You are currently viewing आडाळी एमआयडीसीत २५० कोटींची गुंतवणूक

आडाळी एमआयडीसीत २५० कोटींची गुंतवणूक

आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत ऑटोमेज कंपनीसोबत बैठक; ५०० हून अधिक तरुणांना रोजगाराच्या संधी

मुंबई : दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीच्या औद्योगिक विकासाला आणखी चालना मिळणार असून, येथे ऑटोमेज कंपनीच्या माध्यमातून तब्बल २५० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला नवीन उद्योग साकार होणार आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील ५०० हून अधिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली.

या प्रकल्पासंदर्भात आज मुंबई येथे आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत ऑटोमेज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अतीन अग्रवाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रवींद्र रणसिंग यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी आडाळी एमआयडीसीमध्ये कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

ऑटोमेज कंपनीकडून आडाळी येथे २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करून नवीन कारखाना उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार असून, दोडामार्गसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना त्याचा मोठा लाभ मिळणार आहे.

ऑटोमेज कंपनीची भारतातील विविध ठिकाणी पाच कारखाने कार्यरत असून, परदेशातही कंपनीचा एक कारखाना सुरू आहे. आडाळी एमआयडीसीमध्ये या कंपनीचा प्रकल्प उभारला जाणे हे परिसराच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

आडाळी एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हा आपला प्रयत्न असल्याचे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे आडाळी परिसरासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा