स्मार्ट मीटरची सक्ती आणि महागाईविरोधात वैभववाडीत शिवसेनेचा विराट जनआक्रोश!
माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत महावितरण व तहसील कार्यालयावर धडक; मागण्यांचे निवेदन सादर
वैभववाडी (विशेष प्रतिनिधी):
महावितरण कंपनीमार्फत सर्वसामान्यांवर लादण्यात येणारी ‘स्मार्ट मीटर’ची सक्ती आणि ऐन सणासुदीत गगनाला भिडलेली महागाई याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज बुधवार, २ सप्टेंबर रोजी वैभववाडीत भव्य व आक्रमक जनआंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केले.
आज सकाळी ११ वाजता वैभववाडी येथील शिवसेना शाखेजवळून या जनआंदोलनाला सुरुवात झाली. हातामध्ये फलक घेऊन आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिक आणि संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. महावितरण उपविभाग कार्यालय आणि तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला व मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
नेत्यांचा सरकारवर जोरदार प्रहार:
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख वैभव नाईक म्हणाले की, “सध्याचे वीज मीटर्स सुस्थितीत असताना केवळ भांडवलदारांचे भले करण्यासाठी स्मार्ट मीटरची सक्ती केली जात आहे. ग्रामीण भागात नेटवर्क नसताना हे मीटर लावून जनतेला अंधारात ढकलण्याचे पाप हे सरकार करत आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर साखर, डाळी, तेलाचे भाव वाढवून जनतेचे कंबरडे मोडले आहे. ही लूट शिवसेना कदापि सहन करणार नाही.”
कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांनी सांगितले की, “ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय तालुक्यात एकही नवीन स्मार्ट मीटर लावू दिला जाणार नाही. महावितरणने सक्ती थांबवली नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करू.”
यावेळी महावितरण कार्यालयात जाऊन सहाय्यक अभियंत्यांना स्मार्ट मीटर रद्द करण्याबाबत तर तहसीलदार कार्यालयात जाऊन सणासुदीतील महागाईवर नियंत्रण आणण्याबाबत सविस्तर निवेदने देण्यात आली.
पदाधिकारी व शिवसैनिकांची प्रचंड उपस्थिती:
या जनआंदोलनात युवासेना जिल्हाप्रमुख तथा कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक, जिल्हा महिला आघाडी प्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख नंदू शिंदे, महिला तालुकाप्रमुख दिव्या पाचकुडे, कणकवली महिला आघाडी प्रमुख माधवी दळवी, तालुका सचिव गुलजार काझी, तालुका संघटक लक्ष्मण रावराणे, युवासेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच आंदोलनात अशोक रावराणे, मनोज सावंत, अल्पसंख्याक तालुकाप्रमुख जावेद पाटणकर, स्वप्नील रावराणे, वसंत खानविलकर, जितू तळेकर, यशवंत गवाणकर, अर्चना कोरगावकर, संतोष पाटील, पंढरी सुर्वे, सुरेश पांचाळ, सुरेश शिंदे, अनंत नादलसकर, समीर लांजेकर, दादा नेवरेकर, अहमद बोबडे, दिलीप रावराणे, मानसी घुघरे, रिहाना काझी, एकनाथ गावडे, उमाकांत राणे, रत्नकांत कदम, संदीप कोलते, विठोबा गुरव, हरिश्चन्द्र राऊत, नारायण कोलते, सुरेश पालये, नामदेव परबते, सोमनाथ पवार, विवेक विटेकर, दीपक चव्हाण, आरती सुर्वे, जयवंत पांचाळ, तुकाराम वळंजू, अनिल बेलेकर, मोतीराम माने, नाना जैतापकर, सुभाष वळंजू, मनोहर नारायण, भालचंद्र सुर्वे यांच्यासह शेकडो शिवसैनिक, पदाधिकारी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
