You are currently viewing दोन दिवसांत विटा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार

दोन दिवसांत विटा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार

अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणकडून लेखी पत्राद्वारे आश्वासन

विटे / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :

विटा शहर व उपनगरांना कमी दाबाने, खंडित व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विटा नगरपरिषदेकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. याबाबत नगराध्यक्षा सौ. काजलताई म्हेत्रे, उपनगराध्यक्ष श्री. अमोलदादा बाबर, सभापती श्री. सुरेश पवार तसेच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी तातडीची बैठक घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत चर्चा केली.

पाणीपुरवठ्यात वारंवार खंड पडण्याचे प्रमुख कारण आळसंद जलशुद्धीकरण केंद्र व घोगाव जॅकवेल येथील वीजपुरवठ्यात होणारे व्यत्यय असल्याचे बैठकीत निदर्शनास आले. याबाबत महावितरणच्या विटा विभागाशी संपर्क साधून विटा नगरपरिषद ही एक्स्प्रेस फिडरची ग्राहक असल्याने अखंडित व नियमित वीजपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली.

महावितरणकडून नगरपरिषदेस लेखी पत्राद्वारे खुलासा देण्यात आला आहे. आळसंद जलशुद्धीकरण केंद्रातील ३३/११ के.व्ही. उपकेंद्रातून विटा वॉटर सप्लाय एक्स्प्रेस फिडरला वीजपुरवठा केला जातो. या ठिकाणी ५ एम.व्ही.ए. क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर अतिरिक्त भारामुळे नादुरुस्त झाला असून, त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. हे काम दोन दिवसांत पूर्ण करून विद्युतपुरवठा सुरक्षित व अखंडित करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

तसेच घोगाव जॅकवेल येथील ११ के.व्ही. टाकारी एक्स्प्रेस फिडरच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता ५ एम.व्ही.ए. वरून १० एम.व्ही.ए. करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे भविष्यातील वीजपुरवठ्यातील अडचणी कमी होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, कुंडल-बलवडी शिवेवर मुख्य जलवाहिनीला अचानक गळती झाल्यानंतर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने अत्यंत कमी वेळेत दुरुस्तीचे काम पूर्ण करून त्याच दिवशी शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत केला होता.

याशिवाय घोगाव ते आळसंद, आळसंद ते विटा या मुख्य जलवाहिन्या तसेच विटा शहर व उपनगरांमधील जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे बाह्य यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे दुरुस्तीच्या कामांना गती मिळणार असून पाणीपुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

विटा शहरातील मायणी रोड ते तासगाव रोडदरम्यान सुरू असलेल्या महामार्गाच्या कामामुळे काही भागातील जलवाहिन्यांचे नुकसान होऊन पाणीपुरवठा खंडित झाला होता. संबंधित जलवाहिन्यांच्या दुरुस्तीबाबत ठेकेदाराला सूचना देण्यात आल्या असून नगरपरिषदेमार्फतही आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे.

नागरिकांनी पाणीपुरवठ्यातील अडचणीच्या काळात नगरपरिषदेस सहकार्य करावे. तसेच येत्या काळात शहर व उपनगरांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा