणजे घरातलं सगळ्यात आवडतं ठिकाण वाटायचं. तिच्या गजांना धरून उभं राहिलं की बाहेरचं जग अगदी जवळ यायचं. रस्त्यावरून जाणारी माणसं, शाळेत जाणारी मुलं, भाजीवाला, सायकलची घंटी, पावसात धावणारी माणसं. सगळं काही त्या खिडकीच्या चौकटीतून एखाद्या चित्रपटासारखं दिसायचं.

पावसाळा म्हणजे तर खिडकीचा ऋतूच!

पहिल्या पावसाच्या सरी आल्या की खिडकीत बसून पाऊस पाहण्यात एक वेगळाच आनंद असायचा. काचेवरून ओघळणारे पाण्याचे थेंब आपापल्या वाटेने खाली सरकत. त्यांची शर्यत लागायची. कोणता थेंब आधी खाली पोहोचतो, हे पाहताना कितीतरी वेळ सहज निघून जायचा.

आणि कधी कधी त्या खिडकीबाहेर आकाशात इंद्रधनुष्य उमटायचं.

क्षणभर वाटायचं, खिडकी उघडली तर हात पुढे करून ते रंग आपण पकडू शकू!

 

खिडकीने मला ऋतू शिकवले. उन्हाळ्यात तिच्यातून येणारा तापलेला वारा, पावसाळ्यातला मातीचा सुगंध, हिवाळ्यातली कोवळी ऊब आणि वसंतात फुलांचा मंद गंध. निसर्गाची ही सारी पत्रं खिडकीनेच तर घरापर्यंत आणली.

 

खिडकीवरचा आणखी एक कायमचा सोबती म्हणजे कावळा. रोज सकाळी तो कुठूनतरी उडत यायचा आणि खिडकीच्या कठड्यावर बसून कावकाव सुरू करायचा. त्याची ती कावकाव मला तेव्हा अगदी आपलीशी वाटायची. आजी म्हणायची, “कुणीतरी पाहुणं येणार असेल!” मग मी उत्सुकतेने दाराकडे पाहत बसायचे. खरंच कुणी आलं तर कावळ्याचं भाकीत खरं ठरल्याचा मला फार आनंद व्हायचा. कधी कोणी आलं नाही तरी त्याची कावकाव मला खटकायची नाही. तो रोज यायचा, दोन-चार हाका मारायचा आणि उडून जायचा. खिडकीशी माझं जे नातं होतं, त्यात त्याचीही एक छोटीशी जागा होती.

 

आता मनात विचार येतो की,खिडकी फक्त बाहेरचं जग दाखवत नाही. ती माणसाच्या आतलं जगही उघडते.

कधी मन उदास असतं. कुणाशी बोलावंसं वाटत नाही. अशा वेळी आपण नकळत खिडकीजवळ जाऊन उभे राहतो. बाहेर पाहत राहतो. समोरचं आकाश तसंच असतं, झाडं तशीच असतात, रस्ता त्याच गतीने चाललेला असतो; पण आपल्या मनात मात्र काहीतरी हलत असतं.

खिडकीशी उभं राहिलं की जाणवतं;

आपल्या दुःखापेक्षा हे जग कितीतरी मोठं आहे.

एखाद्या अंधाऱ्या खोलीत फक्त एक खिडकी उघडी असेल, तरी प्रकाश आत येण्याची शक्यता कायम असते. म्हणूनच कदाचित ‘खिडकी’ हा शब्द मनालाही आश्वस्त करतो. बंद दरवाज्यापेक्षा खिडकी नेहमीच थोडी अधिक आशावादी वाटते.

दरवाजा आपल्याला बाहेर जाण्याची संधी देतो; पण खिडकी बाहेरचं जग आत आणते.

आजच्या उंच इमारतींमध्ये खिडक्या बदलल्या आहेत. काचेच्या मोठ्या भिंती झाल्या, पडदे आले, काचांवर सूर्यप्रकाश थोपवणाऱ्या फिल्म्स आल्या. खिडकीतून दिसणारं दृश्यही बदललं. पूर्वी झाडं, अंगणं, शेजारची घरं दिसायची; आता कधी समोर दुसरी उंच इमारत दिसते.

तरीही खिडकीचं महत्त्व कमी झालेलं नाही.

आजही एखाद्या आजीला खिडकीत बसून रस्त्याकडे पाहताना आपण पाहतो. एखादं मूल खिडकीतून आकाशात चंद्र शोधतं. एखादी आई मुलाच्या परतीची वाट पाहत उभी असते. एखादा वृद्ध माणूस खिडकीतून सकाळचं वर्तमानपत्र घेणाऱ्या जगाकडे पाहत असतो.

खिडकी म्हणजे प्रतीक्षाही.

कुणाच्या येण्याची, कुणाच्या जाण्याची, एखाद्या पत्राची, फोनची. कधी कधी तर फक्त एका ओळखीच्या आवाजाची.

आणि काही खिडक्या आठवणींच्या असतात.

त्या आता आपल्या घरात नसतात, पण मनात कायम उघड्या असतात. बालपणाची खिडकी, माहेराची खिडकी, शाळेच्या वर्गाची खिडकी, पहिल्या पावसाची खिडकी. काळ कितीही पुढे गेला तरी त्या खिडक्यांतून दिसणारी दृश्यं मनात तशीच राहतात.

 

कधी कधी वाटतं, त्या खिडकीने मला आयुष्याचा एक सुंदर अर्थ नकळत शिकवला.

बाहेर कितीही बदल घडले तरी घराला उब देणाऱ्या काही गोष्टी कायम आत राहतात.

एक सुगंध,

एक श्रद्धा,

एक आठवण,

आणि एखादी खिडकी.

जी वर्षानुवर्षं बंद असली तरी मनात मात्र सदैव उघडी असते.

 

“घर बदललं, खिडकी हरवली; पण माझ्या मनातली ती खिडकी अजूनही उघडी आहे.”

 

ती खिडकी कधी स्वप्नांकडे उघडते, कधी आठवणींकडे, कधी आशेकडे.

 

बाहेरचं आकाश कधीच संपत नाही…

आणि खिडकीतून येणारा प्रकाशही!

 

*राधिका भांडारकर*.

प्रतिक्रिया व्यक्त करा