विटे : (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार)
समाज व संघटना यांचा जवळचा संबंध आहे. संघटना जेवढी प्रभावी असेल तेवढा समाज पुढे वाटचाल करत असतो. कोणत्याही समाजाची संघटना असो ती सर्वसमावेशक असणे गरजेचे असते. विशिष्ठ लोकांच्या हातात संघटनेची सूत्रे गेली तर समाज प्रगतीकडे वाटचाल करेलच याची खात्री देता येत नाही. उदाहरण पहायचे झाले तर ब्राम्हण समाजाने एकजूट दाखवली त्यामुळे राज्यात समाजाचे पाच नगराध्यक्ष व 41 नगरसेवक विजयी झाले. आजवर सत्तेत फारसे सहभागी नसलेले ब्राम्हण सत्तेत सहभागी झाले. नाही म्हटले तरी समाजाचा एक प्रकारचा दबदबा निर्माण झाला.
ब्राम्हण समाज एकजुटीने राहिला व समाज संघटना प्रभावीपणे कार्यरत असेल तर आपण काय करू शकतो हे विविध माध्यमातून दाखवून दिले आहे. मुळात ब्राम्हण समाजाला शत्रू संख्या अनंत आहे. ब्राम्हणी वर्चस्व कोणाला नको आहे. आजवर राजकारणापासून समाजाला दूरच ठेवण्यात आले आहे. मात्र आता समाज व संघटना जागी झाली आहे. सत्तेत गेल्याशिवाय समाजाची प्रगती नाही याची जाणीव समाजाला झाली आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांचे पाय ओढण्याची पद्धत कमी होत चालली आहे. अन्याय किती काळ सहन करायचा याची समाजाची मर्यादा संपलेली आहे. त्याचा परिणाम म्हणून यापुढील काळाकडे पहावे लागेल.
अजूनही काही भागात ब्राम्हण समाज संघटनेवर सर्वाना सामावून घेतले जात नसल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम म्हणून वेगवेगळ्या नावाने समाज संघटना कार्यरत आहेत. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, उद्योग यातील समस्या सोडवण्यासाठी सत्तेत सहभाग गरजेचा आहे. आजवर एकमेकांची उणी दुणी काढण्यात समाजाने वेळेचा अपव्यय केला आहे. एक ब्राम्हण दुसऱ्या ब्राम्हणाला कधीही सहकार्य करत नाही. हे जरी कटू असले तरी वास्तव आहे. समाजाने वेळीच बोध घेण्याची गरज आहे. आपण एक राहिलो तर काय करू शकतो याची प्रचिती आपणास आली आहे.
यापुढील काळात ब्राम्हण समाजाने सर्व निवडणुका ताकदीने लढवल्या पाहिजेत. सत्तास्थानी गेल्याशिवाय आपले प्रश्न मार्गी लागणार नाहीत.
पूर्वीचा काळ व आजचा काळ यात खूप फरक आहे. समाज व्यवस्था बदलत गेलेली आहे. काळ बदलला असला तरी लोकांची मानसिकता अद्याप तशीच आहे. ती मुळात बदलण्याची गरज आहे. ब्राम्हण समाज म्हणजे श्रीमंत ही जी लोकांची धारणा आहे ती अत्यन्त चुकीची आहे. समाजात आजही अनेक कुटुंबे गरीब परिस्थितीत जीवन जगत आहेत. सर्व समाजाचा स्तर उंचावला आहे हा भ्रम आहे. समाजाला आरक्षण हवे आहे संरक्षण हवे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे.
प्रदीप जोशी, विटे जि. सांगली
भ्रमणध्वनी 9881157709
( लेखक ज्येष्ठ मुक्त पत्रकार व साहित्यिक आहेत. )
