*पारिजात साहित्य समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलकार डॉ शरयू शहा लिखित अप्रतिम लेख*
*व्यक्तिमत्व विकास शिबीरे*
व्यक्तिमत्व शिबिरे।
जणू आनंदाचे झरे॥
नवीन नवीन कोर्सेस शिकत राहणं हे खूपच खूप आनंददायी असतं. आपल्या अवतीभवती शिकण्यासारखं एवढं असतं की घेशील किती दो कराने ?
या उक्तिप्रमाणे एका आयुष्यात किती शिकणार, काय काय शिकणार ? असा प्रश्न पडतो. पण आपल्या मनात असेल तर अनेक मार्ग आहेत शिकण्याचे.
१ दिवस, २ दिवस, ४/५ दिवसांपासून अनेक महिने चालणारी अशी अनेक शिबीरं चालू असतात. वेळात वेळ काढून ती आपण करायला हवीत. आता या वयात काय करायचं शिकून ? असा विचारही नाही करायचा. कारण हे छोटे छोटे कोर्सेस आपल्याला खूप मोठं भरीव असं काही काही देऊन जात असतात. आपलं जीवन समृद्ध करीत नेत असतात. नवीन नवीन अँगल्सनी जीवनाकडे बघायला शिकवतात. आपल्या स्वभावात सूक्ष्म बदल करीत नेतात की जे आपल्याही नकळत आपलं जीवन परिणामकारक व सुंदर समृद्ध बनवत नेतात.
काही नावं सांगायची म्हटलं तर S S Y (सिद्ध समाधी योग), आर्ट ऑफ लिव्हींग, लँड मार्क फोरमचे अनेक कोर्सेस, जिज्ञासा, पॉझिटिव्ह थिंकिंग, हिप्नॉटिझम, विपश्यना, ब्रह्मविद्या, आरोग्यशिबिर..७ दिवसांचे !
अशी अनेक !
👆हे सगळे कोर्सेस मी केलेले आहेत. म्हणूनच त्याचं महत्त्व मला पुरेपूर पटलेलं आहे. व्यक्तिमत्व लखलखीत करणारं, मनाला चकचकीत करणारं, आपल्याला अष्टावधानी बनवणारं, जागरूकपणे जगायला लावणारं असं काही ना काही नक्कीच या कोर्सेसमधून मिळत असतं. आणि त्यातूनच आपलं
विचार क्षितिजही आपल्या नकळत विस्तारत जात असतं. त्याचं समाधान कुठल्याही मापानं मोजता येणारं नसतं.
वेगवेगळ्या वयोगटातील विविध व्यक्ती इथे भेटतात. परिचय होतो. स्वभावाचे अनेक पैलू, वैशिष्ट्याचे अनेक नमुने पहायला मिळतात. यातून कसं जगावं हे तर कळतंच, पण कसं जगू नये हेही उमजत जातं. महत्भाग्यानं मिळालेला हा जन्म आपण किती सावधगिरीनं जगायला हवा.
याचं भान येत जातं.
आपला पेहराव, आपलं वागणं, बोलणं कसं असायला हवं ? याचं अवधान येत जातं. आणि मग आपलंच मन आपल्यावर बारीक लक्ष ठेवू लागतं. आपण अधिक डोळसपणे जगू लागतो.
‘सिद्ध समाधी योग’मध्ये निसर्गाशी बोलायला लावतात. झाडांशी, पहाडाशी फुलापानांशी संवाद साधायला लावतात. आपण तर निसर्ग नीट निरखूनही पहात नाही कधी ! तिथं निसर्गाशी संवाद साधणं तर अगदी अगदीच दूरची गोष्ट !
पण त्या दिवशी मात्र मी वाटेवरल्या काट्यांशीही खूप बोलले बरं.
इगतपुरी विपश्यनामधे ध्यानावर भर दिला आहे. शेकडो जणांच्या समूहात एकत्रित ओंकार म्हणणं ही एक विलक्षण अनुभूती आहे. आणि ती अशा शिबिरात जाऊनच अनुभवायला मिळते.
एकटं करणं आणि समूहात करणं यात फरक आहे.
आवश्यक क्रिया, विश्रांती सोडता पहाटे चारपासून ध्यानात रहायचं. मन क्रमाक्रमानं एका एका भागावर एकाग्र करणं. त्यात विरून जाणं. विरघळून जाणं. हे खूप छान वाटतं. मनाचं हे विगलित होणं – परत परत अनुभवावं असंच असतं. यातून मनाला अपार शांती तृप्ती मिळते. वाटतं.. सारं आपल्या जवळच तर आहे. मग सुख हवं, सुख हवं म्हणून –
“जीवनाचं रान जीवाचं रान करून” का तुडवत आहे ? कशासाठी ?
तेव्हा सुरवातीला रोज पहाटे फक्त १० मिनिटं “आत्म आराधना” केली किंवा डोळे मिटून स्वस्थ विचाररहित शून्य अवस्थेत बसलो तरी दिवसभरासाठीची ऊर्जा त्यातून मिळत राहील.
डॉ.धनंजय गुंडे, डॉ.फडणीस आणि डॉ.अभय बंग या तिघांनी मिळून घेतलेल्या ७ दिवसाच्या आरोग्य शिबिरात – खायचं कसं ? प्यायचं कसं ? इथपासून चालावं कसं ? हेही त्यांनी आम्हाला शिकवलं.
भाकरी गिळायची आणि दूध खायचं ..ते कसं ? हेही आम्हाला सांगितलं.
श्रीमती महाराष्ट्र स्पर्धेत.. कसं उभं रहायचं हे शिकवलं गेलं.
लँड मार्क फोरमच्या ५ कोर्सेसमधून –
नातेसंबंध सुधारण्यास घरच्यांपासून सुरूवात करून थेट सामाजिक कार्यापर्यंत, प्रकल्प करण्यापर्यंत झेप कशी घ्यावी ? याचं पायरी पायरीनं आकलन होत जातं.
वय १७ ते ७० या वयोगटातील लोकांकडून अनेक प्रश्न समोर येतात. त्यांनी दिलेल्या एक्सरसाईजमधून आणि होणार्या शेअरिंगमधून मनोभावनेचे अनेक बारकावे कळत जातात. (शेअरिंग म्हणजे त्या त्या प्रश्नाबाबत आपले अनुभव सांगणं.)
यामुळे ..
“समोरच्याच्या भूमिकेत जाऊन विचार करण्याचा विचार”- जो आजवर झालेला नसतो. तो तिथं जरूर होतो.
“माझं काय चुकतंय” ? हे लक्षात येतं. माझे दोष लक्षात येतात. वर्षानुवर्षे मनात बाळगलेले गैरसमज, अढी, राग, संताप, चीड.. या सार्याचं दर्शन तिथे होतं. त्यावरचे उपाय मिळतात. व लगेच अमलात आणले जातात. फोनाफोनी करायला लावतात. आणि वर्षानुवर्ष चाललेलं वैर संपुष्टात येतं. शत्रुत्व मिटून जातं.
“मेरा भाई मुझे मिल गया ।“मेरा लडका मुझे मिल गया”
असे उत्कट क्षणही कित्येक जणांना मिळून जातात.
३५० लोकांचा सहभाग असलेला तो क्लास म्हणजे जणू काही विश्वदर्शनाचीच अनुभूती येते.
किती.. इतके इतकेसे गैरसमज आपण मनात
धरून ठेवलेले असतात.
आयुष्यभर खतपाणी घालून जिवंत ठेवलेले असतात. ते सारे किती तकलादू आहेत, पोकळ पायावर उभे आहेत. हे तिथं जाणवतं.
एक एक प्रश्न घेऊन त्यावर होणार्या चर्चा ऐकून, “प्रत्येकाला छळणारे प्रश्न सारखेच आहेत. आपत्ती येऊन कोसळल्यात. अशी मी काही एकटीच नाहिये. मी विनाकारण बाऊ करत आहे”..
ही जाणीव येऊन आपले प्रश्न छोटे छोटे होऊन नाहिसे होत जातात.
“मलाच किती त्रास” ?
“माझ्याच वाट्याला हे का म्हणून”?
या व अशा मनाला छळणाऱ्या विचाराच्या पकडीतून आपली सुटका होत जाते.
कारण माझ्याच विचाराची दिशा कशी चुकीची आहे.
हे आपल्याला कळून येतं.
जीवनात किती तरी गोष्टी आपल्याला मागे खेचत असतात.
“मला जमेल की नाही”?..
इथपासून अगदी – “मी जगायला नालायक आहे”.. इथपर्यंत आपण आपलंच अवमूल्यन करीत असतो.
ही स्वतःला कमी लेखण्याची प्रवृत्ती कमी होते.
“मी काहीतरी करू शकेन”..
या पायरीवरून पुढे जाऊन
*मी करणारच*! ही ठाम वृत्ती येते. आत्मविश्वास येतो. मनाला मागे खेचणार्या ज्या ज्या गोष्टी असतात त्या सर्व आपणच निर्माण केलेल्या असतात.
“आपणच आपलं जेवढं नुकसान करून घेतो तेवढं जगात दुसरे कुणीही करीत नाहीत”. आपण मात्र –
अमक्यामुळे माझं नुकसान झालं असं दुसर्याला जबाबदार धरत राहतो –
हे सारं विरत जातं.
म्हणूनच वाटतं की..
जे जे दिसेल नवे नवे।
ते ते मला यायला हवे॥
या ध्यासातून –
आत्मसात होणारे हे सारे अमूल्य कण म्हणजे.. आपल्या जीवनातील मौल्यवान चीजवस्तू आहेत.
एक एक करून ते सारं आपल्या पदरात गोळा करीत रहायला हवं. आपल्या अंगी बाणवत रहायला हवं. मग..
काही दिवसांनी, काही महिन्यांनी, आणि काही वर्षांनी –
आपला पदर अधिकाधिक भरजरी जरतारी होत असल्याचंच आढळून येईल.
© डॅा.शरयू शहा,
9619023330
