You are currently viewing सेवाभाव, निष्ठा अन् सुंदर हस्ताक्षराची आठवण ठेवून श्री. सहदेव जाधव यांना भावपूर्ण निरोप

सेवाभाव, निष्ठा अन् सुंदर हस्ताक्षराची आठवण ठेवून श्री. सहदेव जाधव यांना भावपूर्ण निरोप

सेवाभाव, निष्ठा अन् सुंदर हस्ताक्षराची आठवण ठेवून श्री. सहदेव जाधव यांना भावपूर्ण निरोप

शिवराज मराठा विद्यालय साळगाव येथे सपत्नीक सत्कार; संस्थेला ₹३० हजारांच्या खुर्च्या भेट

साळगाव :

शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगाव संचलित शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव येथील प्रयोगशाळा परिचर श्री. सहदेव वामन जाधव यांच्या ३१ वर्षे ६ महिन्यांच्या प्रदीर्घ सेवापूर्तीनिमित्त सेवानिवृत्ती कार्यक्रम उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगावचे संस्था अध्यक्ष श्री. मुकुंद धुरी, संस्था सचिव श्री. प्रदीप प्रभू तेंडोलकर, संस्था संचालक श्री. जयवंत पेडणेकर, श्री. तुकाराम गोडे, माजी मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत पंडित, माजी शिक्षक श्री. आनंद पाटील, श्री. वासुदेव मेस्त्री, श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगावचे सेवानिवृत्त शिक्षक श्री. बुधाजी कांबळी, माजी कर्मचारी श्री. श्यामसुंदर गोडे, तसेच सत्कारमूर्ती श्री. सहदेव जाधव यांच्या सौभाग्यवती व स्नेहीजन उपस्थित होते.

यावेळी संस्था सचिव श्री. प्रदीप प्रभू तेंडोलकर यांनी श्री. जाधव यांच्या मितभाषी स्वभावासोबतच सुंदर हस्ताक्षर, कामाबद्दलची निष्ठा आणि समर्पणभाव यांचा विशेष उल्लेख केला. माजी मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत पंडित यांनी, “श्री. जाधव यांच्या कामाची खरी पोहोच म्हणजे आजचा हा कार्यक्रम असून, विद्यार्थी व मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे केलेले कौतुक हीच त्यांच्या सेवेला मिळालेली खरी पावती आहे,” असे गौरवोद्गार काढले.

माजी शिक्षक श्री. आनंद पाटील यांनी श्री. जाधव हे प्रामाणिकपणे व सचोटीने काम करणारे कर्मचारी असल्याचे सांगितले. माजी कर्मचारी श्री. श्यामसुंदर गोडे यांनी श्री. जाधव यांना सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांमधून कुमारी दुर्वा धुरी, कुमारी अस्मि घाडी, कुमार निमीष सावंत व कुमार वेदांत घाडी, तर शिक्षकांमधून सौ. सुप्रिया पेडणेकर व सहाय्यक शिक्षक श्री. विद्यानंद पिळणकर यांनी श्री. जाधव यांच्या कार्याचा गौरव करत शुभेच्छा दिल्या.

सेवानिवृत्तीच्या निमित्ताने संस्थेला अनोखी भेट

आपल्या प्रदीर्घ सेवाकाळाची कृतज्ञता व्यक्त करताना श्री. सहदेव जाधव यांनी संस्थेला सुमारे ₹३० हजार किमतीच्या खुर्च्या भेटस्वरूपात दिल्या. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या कुमारी दुर्वा धुरी हिचा रोख रक्कम देऊन गौरव केला. त्यांच्या या कृतीतून संस्थेबद्दलची कृतज्ञता व विद्यार्थ्यांप्रती असलेला जिव्हाळा दिसून आला.

सत्काराला उत्तर देताना श्री. सहदेव जाधव यांनी आपल्या सेवाकाळात सहकार्य करणारे सर्व आजी-माजी संस्था पदाधिकारी, आजी-माजी मुख्याध्यापक, सहकारी कर्मचारी व विद्यार्थी यांचे मनःपूर्वक आभार मानले. सेवानिवृत्तीनंतरही संस्थेला आपले सहकार्य कायम राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात संस्था अध्यक्ष श्री. मुकुंद धुरी यांनी श्री. जाधव यांच्या सेवाभाववृत्ती, कामाबद्दलची निष्ठा, वक्तशीरपणा व नम्र स्वभावाचे कौतुक केले. त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेसाठी अभिनंदन करत श्री. जाधव व त्यांच्या कुटुंबीयांना सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्री. सहदेव जाधव यांचा संस्था, मुख्याध्यापक, विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या वतीने सपत्नीक सत्कार करून भेटवस्तू देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. सलीम ताकिलदार यांनी केले. सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक श्री. एकनाथ कांबळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन सहाय्यक शिक्षक श्री. परशुराम नार्वेकर यांनी केले.

३१ वर्षे ६ महिन्यांच्या सेवेतून निवृत्त होताना श्री. जाधव यांनी मागे ठेवलेली प्रामाणिक सेवा, सुंदर हस्ताक्षराची ओळख, नम्र स्वभाव आणि संस्थेविषयीची कृतज्ञता ही विद्यालयाच्या स्मरणात कायम राहील.

प्रतिक्रिया व्यक्त करा